अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्यानं एकीकडे खळबळ उडवल्यानंतर मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरातील दानचोरीचे प्रकरण समोर आलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी सिद्धीविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटी रुपयांची चोरी होत होती, असा धक्कादायक आरोप केला. या त्यांच्या दाव्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता सिद्धिविनायक मंदीर दान चोरीच्या कथित आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मोठं विधान केलं आहे. त्यांना मुलाखतीत उच्च न्यायालयाच्या कँन्टीनवरही तुम्ही छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान एखादा कॉक्रोच निघाला तर त्याला काय होतं, असं कँन्टीनचा चालक म्हणाला नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तुकाराम मुंढे यांनी ‘कॉक्रोच काय असतं, हे आपल्याला गेल्या काही दिवसांत कळलं आहे. कॉक्रोचचं असं आहे की, त्याला कुठेही फेका, तो तिथेच जन्म घेतो,’ असं हटके उत्तर दिलं. ते ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलिश निर्वासितांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने दिलेल्या आश्रयाच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यासाठी पोलंडचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज कोल्हापुरात दाखल झाले. नवीन राजवाड्यात छत्रपती घराण्याच्या वतीने शिष्टमंडळाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पोलंडच्या संसदेच्या वरिष्ठ सदस्य आणि 'पोलंड-भारत संसदीय गट'च्या अध्यक्षा किंगा गायेव्स्का यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्यांनी या स्वागताबद्दल आनंद व्यक्त केला.
महायुती सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ४३ हजार ६४७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल ३७४ कोटी ३१ लाख ४३ हजार ४८१ रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मनोज जरांगे पाटील काय आरोप करत आहेत, यावर मी भाष्य करणार नाही. उद्योगमंत्री उदय सामंत हे जरांगे पाटील यांना बोलले आहेत. माझंदेखील दोन ते तीनवेळा बोलणं झालं आहे. जरांगे यांच्या मनात जो काही चुकीचा समज आहे. तो दूर करू, अशी आम्हाला खात्री आहे. त्यांच्या ज्या काही सहा सात गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत, त्याबाबत चर्चेतून मार्ग काढला जाईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर आरोप करताना त्यांनी त्या आरोपांची शहनिशा केली पाहिजे. त्यांच्या सुरक्षेची सरकारची हमी आहे, त्यामुळे त्यांच्यावर कोणीही हल्ला करणार नाही आणि बावनकुळेंबाबत संयम ठेवला तर त्यांचा सन्मान राहील, असे प्रसाद लाड यांनी सांगितले.
डॉक्टरांना मारहाण करणारा शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. म्हात्रे याला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात येणार असून त्याला महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे गोव्यात राहावं लागणार आहे. सशर्त जामीन मिळाल्यानंतर कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने हे प्रकरण न्यायप्रवीष्ठ आहे. न्यायालयावर माझा संपूर्ण विश्वास असून न्यायालय जो निर्णय देईल, तो मला मान्य आहे, असे म्हात्रे याने म्हटले आहे.
भारताला जगातील अग्रगण्य देश म्हणजेच 'विश्वगुरू' बनवायचे असेल, तर संपूर्ण समाजाने एकाच ताकदीने आणि एकजुटीने उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. खामगाव येथील एका कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक उत्तरदायित्व आणि मूलभूत गरजांच्या पुरवठ्यावर भर दिला. आपल्या भाषणात सरसंघचालकांनी स्पष्ट केले की, समाजात प्रत्येक कुटुंबाला आणि व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि आजीविका या सहा मूलभूत गरजा मिळणे आवश्यक आहे. ही स्थिती निर्माण झाल्याशिवाय समाज खऱ्या अर्थाने सक्षम होऊ शकत नाही. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, समाजातील वंचितांचा विकास केवळ सरकारवर सोडून चालणार नाही. स्वतंत्र देशातील सरकार निश्चितच मदत करते, परंतु समाजातील सुशिक्षित आणि सक्षम लोकांनी मागे राहिलेल्या बांधवांना सांभाळून घेण्याची आणि त्यांना पुढे आणण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. सर्व घटकांची ताकद समान झाल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही, असेही ते म्हणाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील ४३ हजार ६४७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल ३७४ कोटी ३१ लाख ४३ हजार ४८१ रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, या योजनेच्या निकषांमध्ये पात्र असूनही काही शेतकरी अद्याप कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित आहेत. अशा पात्र शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केली आहे.
पालकमंत्री राठोड यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमितीत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना पुढील काळात कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खामगाव येथील सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून परमपूज्य भय्यूजी महाराज यांनी पारधी आणि आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी सुरू केलेल्या कार्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे, असे प्रतिपादन ठाकरे गटाचे तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. खामगाव येथे आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या शुभहस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण पार पडले. या कार्यक्रमाला अंबादास दानवे यांची विशेष उपस्थिती होती.या प्रकल्पाअंतर्गत नव्याने उभारण्यात आलेले सभागृह तसेच बॅडमिंटन आणि टेनिस कोर्टसह विविध खेळांच्या मैदानांचे सरसंघचालकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे म्हणाले,आदिवासी आणि पारधी समाजातील बांधवांमध्ये मोठी क्षमता आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन, दर्जेदार प्रशिक्षण आणि भक्कम आधार दिला,तर देशाचे भविष्य उज्ज्वल करणारी नवी पिढी या समाजातून नक्कीच घडेल. भय्यूजी महाराजांचा हाच विचार होता आणि आज सरसंघचालकांच्या हस्ते या क्रीडा व इतर सुविधांचे लोकार्पण होत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत साई सुभाष निवासस्थानी राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षबांधणीसाठी काम करावे, अशा सूचना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केल्या.
राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष श्री. ठाकरे यांच्या आदेशानुसार नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आगामी काळात ‘गाव तिथे राष्ट्रवादीची शाखा’ हा संकल्प घेऊन पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नागपूरमध्ये निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण प्रक्रियेत (SIR) गैरप्रकार सुरु असल्याचा काँग्रेसनं आरोप केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारून मुख्यमंत्री कार्यालयावरही आरोप करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी या आरोपांवर बोलत नसल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या आरोपांवर माजी महापौर तथा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी बोलत आहेत मात्र ते मुद्द्यांवर उत्तर न देता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
नागरिकांना मिळालेला संविधानिक मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.
फॉर्म-8 च्या कथित गैरवापरातून मतदारांचे स्थलांतर करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. विशेषतः एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक मतदारांची नावे या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात हलवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील 2024 चे मतदार असलेल्या काही नागरिकांची नावे पालघर, नंदुरबार आणि पुणे यांसारख्या मतदारसंघात फॉर्म-8च्या माध्यमातून स्थलांतरित केल्याचा काँग्रेसचा दावा आहे.
या मतदारांचा संबंधित मतदारसंघांशी कोणताही संबंध नसताना त्यांची नावे तिथे कशी हलवण्यात आली? फॉर्म-8 ऑनलाइन भरले की ऑफलाइन? ऑफलाइन असेल तर तो अर्ज कोणत्या केंद्राने स्वीकारला? बीएलओने प्रत्यक्ष पडताळणी केली होती का?
या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून तथ्य समोर आणण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे भाजप या आरोपाला काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे..
शहरात झेन-झी (Gen Z) तरुणांना उद्देशून लागलेल्या बॅनरच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. हे बॅनर जाणीवपूर्वक लावण्यात आले असून त्यामागे भाजपच असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला त्यांनी पुन्हा पाठिंबा दर्शवत, हा केवळ नामकरणाचा नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्याचे स्पष्ट केले.
आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंडगार्डन परिसरातील वाहतुकीत शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून मोर्चा संपेपर्यंत बदल करण्यात आले आहेत.
मोर्चा शाहीर अमर शेख चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान काढण्यात येणार आहे.त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
आपत्कालीन सेवा,रुग्णवाहिका,अग्निशमन दल तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना प्राधान्याने मार्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे.
मालधक्का चौक, बोल्हाई चौक ते पुणे स्टेशन,साधू वासवानी चौक, जीपीओ, नरपतगिरी चौक, फोटोझिंका प्रेस आणि डॉ. बॅनर्जी चौक परिसरात वाहन पार्किंग करता येणार नाही.
चौकातून जहांगीर चौकमार्गे,तर शाहीर अमर शेख चौकातून कुंभारवेसमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.जीपीओ चौकातून बोल्हाई किंवा मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक-नेहरू मेमोरियल चौकमार्गे वळविण्यात येईल.
असे आहेत बदल
शाहीर अमर शेख चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे (मालधक्का चौक) जाणारी वाहतूक आरटीओ चौक-जहांगीर चौकमार्गे वळविण्यात येईल. आरटीओ
पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाण्यासाठी अलंकार चौकाचा मार्ग वापरावा. नरपतगिरी चौकातून मालधक्क्याकडे जाणारी वाहने १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, पवळे चौक आणि चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे कुंभारवेस चौकमार्गे जातील. बॅनर्जी जाणारी वाहतूक नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, पवळे चौक आणि कुंभारवेस चौकातून जातील.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील पाथरगाव जुना दगडी इंद्रायणी नदी पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुक बंद करुन पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.
त्याअन्वये पुण्याकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सुरु होताना कि.मी. ९४ येथून वळविण्यात आली आहेत. सोमाटणे फाटा येथून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तर वडगाव तळेगाव फाटा येथून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येणार आहेत.
तसेच मुंबईकडून पुणेकडे जाणारी अवजड वाहने खंडाळा एक्झीट येथून जुन्या हायवे वर येऊ न देता यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने , लोणावळा-कुसगाव टोलनाका किमी ५५ येथून यशवंतराव मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येत आहे. नवीन पुलावरुन दुचाकी, तीनचाकी, हलकी चारचाकी वाहने वळविण्यात येत असून मुंबई व पुणे या दोन्ही दिशांकडून येणारी अवजड मालवाहू वाहने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन वळविण्यात येत आहेत, असेही कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने आता ब्लॅक स्पॉट, अपघातप्रवण जंक्शन, खड्डे आणि महामार्गालगतची अतिक्रमणे यावर वेळबद्ध कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन करावे, अपघातप्रवण जंक्शनची सुधारणा सहा महिन्यांत करावी, तसेच जिल्ह्यातील रस्ते ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. महामार्गालगतची अतिक्रमणेही १५ दिवसांत हटवावीत, असेही त्यांनी संबंधित यंत्रणांना सांगितले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अधीक्षक अभियंता भरत कुमार बाविस्कर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात काल, दि. ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने संबंधित बँकांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील या ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची एकूण थकबाकी ३४५ कोटी २५ लाख ५ हजार ५९४ रुपये आहे. ही रक्कम थेट संबंधित बँकांकडे वर्ग झाल्याने पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची माहिती आहे.खासदारांनी PMO कडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. पुढील आठवड्यात भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्याची कुंभमेळ्यातील कामांची परिस्थिती समाधानकारक नसून प्रत्येक विभागाने अधिक वेगाने आणि समन्वयाने काम करण्याची गरज आहे. बैठकीत देण्यात आलेल्या सर्व सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, कुंभमेळ्याच्या कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. यावेळी शहरातील रस्त्यांची अवस्थाही अत्यंत बिकट असल्याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईत सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक पार पडली. या बैठकीस कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ आदी उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असून, शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आली.
आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये करण्यात येणाऱ्या संभाव्य उपवर्गीकरणाच्या (अ, ब, क, ड) विरोधात पुण्यात मंगळवारपेठ जुनाबाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार मोर्चा आहे. सकाळी 11 ला हा मोर्चा निघणार आहे. अनुसूचित जातींचे प्रलंबित प्रश्न, उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवणे आणि जातनिहाय जनगणना करण्याची प्रमुख मागणी या मोर्चाद्वारे केली जाणार.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांच्या कथित गैरवर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या आदेशानुसार, नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय समितीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिवसभर चौकशी करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले. तसेच, सीसीटीव्ही फुटेज, पोलीस ठाण्यातील नोंदी, तपासाची कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांची पडताळणी केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील 65 हजार 343 शेतकरी पात्र ठरले आहेत. पण, जिल्ह्यातील प्रमाणीकरण राहिलेल्या 17 हजार 696 शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांकडे अद्याप फार्मर आयडी उपलब्ध नाही. म्हणून हे पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. या शेतकऱ्यांनी तातडीने अॅग्रीस्टॅक (फार्मर आयडी) नोंदणी, आधार प्रमाणीकरण आणि बँकेकडील आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ठाण्यात शाळकरी मुलाचा ड्रग्ज सेवनाचा कथित व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे शाळकरी मुलांमध्ये अमली पदार्थांचा वापर वाढतोय का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. सदरचा व्हिडिओ एका खासगी शाळेचा असल्याच बोलले जात आहे. शाळेच्या गणवेशात हा विद्यार्थी शाळेच्या वर्गातच ड्रग्ससेवन करत असताना व्हिडिओतून दिसून येत आहे. संबंधित व्हिडिओची पडताळणी करून सदर शाळेचा शोध घेत असल्याची प्राथमिक माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांच्या कथित गैरवर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या आदेशानुसार, नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय समितीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिवसभर चौकशी करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले. तसेच, सीसीटीव्ही फुटेज, पोलीस ठाण्यातील नोंदी, तपासाची कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांची पडताळणी केली.
नाशिकच्या मनमाडचे नगरसेवक माजिद शेख यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सहा वर्षे निवडणुकीसाठी अपात्र ठरवले आहे. या प्रशासकीय कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
काॅक्रोच जनता पक्ष उपहासात्मक आंदोलकांचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यांच्या घरासमोर पोलिस अधिकाऱ्याला दिलेल्या वागणुकीवर महाराष्ट्र पोलिस बॉईज़ संघटना आक्रमक झाली आहे. अभिजीत दिपके यांना दिलेले पोलिस संरक्षण तत्काळ काढून घ्यावे, अशा मागणीचे निवेदन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी केला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत हा लढा संपूर्ण महाराष्ट्रात अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा तसेच बळ देण्याचा निर्धार मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, सीमाभाग यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रिव्हॉल्व्हर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 11 पिस्टल व 22 जिवंत काडतुसेसह साडेसात लाखांचा जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी मध्यप्रदेश मधील एका व्यक्तीसह चौघांवर विटा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव कार विहिरीत पडल्याची घटना जालन्यात घडली आहे. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी-पारध रस्त्यावरील पद्मावती फाट्याजवळ घटना घडली आहे. या घटनेत दोन महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून दोघेजण जखमी आहे. जखमींवर बुलढाणा येथे उपचार सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पारवा येथील अत्यंत गाजलेल्या महेश गावंडे हत्याकांडमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्वच दहा आरोपींना दोषी धरत जन्मठेप आणि गुन्ह्यातील कलमांनुसार इतर शिक्षा कायम ठेवल्या. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांनी हा निर्णय दिला. ही घटना राजकीय वैमनस्यातून घडली होती. महेश गांवडे तात्कालीन सरपंचाचे पती होते.
‘‘देशात सर्वाधिक खोटे ‘व्हिडिओ’ भाजप ‘आयटी सेल’कडून तयार केले जातात’’, असा गंभीर आरोप काॅक्रोच जनता पक्ष उपहासात्मक आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. ‘‘आंदोलनात आम्ही नुकसान केल्याचा एक तरी ‘व्हिडिओ’ दाखवा. माझ्यावर स्वतः शिक्षणाचे कर्ज आहे. मी नुकसानभरपाई कुठून देणार? मी ज्या ट्रकवर उभा होतो त्या ट्रकचा आरसा एका पोलिस अधिकाऱ्याने फोडला. ध्वनिक्षेपक यंत्रणेची तोडफोडही दिल्ली पोलिसांनीच केली. दिल्लीत जे काही नुकसान झाले ते पोलिसांमुळेच झाले. त्यामुळे त्याची भरपाई दिल्ली पोलिसांच्या पगारातून वसूल करावी’’, असेही दीपके म्हणाले.
इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावरील कबनूर (ता. हातकणंगले) येथे रील बनविण्याच्या नादात बंदुकीतून हवेत गोळीबार करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. हवेत फैरी झाडण्याच्या प्रयत्नात गोळी थेट त्याच्या डोक्यात घुसली आणि तो गंभीर जखमी झाला. नीलेश निशिकांत कांबळे (वय 20, रा. फुले वसाहत, कबनूर) असे त्याचे नाव आहे.
नीट-यूजी 2026च्या पेपरमधील प्रश्नांची माहिती फोडण्यात राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) पी. व्ही. कुलकर्णी (रसायनशास्त्र), मनीषा हवालदार (भौतिकशास्त्र), मनीषा मांढरे (वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र) या तीन विषय तज्ज्ञांचा सर्वात मोठा हात आहे असा दावा सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने 28 जुलै रोजी विशेष न्यायालयात 13 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्यासाठी पुण्यातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याच्या सोसायटीतील प्रवेश-नियंत्रण अॅपमधील नोंदी, बायोमेट्रिक माहिती, मोबाइल कॉल डिटेल रेकॉर्ड व लोकेशन विश्लेषणाचा महत्त्वाचा आधार घेण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.