मुंबई : येत्या १७ ते २० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार, ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांत दिसून येऊ शकते. या दरम्यान, विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार १८ ते २० मार्चदरम्यान हवामान बदलाची तीव्रता राहण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इराणची राजधानी तेहरान सध्या भीषण आगीच्या विळख्यात सापडलीय. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तेल साठवणूक करणाऱ्या टाक्या फुटल्यात. त्यातील तेल थेट शहरातील सांडपाण्याचे नाले आणि गटारांमध्ये मिसळले आहे. या तेलानं पेट घेतल्यामुळे तेहरानच्या रस्त्यांवर अक्षरशः 'आगीच्या नद्या' वाहत असल्याचं भयानक दृश्य पाहायला मिळतय. हल्ल्यानंतर तेहरानच्या आकाशात रसायनं आणि काळयाकुट्ट धुराचे लोट पसरलेत.
मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली. कल्याण स्टेशनजवळ अज्ञाताने वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला. यामुळे एक्सप्रेसच्या खिडक्यांच्या काचांचं नुकसान झालंय.तर या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय..तर दगडफेक करणारा आरोपी सनी कांबळेला अटक करण्यात आलीय..
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक मराठी कलाकारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सभासदत्व स्वीकारले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 9 मार्च रोजी 20 वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्यभरात सदस्य नोंदणीची मोहीम राबवण्याच्या सूचना केल्या होत्या.
महाराष्ट्रात लाचखोरीच्या घटना वाढत असताना जालन्यात दोन पोलिसांना एसीबीने रंगेहात पकडलं. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी पोलिसांनी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार मिळाली होती. सापळा रचून एसीबीने दोन्ही कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना पकडलं. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून पुढील चौकशी सुरू आहे.
खासदार संजय राऊत यांनी सिलिंडर तुटवड्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. नोटबंदीनंतर मोदींनी पुन्हा एकदा देशाला रांगेत उभं केलं अशी टीका राऊतांनी केली आहे.
आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम आता थेट शेतकऱ्यांवर दिसू लागला आहे. निर्यात आणि मागणी कमी झाल्यामुळे बाजारात भाजीपाला खरेदी घटली आहे. त्यामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर सुमारे 20 ते 30 टक्क्यांनी खाली आले आहेत. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद राहिल्यानेही मागणी कमी झाली. व्यापाऱ्यांना मोठे नुकसान होत असून पुढील काळात परिस्थिती आणखी कठीण होण्याची शक्यता आहे.
बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी जनता दरबार घेतला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विशेषतः अनेक महिलांनी आपल्या अडचणी मांडल्या. पवार यांनी प्रत्येकाची तक्रार शांतपणे ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. महिलांच्या प्रश्नांवर प्राधान्याने कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
त्र्यंबकेश्वर मंदिरात एका भाविकाला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आता या प्रकरणाची चौकशी होणार असून याबाबतचे आदेश जिल्हा न्यायाधीशांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीची बैठक पार पडणार आहे. विधीमंडळात मुख्यमंत्री सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीसाठी कुंभमंत्री गिरीश महाजनांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
जालन्यातील जाफराबाद पंचायत समिती कार्यालयातच देयक मंजुरीसाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद पंचायत समिती कार्यालयात विस्तार अधिकारी बी. ए. चव्हाण यांनी देयक मंजूर करण्यासाठी पैसे घेतल्याचा हा व्हिडिओ आहे. विशेष म्हणजे ही रक्कम पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यासमोर विस्ताराधिकाऱ्यांनी घेतल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे ही घटना उघडकीस येताच प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत यापूर्वी पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून देणाऱ्या इम्तियाज जलील यांनी दावा केल्याप्रमाणे नवा धमाका केला. पत्रकार परिषद घेत इम्तियाज जलील यांनी आता या घोटाळ्यात थेट भाजपचे मंत्री अतुल सावे यांचे नाव घेतले आहे. सावे यांच्या आदेशानेच रमाई आवास घोटाळा झाल्याचा नवा खळबळजनक दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे.
Strait of Hormuz crisis : अमेरिका-इस्राइल आणि इराणमधील युद्धामुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. या चर्चे दरम्यान पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबद्दल आणि नागरिकांचे होत असलेले मृत्यू आणि नागरी पायाभूत सुविधांचे होत असलेल्या नुकसान या बाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तर भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षितता तसेच वस्तू आणि ऊर्जा पुरवठ्याची अखंड वाहतूक कायम ठेवणे ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं मोदींनी सांगितलं.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेच्या 22 व्या हप्त्याची रक्कम देशभरातील 9 कोटी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पाठवली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.