Live Update 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Update : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज रविवार, दिनांक 11 मार्च 2026 रोजीच्या राज्यासह देश आणि जगभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

राज ठाकरे यांनी व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप

राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला आहे. पदाधिकाऱ्यांना झापताना त्यांनी म्हटलं की, तुम्ही खाली काय करतात या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात. कुणी काय काय काम केले हे मला आता बघायचं आहे. मी आता सगळ्या गोष्टींची शहानिशा करणार आहे. त्यात जर काही गोष्टी पुढे आल्या तर सोक्षमोक्ष लावेल. सगळ्या गोष्टींचा मजाक बनवला आहे. जर नवीन काही करायचे नसेल तर पक्षाच्या नवनिर्माण नावाला काय अर्थ आहे. सदस्य नोंदणी कुणी काय केलं याचे आकडे समोर येईलच, १९ तारखेला स्वारी आहे आपली असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

सोलापुरात नाथ संकुलातील 7 मजली इमारतीमध्ये आगीचे थैमान; अग्निशामकदलाने मिळवले नियंत्रण

सिव्हिल हॉस्पिटल जवळील सात मजली इमारतीमधील तळमजल्यातील दुकानाला आग लागल्याने परीसरात घबराहाट निर्माण झाली होती.

- सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक यंत्रणाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

- सिविल हॉस्पिटलजवळील परिसरात धुराचे लोट पसरले होते.

रायगडच्या पालक मंत्री पदाबाबत चर्चा झाली नाही; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील - खा. तटकरे

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न लवकर सुटणार नाही असंच दिसतं आहे. कारण रायगडच्या कर्जतमध्ये पालकमंत्री पदाबाबत विचारलेल्या प्रश्नानंतर खा. सुनिल तटकरे यांनी पुन्हा एकदा निर्णयाबाबत वरिष्ठांच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे.

रायगड जिल्हा परिषदेतील संघर्षाबाबत झालेल्या महायुतीच्या बैठकीत पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली नसल्याच खा. सुनिल तटकरे यांनी दिली आहे. तर याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील असे सांगत तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या प्रश्नाला बरोबर बगल दिली आहे.

लोकसभा अध्यक्ष यांच्या विरूध्दचा अविश्वास प्रस्ताव रद्द; फेटाळला प्रस्ताव

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव रद्द केला गेला आहे, आवाजी मतदानाने हा प्रस्ताव फेटाळला आहे. विरोधकांचा पुन्हा एकदा डाव फसल्याचे दिसुन येत आहे.

गॅसच्या तुटवड्यामुळे काळाबाजार रोखण्यासाठी जालन्यात प्रशासन सज्ज

जालन्यात घरगुती गॅसचा काळाबाजार थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. जालना जिल्ह्यात तालुकास्तरावर तपासणी पथके स्थापन करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलले आहेत.

जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना गॅसचे वितरण व्यवस्थित नियमित नियंत्रित करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

पुणे येथे तरुणाची हत्या, किरकोळ वादातून मारहाण CCTV व्हायरल.. 

पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसतं आहेत, पुण्यात आज (ता.11) तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तरुणाची हत्या करतानाचा CCTV व्हायरल होत आहे.

किरकोळ वादातून मारहाण आणि तरुणाची हत्या करण्यात आली असून ही घटना पुण्यातील कॅम्प परिसरातील घडली आहे.

नाशिकमधील धक्कादायक घटना, दहावीच्या विद्यार्थ्यावर 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून जीवघेणा हल्ला 

नाशिक शहरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरामधील भद्रकाली परिसरात असलेल्या न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटसमोर बुधवारी (ता.11 मार्च) दुपारी दहावीच्या विद्यार्थ्यावर 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं प्राणघातक हल्ला केल्यानंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बोर्डाचा पेपरनंतर संबंधित विद्यार्थी केंद्राबाहेर आल्यानंतर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

राज्यातील शिर्डी, पंढरपूर यांसारख्या धार्मिक स्थळांनाही गॅस तुटवड्याची झळ

जागतिक पातळीवरील अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची झळ भारतालाही छोट्या मोठ्या प्रमाणात बसण्यास सुरुवात झाली आहे. तर घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाली आहे. हॉटेल, मंगलकार्यालये, खानावळींसह आता धार्मिक स्थळांनाही या गॅस तुटवडाचा फटका बसल्याचं समोर येत आहे. राज्यातील शिर्डी, पंढरपूर यासारख्या प्रसिद्ध धार्मिक स्थळावरील अन्नछत्रांमध्येही गॅस तुटवड्याची झळ बसत आहे. अन्नछत्र सुरू राहण्यासाठी मंदीर प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यास सुरुवात झाली आहे.

उल्हास खोऱ्यातील 78 टीएमसी पाणी मराठवाडा अन् उत्तर महाराष्ट्रात वळविणे शक्य: CM फडणवीसांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यातील नदीजोड प्रकल्प अत्यंत वेगाने पुढे सुरू असल्याची माहिती दिली आहे. तसेच हा प्रकल्प नेहमी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी मोठं वरदान ठरणार असल्याचं नमूद केलं. त्याचवेळी त्यांनी उल्हास खोऱ्यातील 78 टीएमसी पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वळविणे शक्य असल्याची माहिती सभागृहात दिली. यासाठी एकूण सुमारे 87 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं.

युद्धाचा फटका! अहिल्यानगर शहरातील हॉटेल व्यवसाय येत्या दोन ते तीन दिवसात बंद होण्याची चिन्हे

इराण इजराइल अमेरिका युद्धाचा फटका आता थेट भारताला बसताना दिसून येत असून आता याची सुरूवात हॉटेल व्यवसायापासून सुरू झालेली दिसून येत आहे. अहिल्यानगर शहरातील हॉटेल व्यवसाय येत्या दोन ते तीन दिवसात बंद होण्याची चिन्हे असून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे ही परिस्थिती ओढणार आहे. मात्र जिल्हा प्रशासन अहिल्यानगर जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस टाक्या मुबलक प्रमाणात असल्याचा दावा करत आहे.

शिवसेना आमदारानेच उघड केला मोठा जमीन घोटाळा

शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज मोठा जमीन घोटाळा उघडकीस आणला. या धक्कादायक प्रकरणाने महसूल मंत्री आश्चर्यचकित झाले. याप्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आदिवासींची जमीन कोणत्याही प्रकारे बक्षीस पत्र करून हस्तांतरित केली जात नाही. मात्र नवापूर येथील प्रकरणात एका व्यापाऱ्याने ही जमीन खरेदी केली. महामार्गाच्या भूसंपादनासाठी तिचे मूल्यांकन ४० लाख रुपये करण्यात आले.

गोकुळमधील मुश्रीफांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली?

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संदर्भात सर्वोच्च न्यायालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी १२०० सभासदांच्या पात्रतेबाबत धाव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर सर्किट बेंचला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. अशी माहिती गोकुळचे वकील पृथ्वीराज पाटील यांनी दिली. दरम्यान या याचिकेमध्ये प्रतिवादी करण्यात आलेल्या प्रकाश बेलवाडे यांच्याकडून ही माहिती खोडून काढत मंत्री हसन मुश्रीफ यांची याचिका फेटाळण्यात आली असल्याचा दावा केला आहे.

आखाती युद्धामुळे सांगलीत व्यवसायिक गॅसचे दर भडकले, वाहनांच्या गॅस दरात 25 रुपयांची वाढ

आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम थेट आता सांगलीच्या एलपीजी गॅस दरावर झालाय, इंधनाचा तुटवडा नसला तरी वाढलेल्या गॅस दरामुळे वाहनधारक आत्ताच हैराण झाले आहेत,गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती देखील वाहनधारकांच्या मध्ये निर्माण झाल्याने एलपीजी गॅस पंपांवर आता वाहनांच्या विशेषता रिक्षाचा मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळतंय. 55 रुपया किलो मिळणारा गॅस आता आखाती देशातल्या युद्धाच्या स्थितीमुळे 80 रुपये इतका झाला आहे. तब्बल 25 रुपयांनी गॅसच्या दरात वाढ झाली आहे.

बुलढाण्यात २४ तासांत ७ महिला बेपत्ता

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढ झाल्याचे दिसत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातून धक्कादायक बाबन समोर आली आहे. येथे मागील २४ तासांत ६ मुली आणि एक विवाहिता बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगाव एरंडोल येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार

एरंडोल येथील लांडापुरा भिलाटी परिसरात चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन 

गॅस दरवाढीच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. सोलापूर काँग्रेसच्या वतीने गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अत्यंयात्रा काढत निषेध व्यक्त कण्यात आला. सोलापूरातील काँग्रेस भवन कार्यालयापासून जिल्हापरिषद कार्यालयापर्यंत हे तिरडी आंदोलन करण्यात आले. तसेच नरेंद्र झाले सरेंडरच्या घोषणा देण्यात आल्या.

सरंपच बेपत्ता प्रकरणाचा तपास एसआयटीकडे 

भुदरगड तालुक्यातील पाटगावचे सरपंच महेश पिळणकर हे बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या मागणीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी एसआयटीची स्थापना केली आहे. गडहिंग्लज विभागाचे पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले यांची एसआयटीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण करून अंतिम मतदार यादी आज १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या अंतिम यादीनुसार मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे.

पुनर्वसन महासंचालनालयाच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुनर्वसन महासंचालक कार्यालयामार्फत १३ मार्च २०२६ रोजी बॉम्बे इंजिनिअर गट आणि केंद्र, खडकी, पुणे - येथे माजी सैनिकांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व माजी सैनिकांनी ओळखपत्र आणि पाच प्रती बायोडाटा छायाचित्रासह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

Pune SSC Paper Leak Case : पुण्यात दहावीचा गणिताचे पेपर परीक्षेआधी लीक

राज्यभरात सध्या दहावीची परीक्षा सुरू असतानाच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात दहावीचा गणिताचे पेपर परीक्षेआधी लीक झाल्याची घटना समोर आली आहे. गणिताच्या पेपर आधी गणित भाग-1 आणि भाग-2 चे पेपर एका टेलिग्राम ग्रुपवर पाठवण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे गणित भाग-2 चा पेपर तीन दिवस आधीच टेलिग्राम ग्रुपवर शेअर करण्यात आला होता.

कोल्हापूर महापालिकेच्या अधिकारी दोन हजारांची लाच घेताना सापडला

कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा मुख्य अधिकारीचा दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने लावलेल्या रंग विक्रीच्या स्टॉलवर कारवाई न करण्यासाठी लाच मागणारा अधीक्षक विलास साळोखे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. 10 मार्च) करण्यात आली. साळोखे याला सध्या अटक करण्यात आली आहे.

जीवनावश्यक सेवांसाठी पेट्रोल-डिझेलचा साठा राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

धाराशिव जिल्ह्यात शासकीय वाहन, जीवनावश्यक सेवा यांच्यासाठी पेट्रोल डिझेलचा साठा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून पेट्रोलपंप चालकांना प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. शिवाय पेट्रोल पंपावर कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल देण्यास बंदी घातली आहे.

अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला करण्याचा इशारा

इराणने मंगळवारी अरब देशांतील अमेरिकी तळांना पुन्हा लक्ष्य करतानाच होर्मुझ सामुद्रधुनीतील ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांना आणि तेलवाहतुकीलाही लक्ष्य केले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर आतापेक्षा २० पटींनी अधिक तीव्रतेचे हल्ले करण्याचा इशारा दिला आहे.

एलपीजी तुटवड्यासंदर्भात केंद्राकडून उपाययोजना

देशातील ‘एलपीजी’ गॅसपुरवठ्यातील तुटवडा नियंत्रित करण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. ‘एलपीजी’चे देशांतर्गत उत्पादन वाढवून घरगुती ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.

काँग्रेस आणि वंचितकडून नागपुरातील संघांच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या मुख्यालयासमोर २३ मार्चला धरणे आंदोलन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेकडे गहाण ठेवले आहे. अमेरिकेतील एपस्टीन फाईलमध्ये मोदींचे नाव आले आहे. या फाईल संबंधित अनेक नेत्यांना त्या त्या देशांनी पदावरून पायउतार केले आहे. मात्र मोदी यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही की त्यांनी या प्रकरणी काहीही खुलासा केलेला नाही. अशा व्यक्तीला पंतप्रधानपदी कसे काय ठेवू शकता, याच जाब विचारण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT