Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Updates: कोकणातील रत्नागिरीला भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज गुरुवार, दिनांक 12 मार्च 2026 रोजीच्या राज्यासह देश आणि जगभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

कोकणातील रत्नागिरीला भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

कोकणातील रत्नागिरीला भूकंपाचा धक्का बसल्याचं समोर येत आहे. या भूकंपाच्या धक्क्यानं कोणत्याही प्रकारचं नुकसान न झाल्याचं सांगितलं जात आहे. पण या भूकंपाच्या धक्क्यामुळे रत्नागिरी शहरात रात्री 8.10 वाजता भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरीक आपआपल्या घरातून तत्काळ बाहेर आले. हा धक्का 2.8  रिश्टर स्केलचा असल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी: नागपूर ते नांदेड विमानसेवा पुन्हा सुरू होणार 

विदर्भातील नागपूर ते मराठवाड्यातील नांदेड या दोन प्रमुख शहरांना जोडणारी विमानसेवा 31 मार्च 2026 पासून पुन्हा सुरू होत आहे. हा विमानप्रवास 50 मिनिटांचा असणार आहे. तसेच या विमान प्रवासाचं तिकीट दर 2 हजार 326 रुपयांपासून सुरू होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शुक्रवार वगळता ही सेवा आठवड्यातून सहा दिवस सुरू असणार आहे.

13 14 आणि 15 मार्चला दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता..

पुढील दोन दिवसात मुंबई आणि उत्तर कोकण भागात अति उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने सांगितला आहे. मागील 24 ते 48 तासांमध्ये उत्तर कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट उसळली आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सध्या सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होताना दिसून आली आहे.

13 14 आणि 15 मार्च रोजी दक्षिण महाराष्ट्र आणि राज्यातील काही भागातील विजांच्या कडकडाटासह पावसाची देखील शक्यता वर्तवली आहे.

Pune News : पुणे जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी...

पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू असल्याचेही जिल्हा प्रशासनाची माहिती आहे.

पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असून कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही, पुणे जिल्हा प्रशासनाने दिली माहिती आहे.

Dhule News : पाटील पिता पुत्र खून खटल्यात कोर्टाचा निकाल, 11 जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा...

देवपुरातील रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या बाप-लेकाच्या खुन खटल्यात माजी नगराध्यक्ष बाजीराव पवारांसह 11 जणांना धुळे न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

धुळे शहर येथील देवपुरात 8 जून 2018 या दिवशी रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पित्रा पुत्राची जमावाने निघृण हत्या केली होती, या खटल्याचा अखेर निकाल आज (ता.12) धुळे न्यायालयाने दिला असून, तब्बल 8 वर्षानंतर न्यायालयाने दोशींना शिक्षा सुनावली आहे.

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बजेटला यावर्षी कपात...

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बजेटला यावर्षी जवळपास तब्बल 8 कोटी रुपयांना कात्री लावण्यात आली आहे. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 34 कोटी 8 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सर्वातजास्त बजेटमधील तरतूद बांधकाम विभागालाच देण्यात आले आहे. तर उत्पन्न वाढीच्या दृष्टीने जिल्हा परिषद आवारात कॅन्टीन, गाळे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी अर्थसंकल्प जाहिर केला.

AAditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी नायगावमधील बीडीडी पुनर्वसन इमारतीची केली पाहणी

आदित्य ठाकरे यांनी नायगावमधील बीडीडी पुनर्वसन इमारतीची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ आणि श्रद्धा जाधव याही होत्या. याच घरांचे येत्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाटप केले जाणार आहे. त्यापूर्वीच आदित्य ठाकरेंनी या घरांची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून त्याबाबतची माहिती घेतली.

Jay Pawar : अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी पुढील आठवड्यात पत्रकार परिषद घेणार : जय पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाची पायलट पिंकी माळी हिच्या कुटुंबीयांची खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी सांत्वनभर भेट घेतली. अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मी पुढील आठवड्यात पत्रकार परिषद घेणार आहे. पिंकी माळीच्या आईची तब्येत अजूनही बरी नाही, याप्रकरणी मी एका डॉक्टरांशी बोललो आहे, असे जय पवार यांनी सांगितले.

Sunetra Pawar : माळेगाव काखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अधक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजितदादांच्या जागी संचालक म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली, त्यानंतर अध्यक्षपदाची धुराही त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Loksabha News : भारतात पेट्रोल-डिझेलची कोणतीही अडचण नाही : पेट्रोलियम मंत्री पुरी; काँग्रेस खासदारांकडून घोषणाबाजी

भारत देश ४० देशांकडून क्रूड ऑईल घेतो, त्यामुळे देशात सध्या पेट्रोल डिझेलची कोणतीही अडचण नाही. आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सरकार सज्ज आहे. सीएनजीचा पुरवठा शंभर टक्के होत आहे. सध्या चिंतेंचे कोणतेही कारण नाही, असा दावा पेट्रोलिय मंत्री हरदिपसिंह पुरी यांनी केला. दरम्यान, एपस्टिन फाईलच्या मुद्यावरून काँग्रेस खासदारांनी पुरी यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी केली.

लोकसभेत राहुल गांधी बोलत असताना सत्ताधारी खासदारांचा गोंधळ

गॅस टंचाईबाबत लोकसभेत चर्चा सुरू असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असताना सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. राहुल गांधी यांनी एपस्टिनचा उल्लेख केल्याने गोंधळाला सुरुवात झाली. दरम्यान सध्या पेट्रोलियमंत्री हरदीपसिंह पुरी बोलत आहेत, त्यांच्या भाषणामुळे विरोधी पक्षाचे सदस्य घोषणाबाजी करत आहेत.

शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाबाबतच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल सध्या युक्तीवाद करत आहेत. आम्ही आजच युक्तिवाद करायला तयार आहोत, आम्हाला युक्तिवाद करायला दोन तासांचा कालावधी द्या, अशी विनंती करून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. दरम्यान, आम्हीही युक्तिवाद करायला तयार आहोत, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वकिलांनी स्पष्ट केले.

Ganpatipule Mandir : गॅस तुटवड्यामुळे गणपतीपुळे मंदिरातील लाडूचा प्रसाद बंद

गॅस तुटवड्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील मंदिरात मिळणारा लाडूचा प्रसाद बंद करण्यात आला आहे. गॅस तुटवड्यामुळे आता लाडू बनविणे बंद झाले आहे. यापुढेही सिलिंड मिळालं नाही तर मंदिरात मिळणारी खिचडीही बदं करावी लागण्याची परिस्थिती आहे. आणखी दोन ते तीन दिवस खिचडी प्रसाद मिळेल इतकाच गॅस शिल्लक असल्याची माहिती गणपतीपुळे मंदिर प्रशासनाने दिली आहे.

एसटी महामंडळाच्या हिरकणी बसने घेतला पेट, अमरावतीच्या दर्यापुरातील घटना

अकोटवरून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या हिरकणी बसने पेट घेतल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या दर्यापुरात उघडकीस आली आहे. बस मधील तांत्रिक बिघडण्याचं कारण यामागे सांगितले जात आहे. चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र एसटी महामंडळाच्या बसने पेट घेतल्यानं नुकसान झाले. दर्यापुरातील रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडली. दर्यापूर नगर परिषदेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचा कार्य सुरू आहे, यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

गॅसचा तुटवडा भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे, दांडी मार्चची प्रेरणा घेऊन आंदोलन करण्याची गरज: हर्षवर्धन सपकाळ

आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला भाजपा सरकारचे चुकीचे धोरण व नाकर्तेपणामुळे झाला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला भासत आहे. इंग्रजांनी मीठावर कर आकारला त्यावेळी महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी १९३० साली दांडी मार्च काढून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले होते, त्याची प्रेरणा घेऊन जनतेने आज आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, चौघे जण गंभीर जखमी

नागपूर मुंबई महामार्गावर जळगावात हरताळा फाटा इथं एका कारने चौघांना उडवल्याची घटना घडलीय. राँग साइडने आलेल्या कारनं धडक दिल्यानं चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या कारला दोन नंबर प्लेट आहेत. अपघातानंतर कारमधील व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. जखमींवर उपचार सुरू आहे.

नंदुरबार जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा चार दिवसांपासून ठप्प....

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद असल्याने हॉटेल व्यवसाय आणि लग्नसमारंभांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. गॅस कंपन्यांकडून पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि केटरिंग व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय चालतो. मात्र व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीला महायुती म्हणून पाठींबा देण्यासाठी शिवसेनेची हजेरी, दिड महिन्यांच्या वादावर पडदा पडला

रायगड जिल्हा परिषदेकरिता अखेर भाजपला अध्यक्ष पद तर राष्ट्रवादीला उपाध्यक्ष पद देण्याचा निर्णय मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह तिन्ही पक्षातील वरिष्ठांच्या बैठकीत झाला. यानंतर आज भाजप आणि राष्ट्रवादीला पाठींबा देण्यासाठी शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी हजेरी लावली. यावेळी वरिष्ठांच्या आदेशाने भाजप आणि राष्ट्रवादीला पाठींबा देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत. तर मागील दिड महिन्यांच्या वादावर आता पडदा पडल्याचे विकास गोगावले यांनी सांगितले आहे.

सांगलीतील अनेक हॉटेल्स मध्ये कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक...

आखाती देशांमध्ये सुरू असणाऱ्या युद्धाचा परिणाम आता सांगली जिल्ह्यावर देखील होऊ लागलाय. सांगली जिल्ह्यातील हॉटेलला पुरवठा करण्यात येणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा जवळपास ठप्प होत आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक हॉटेल्समध्ये सध्या कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करण्याचे काम सुरू आहे. तसेच नाष्टासह सांगलीकरांचा आवडता चहा देखील आता अनेक हॉटेलमध्ये बंद करण्यात आलेत. याचबरोबर चायनीज पदार्थ देखील सांगलीमध्ये मिळणे बंद झालेत. यामुळे सांगलीतील हॉटेल व्यवसाय आता 40 टक्क्यावर आला आहे.

Nashik Rickshaw Fare नाशिकमध्ये रिक्षा चालकांनी  रिक्षा प्रवासाचे दर वाढवले

युद्धाच्या झळा नाशिककरांनो तुमच्या खिशालाही बसणार आहेत... LPG गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्यानं रिक्षाचालकांनी पहिल्या टप्प्याच्या भाड्यात 10 रुपयांची वाढ केलीय.... इंधन दरवाढ आणि देखभाल खर्च परवडत नसल्यानं रिक्षाचालकांनी हा निर्णय घेतलाय... त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांचं बजेट कोलमडणार आहे...

Sambhajinagar Congress संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून आंदोलन

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी चूल पेटवून केंद्र सरकार आणि प्रशासनाचा निषेध केला.

Gas Distribution : कोल्हापूरात पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वितरण

कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण सुरू आहे. भर उन्हात नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. दरम्यान गॅस वितरण करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्राबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.

हार्दिक पांड्याविरोधात पुण्यात पोलिसांत तक्रार; ध्वजाच्या सन्मानावरून वाद

न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या उत्सवात क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या एका कृतीवरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय ध्वजाच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत पुण्यातील एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या घटनेवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून काही जण समर्थन तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुण्यात तरूणीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून एका तरुणाने कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशभर एलपीजी सिलिंडर तुटवड्यावर संसदेत काँग्रेसचा जोरदार निषेध

देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याच्या बातम्यांवरून काँग्रेसने संसद परिसरात आंदोलन केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते या आंदोलनात सहभागी झाले. सर्वसामान्य नागरिकांना गॅस मिळण्यात अडचणी येत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत पुणे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या मिशन लक्ष्यवेध या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पुणे विभागात विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रामध्ये अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, हॉकी, रायफल शूटिंग, रोईंग, कुस्ती आणि टेबल टेनिस या आठ खेळांचा समावेश असून प्रत्येक खेळासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

चार जागा बाॅम्बने उडवण्याची धमकी

विधान परिषद राम शिंदेंनी सांगितले की, विधान भवनासह, स्टाॅक एक्सचेंज, मेट्रो, बँक यांना देखील बाॅम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. आवश्यक ती खबरदारी राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे. बाॅम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू आहे. धमकीचा मेल 6.57 वाजता आल्याचे देखील सभापती शिंदे यांनी सांगितले.

विधानभवन बाॅम्बने उडवण्याची धमकी

विधान भवनात बाॅम्ब ठेवल्याचा ईमेल करण्यात आला होता. तसेच ईमेलमध्ये विधानभवन उडवण्याची धमकी देण्यात आली होती. विधानभवनात पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवले जात असून सुरक्षेसाठी विधानभवनातून सर्वांना बाहेर काढण्यात येत आहे.

पीएमपीच्या अध्यक्षपदाची IAS महेश आव्हाड

पीएमपीच्या अध्यक्षपदाची सुत्र आता IAS महेश आव्हाड यांच्याकडे असतील. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या सीईओपदावरून आव्हाड यांची बदली पीएमपीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.

नवीन ऑटोरिक्षा, टॅक्सी परवान्याकरिता इरादापत्र देण्याचे काम स्थगित

परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 9 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीत ऑटो रिक्षा टॅक्सी परवान्यांचे खुल्या धोरणास स्थगिती देण्यात आली आहे, त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन ऑटोरिक्षा, टॅक्सी परवान्याकरिता इरादापत्र देण्याचे काम स्थगित करण्यात येत आहे, याची सर्व ऑटोरिक्षा चालक, मालक, अर्जदार, संघटना यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT