अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा सध्या कुवेतमध्ये अडकला आहे. चार दिवसांपासून कुवेतमधील एका हॉटेलमध्ये तो आहे. अशातच अभिनेत्री सुभेदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मदतीसाठी आवाहन केलं आहे.
मध्यपूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय विमानसेवेला बसलाय. मुंबईहून आखाती देशातील विमानांचे उड्डाण अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आलेय. यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसलाय...
बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी येथे ग्रामस्थांचे साखळी उपोषण आज सहाव्या दिवशीही सुरू असून, जिल्हा प्रशासनाकडून पूर्णतः दुर्लक्ष केल्या जात आहे. सिंदखेडराजा तहसीलदारांवर कारवाई करावी, रेती उपसा प्रकरणाची चौकशी करावी, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल ग्राह्य धरावा तसेच आतापर्यंत झालेल्या रेती उत्खननाचे पंचसमक्ष मोजमाप करावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला आहे. व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357
पुणे शहर आणि परिसरातील विविध विकासकामे आणि प्रकल्पांच्या संदर्भात केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या विविध विभागाची नुकतीच बैठक संपन्न झाली.यावेळी पुणे शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या १६ विकासप्रकल्प आणि कामांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
अमेरिका आणि इस्त्राईलने इराणवर हल्ला केल्यानंतर आखाती देशांमध्ये संघर्ष वाढला आहे. त्यामुळे विमान सेवांवरही परिणाम झाला असून गेल्या काही दिवसांपासून भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूही दुबईत अडकली होती. पण ती नुकतीच सुरक्षितपणे भारतात परतली आहे. तिने सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली असून तिने सांगितले की ती बंगळुरूमध्ये तिच्या घरी परतली.
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावरून राजकारण तापले आहे. जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पालकमंत्री पद रिक्त असल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठकही होऊ शकलेली नाही. यावरून काँग्रेसचे माजी मंत्री के.सी.पाडवी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. नंदुरबार हा केंद्र सरकारने आकांक्षी जिल्हा म्हणून घोषित केलेला असताना देखील विकास कामांना गती मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.
महाराष्ट्र ATS च्या पथकाकडून मुंबईतील कुर्ला आणि गोवंडी परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. ही छापेमारी ISIS शी कथित संबंध असलेल्या प्रकरणाच्या तपासात करण्यात आली असून काही व्यक्तींची चौकशी देखील सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी इराणचं सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या हत्येनंतर भारत सरकारनं घेतलेल्या भूमिकेवर टीका केलीय. ही हत्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन असून भारताचे मौन ही तटस्थता नसून जबाबदारीतून पळ काढल्यासारखं असल्याचं त्यांनी म्हटल आहे. यावर संसदेत चर्चा व्हायला हवी आणि भारताने आपली भूमिका स्पष्टपणे मांडून नैतिक सामर्थ्य दाखवावं असं आवानही सोनिया गांधींनी केलंय.
“नशा मुक्त नवी मुंबई” अभियानांतर्गत अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईचा पुढील टप्पा म्हणून नवी मुंबई पोलिसांनी होळीच्या मुहूर्तावर 18 कोटी 63 लाख 34 हजार 266 रुपयांच्या किमतीचे अमली पदार्थ नष्ट केले. हे अमली पदार्थ 55 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आले होते.
आज खग्रास चंद्रगहण असल्याने ग्रहणकाळात साईदर्शन बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आलाय. खग्रास चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू होवून सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी संपणार आहे. या काळात भाविकांसाठी साईदर्शन बंद ठेवण्यात येणार असून साई समाधीवर दुर्वा, तुळशीपत्र यांचे आच्छादन ठेवून मंत्रोच्चार सुरू राहणार आहेत. ग्रहण कालावधी संपल्यानंतर साईबाबांचे मंगलस्नान पार पडेल आणि धुपारती झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन पूर्ववत सुरू होईल.
मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता जरांगे पाटील शेतकरी कर्जमाफीसाठी आणि हमीभावासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. तशी घोषणा जरांगे यांनी करमाळ्यात बोलताना केली आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी एकत्र आले पाहिजे. तुमचे कर्ज ठेवत नाही. शेतीमालाला आणि दूधाला हमीभाव कसा मिळत नाही ते मी पहातो. पीक विमा सुध्दा मिळवून देतो. तुम्ही फक्त चल म्हटलं की माझा सोबत आलं पाहिजे. शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी सज्ज राहावे, असे आवाहन ही जरांगे पाटील यांनी केले.
इस्त्रायल-इराण युद्धाचा फटका महाराष्ट्रातील निर्यातदारांवरही झाला आहे. जालना, मुंबई, नाशिक आणि नागपूर इथून दुबईकडे जाणारी कांदा, मका, मिरची, टोमॅटो आणि डाळिंबाची निर्यात सध्या ठप्प झाली आहे. सुमारे 370 कंटेनर मालासह दुबईमध्ये अडकून पडले आहेत. दुबईस्थित New STS Trading Company चे संचालक सर्जेराव गायकवाड यांनी सांगितले की, आर्थिक संकट तीव्र होत असून सरकारच्या तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे.
आरोग्य विमाच्या कॉन्फरन्ससाठी गेलेले राज्यातील सुमारे 400 विमा प्रतिनिधी दुबईत अडकले. दुबई सरकारकडून अडकलेल्या भारतीयांची मोफत राहण्याची व्यवस्था केली आहे. विमा कंपनीतर्फे आयोजित कॉन्फरन्ससाठी सोलापूरसह राज्यभरातील 370 विमा प्रतिनिधी 27 फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते.
नागपूर इथल्या एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात पोलिसांकडून 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कंपनीचा मालक आलोक चौधरी हा अद्याप पसार आहे. पोलिसांच्या तीन पथकांकडून अलोक चौधरीचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 कामगारांचं मृत्यू झाला असून, 22 कामगार गंभीर जखमी आहे. त्यात 12 जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण 24 परगणा इथल्या मथुरापूर इथं एका जनसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमित शाह म्हणाले, "बंगालने खूप काही सोसलं आहेत. अनेक वर्षांपूर्वी बंगालला उद्ध्वस्त केलं होतं. एकेकाळी बंगाल हे एक समृद्ध आणि आनंदी राज्य होतं. ममता दीदींनी या राज्याला गरिबीच्या दलदलीत ढकललं. आता रवींद्रनाथ टागोर यांचं 'सोनार बांग्ला' स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे."
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis हे स्वतः विविध यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधत असून केंद्र सरकारशीही समन्वय ठेवत आहेत. राज्याचे मंत्री Girish Mahajan यांना समन्वय कार्याची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडूनही राज्याला सर्वतोपरी मदत केली जात आहे. दुबईतील Indian People Forum यांच्या समन्वयाने महाराष्ट्र सरकारने मदतीसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. मदतीची गरज असलेल्या नागरिकांनी +97150 365 435 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या गावांमध्ये सौम्य धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. अचानक जमिनीला हलकासा कंपन जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.