दुबई येथे गेलेल्या पुणे जिल्ह्यातील नागरिकांपैकी आतापर्यंत १२८ नागरिक सुखरूप पुण्यात परतले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील एकूण २४६ नागरिक दुबई येथे गेले होते. त्यापैकी काल १११ नागरिक पुण्यात परतले होते. आज आणखी १७ नागरिक पुण्यात पोहोचले असून आतापर्यंत एकूण १२८ नागरिक सुखरूप परतले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणे, पायाभूत सुविधांचा विस्तार करणे, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि सामाजिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढविणे या चार प्रमुख उद्दिष्टांचा समावेश असल्याने यंदाचा अर्थसंकल्प हा योग्य ती अंमलबजावणी झाल्यास राज्याला गतीमान विकासाकडे नेणारा ठरेल असा विश्वास दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप.बँक लि. चे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणात बचाव पक्षाने मागीतलेली डिजीटल पुराव्यांची प्रत अद्यापही मिळाली नसल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर आज शुक्रवारी पुरावे देण्याचे निर्देश न्यायालयाने अभियोग पक्षाला दिले. यावर हार्ड डिस्क ओपन होत नसल्याने फॉरेन्सिक एक्सपर्टकडून हा डेटा पेन ड्राइव्ह मध्ये देऊ, असे न्यायालयाला सांगण्यात आले.
श्रीमंत पोपट ढोले यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जिल्हा परिषद गट नेते पदी निवड करण्यात आली.श्रीमंत ढोले हे दोन वेळा इंदापूर तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत. जिल्हा परिषद निवडणूक 2026 होत असताना स्व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवत होते. परंतु त्यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाल्यानंतरही मतदारांनी दादांच्या कामावर व विचारांवर विश्वास ठेवून ७३ पैकी ५१ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून दिले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटविण्याच्या प्रस्तावावर सोमवारी आणि मंगळवारी चर्चा होणार आहे, त्यामुळे मतदानासाठी कोणताही खासदार अनुपस्थित राहू नयेत, यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व खासदारांना सोमवार आणि मंगळवारी उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे.
राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. मात्र, आज अजितदादांची कमी जाणवली. त्यांनी अकरा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांनी अतिशय शिस्तबद्ध, काटकसर आणि योग्य कामासाठी तरतूद, असा त्यांचा अर्थसंकल्प असायचा. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्याने आजच्या अर्थसंकल्पावर त्याचे सावट हेाते. मुख्यमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा अजितदादांना श्रद्धांजली देणारा आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीतील एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. त्यात नऊ कामगार जखमी झाले आहेत. स्फोटानंतर खाण कंपनीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीने ४८ लाख कुणबी नोंद सापडल्याचे जाहीर केले आहे. तसेच १२ लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप केल्याचं सांगितलं गेलं आहे. असे असेल तर विखे पाटील आणि जरांगे पाटील यांच्यात काय सेटलमेंट झाली आहे. ओबीसी आरक्षण संपविण्याचा अजेंडा या दोन्ही पाटलांकडे देण्यात आलेला आहे का? तसेच निवृत्त न्यायाधीश शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयाचा मराठा-ओबीसीबाबतचा निर्णय अमान्य आहे का? सर्वोच्च न्यायालयापेक्षा संदीप शिंदे समिती मोठी झाली आहे का? महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षण संपवलं आहे, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावाने जातमुक्त गाव म्हणून घोषणा केलेली आहे, येथील ग्रामस्थांनी पाच फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभेत हा ठराव पास केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आता या सौंदळा गावाला भेट देणार आहेत. येत्या मंगळवारी (ता. १० मार्च) राज ठाकरे हे या गावाला भेट देणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प सादर केला असला तरी आपण अजूनही कर्ज काढण्याच्या मर्यादेत आहोत. रिझर्व्ह बॅंक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्ज उभारण्याच्या संदर्भात घालून दिलेल्या वित्तीय मर्यादा आपण अजूनही ओलांडलेल्या नाहीत. त्यामुळे काटकसर करून जमा आणि खर्चाचा ताळमेळ घालण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणासुद्धा लवकरच होईल, असे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केले.
विकासाचे मृगजळ दाखविणारा हा अर्थसंकल्प आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, हे सर्वांना माहिती आहे. जाहीर योजनांसाठी निधी कुठून आणणार, हे स्पष्ट नाही. कर्ज काढून फटाके वाजविणारा अर्थसंकल्प असल्याने त्यातून कुणाचेच हित साध्य होणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपयांची लाडक्या बहिणीची घोषणा लवकरच होईल, अशी अपेक्षा मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राचा विकास चौफेर होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मंत्री पंकजा मुंडे यांनीही या बजेटचे स्वागत केले आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहिल्याने विरोधकांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे, असा टोलाही मुंडेंनी लगावला.
सभागृहाचे कामकाज स्थगित. सोमवारपासून होणार होणार अर्थसंकल्पावर चर्चा.
राज्याला कृत्रिम बुध्दिमत्ता क्षेत्रात जागतिक केंद्रात बनविणार. त्यासाठी राज्य सरकारमध्ये स्वतंत्र विभाग आणि आयुक्तालयाची निर्मिती केली जाईल.
सरकार सत्तेत आल्यापासून आतापर्यंत १.२० लाख पदांवर भरती. पुढील वर्षभरात आणखी ७५ हजार पदे भरण्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुदान अकादमी स्थापन करणार.
राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना यापुढेही सुरूच राहणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आवश्यक ती भरीव तरतुद केल्याचेही त्यांनी सांगितले.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणाही फडणवीस यांनी आज केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ होईल. 30 सप्टेंबर २०२५ ही डेडलाईन त्यासाठी निश्चित करण्यात आली आहे.
घरगुती ग्राहकांना ० ते १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्यांसाठी सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत १०० टक्के वीज सवलत. २०२७ पर्यंत ही योजना सुरूच राहणार असल्याची घोषणा.
पुरंदर विमानतळासाठी विशेष प्राधिकरणाची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.
राज्यातील एक हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना जोडणारे रस्ते काँक्रीटचे करण्याची घोषणा फडणवीसांनी केली.
नागपूरमधील रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी उभारली जाईल. तर पालघर जिल्ह्यातील वाढवण भागात चौथी मुंबई निर्माण केली जाईल.
मुंबई, नागपूर आणि पुण्यामध्ये मेट्रो मार्गाची लांबी ४९० किलोमीटरपर्यंत वाढविणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच या शहरांमध्ये भूमिगत रस्त्यांचे जाळेही निर्माण केले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. सुरूवातीलाच त्यांनी दिवंगत अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सन्मान पुरस्कार सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली.
केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी देशाला 31 मार्च 2026पर्यंत नक्षलवादमुक्त करण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला आहे. ओडिशातील Cuttack इथं आयोजित Central Industrial Security Force (CISF) च्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. नक्षलवादाविरुद्धच्या लढ्यात ओडिशा, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये सीआयएसएफने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं त्यांनी सांगितलं. “तिरुपती ते पशुपती” असा रेड कॉरिडॉर उभारण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना भारताचे सुरक्षा दल पूर्णपणे पराभूत करतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कर्नाटक सरकारने राज्यात 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज कर्नाटक विधानसभेत राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. वाढत्या मोबाईल वापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
मध्यपूर्वेतील इस्त्राईल आणि इराण यांच्यात पेटलेल्या युद्धाची धग आता भारतापर्यंत पोहोचली आहे. या आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमतींनी उसळी घेतली आहे. त्याचा थेट फटका भारताला बसला आहे. विशेषतः देशातील गॅस पुरवठ्यावर याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, सरकारी तेल कंपन्या असलेल्या BPCL (भारत पेट्रोलियम) आणि HPCL (हिंदुस्तान पेट्रोलियम) ने मोठी पावले उचलली आहेत. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि चाकण इथल्या गॅस प्लांटमधून जिल्ह्यातील सर्व डीलर्सना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन कमर्शियल सिलेंडरच्या ऑर्डर्स घेऊ नका, असे आदेश कंपन्यांनी दिल्याने व्यावसायिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज सादर होत असलेला अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. थोड्याच वेळात, म्हणजे, दुपारी 2 वाजता विधानसभेत महाराष्ट्रातील जनतेसमोर अर्थसंकल्प सादर होणार आहे. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला विकासाच्या आणि जलद प्रगतीच्या मार्गावर नेण्याची आमची वचनबद्धता दिसून येईल, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अर्थसंकल्पापूर्वी दिली.
इराण आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही पडत आहे. या युद्धाचा परिणाम भारतावरही स्पष्टपणे दिसतोय. परिणामी दैनंदिन जीवना उपयोग होणारे खाद्य तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ज्यामुळे लोक चिंतेत आहेत. खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे गृहिणींचं आर्थिक गणित बिघडलं आहे. आठवड्यापर्यंत स्थिर असलेल्या या किंमती आठवडाभरात 4-5 रुपये प्रति लिटरने वाढल्या आहेत.व्यापारी सूत्रांचे म्हणणे आहे की, बाजारातील परिस्थिती अशीच राहिली तर येत्या आठवड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रति लिटर 10 ते 15 रुपयांची वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. ही वाढ केवळ स्थानिक बाजारपेठेमुळे नाही तर ती आंतरराष्ट्रीय पुरवठा व्यवस्थेतील बदलांमुळे आहे.
तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आज जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. श्री शिवनेरी स्मारक समिती पुणे आणि जुन्नर शहर शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात पालखी सोहळा पार पडणार असून सकाळी नऊ वाजता पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव आणि पाळणा सोहळा साजरा केला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणीही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
मध्यपूर्वेतील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणने बहरीनच्या सरकारी मालकीच्या 'बापको एनर्जीज' या मुख्य तेल रिफायनरीवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे रिफायनरीच्या एका युनिटमध्ये भीषण आग लागली असून परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. बहरीन सरकारने या हल्ल्याची पुष्टी केली असून इराणच्या या कारवाईमुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
बदलापूर इथल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे जाळे राज्यभरात पसरले असून, या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात उल्हासनगरतून अटक करण्यात आलेली सोनल गरेवार ही महिला प्रशिक्षण नसताना सोनोग्राफी मशीन हाताळायची. तसंच टोळीला महिलांचे 30 सेकंदाचे व्हिडिओ बनवून पाठवायची, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. उल्हासनगर मधील एका सोनोग्राफी सेंटरमधून सोनल गरेवाल हिला पोलिसांनी अटक केली होती. संबंधित सेंटरचा परवाना रद्द करण्यग आलाय तसंच हे सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आलं आहे.
धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात जे विधेयक येत आहे त्याचा आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया रामानंदचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाचे अभिनंदन करत, बाहेरून पैसा येऊन धर्मांतर केली जातात, या पैशावर रोख लावण्यासाठी या कायद्यात तरतूद असावी. कुठल्याही प्रकारे धर्मांतर झालं तर, तो कायद्याने गुन्हा ठरवला गेला पाहिजे , असेही रामानंदचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आज राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थतज्ञ म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ख्याती आहे. आज अजितदादा असते तर त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला असता, मात्र दुर्दैवाने दादा आपल्यात नाहीत. या अर्थसंकल्पातून अजितदादांचे महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न आणि व्हिजन देवेंद्र फडणवीस मांडतील असं धनंजय मुंडे म्हणाले.
भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमान आसामध्ये बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. तर आता हे बेपत्ता झालेले विमान कोसळले असून यामध्ये स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मराठा समाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या 161 गुन्ह्यांपैकी 71 गुन्हे मागे घेणे प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली. मुंबईतील 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या 306 व्यक्तींपैकी 275 जणांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
गुरुवारी (ता.5) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मराठा समाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी राज्यात सापडलेल्या 48 लाख कुणबी नोंदींच्या आधारे 12 लाख 11 हजार 303 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
साथ रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पुण्यात मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट (MSU) उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जागा ही निश्चित करण्यात आली होती. पण भाजपच्याच नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये उपसूचना देऊन जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकल्पालाच खो घातला आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे तब्बल 8 कोटी रुपयांचा निधी परत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. केंद्राच्या प्रकल्पाल अडथळा होत असताना यास भाजपच्या एकाही नगरसेवकाने हरकत घेतली नाही.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी दहावीचा परीक्षा पेपरफूट आणि चोरीप्रकरणी अंजगाव सुर्जी पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह एका पालकाला ताब्यात घेतले तर विस्तार अधिकारी सुशील अंभ्यकर आणि एक पालक अद्याप फरार आहे. मुख्य आरोपी असलेले गटशिक्षण अधिकारी सुधीर खोडे याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
आमदार रोहित पवार आज CID कार्यालयात जाणार आहेत. वी.के.सिंग यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर पवार कार्यालयाला भेट देणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज पुण्यात पत्रकार परिषद होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने तयार केलेल्या पुण्यातील प्रकल्पांची माहिती गडकरी देणार आहेत. पुणेकरांच्या सोयीसाठी कुठले नवे प्रकल्प केंद्र सरकार करणार याबाबत माहिती समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.