Maharashtra local body elections 2025 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विरोधकांचं दिवाळं वाजवू. अन् (स्थानिक) स्वराज्य मोहीम फत्तेच करू...

Maharashtra local body elections 2025: आपला अभेद्य गडच जणू उभारला... हजारो सैनिक नि दीपज्योतींच्या साक्षीनं त्यांनी दृढ संकल्प केला, की या दिवाळीनिमित्त विरोधकांचं दिवाळं वाजवू. अन् (स्थानिक) स्वराज्य मोहीम फत्तेच करू...

सरकारनामा ब्यूरो

अभय नरहर जोशी

दीपोत्सवाच्या या शुभकाळी शिवतीर्थावर लखलख तेजाची चंदेरी न्यारी दुनिया उजळली होती...ज्योतीनं ज्योत उजळवून नवलाख दीप तेथे तळपत होते...या महाराष्ट्र देशीच्या दोन सेनांचे सेनाधिपती बंधू आपल्या आप्तस्वकियांसह तेथे जातीनं हजर होते. यानिमित्तानं त्यांनी आपला अभेद्य गडच जणू उभारला... हजारो सैनिक नि दीपज्योतींच्या साक्षीनं त्यांनी दृढ संकल्प केला, की या दिवाळीनिमित्त विरोधकांचं दिवाळं वाजवू. अन् (स्थानिक) स्वराज्य मोहीम फत्तेच करू...

काळ - अश्विन कृ. १२, शके १९४३. धनत्रयोदशी

वेळ - मनोमिलनाची

थोरली पाती : यावे बंधुराज...यावे... किती दिवसांनी हा दिवाळीचा सण उगवला. तीर्थरूप गेल्यानंतर प्रथमच या शिवतीर्थावर अशी मनोमिलनाची दिवाळी होत आहे. आता हा एकोपाही विकोपाला नेऊन ‘स्थानिक स्वराज्य’ची आगामी मोहीम आपण फत्ते करूयात. शिवतीर्थावर हा एकोप्याचा अभेद्य गड उभारुयात....

धाकटी पाती (नाकाचा शेंडा कुरवाळत, नजरेतील तुच्छता शक्यतो सौम्य करत) : करतोय मनाची तयारी. तुझ्या (स्वयंपाक) घरातून तुला परवानगी आहे ना...नाय तर घोटाळा व्हायचा. मागच्या वेळसारखी माशी शिंकायची.

थो. पा. : बेशक! आपण आता ही मोहीम एकत्रच लढवायची. आपल्या दोघांत कोणीही येणार नाही. आमचं ‘वामांग’ नाही की अगदी आमचे संपादकही नाहीत. महाभारतातील ‘संजया’प्रमाणे ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आपल्याला त्याचं धावतं वर्णन करत राहतील.

धा. पा. : अरे आपण ध्रुतराष्ट्राप्रमाणे अंध थोडेच आहोत. या तुझ्या संपादकाला फार ढील देऊ नकोस बरं का. तो फार बोलतो त्यामुळे. नंतर तर तुझ्या-माझ्या वाट्याचंही बोलून टाकतो...

 थो. पा. : माझं लक्ष आहे. आपल्या हिताचंच बोलतो तो.

धा. पा. : कसलं काय. त्या ‘पंजा’वाल्यांना बरोबर घेण्याची माझी इच्छा असल्याचं त्यानं परस्पर ठोकून दिलं. माझा प्रवक्ता असल्यासारखं. माझे निर्णय मीच घेतो अन् ते जाहीरही मीच करतो.

 थो. पा. (सावरत) : बरं बरं मी सांगतो. तो काही आपल्या शब्दांबाहेर नाहीये. पण आपण एकत्र यायचंच बरं का रे. आपला किल्ला अभेद्य करण्याचा संकल्प आपण या दीपोत्सवानिमित्त करू. त्या शत्रूची दाणादाण उडवून देऊ. ही मुंबापुरी, ठाणे, नाशिक, पुणे अवघा मुलूख काबीज करू.

धा. पा : बंधुराज, जरा जपून...ते पहा बुरुजावरून दूर तिकडे...ते पंत कसे चढाई करून येताहेत. त्यांच्या भात्यात खूप शस्त्रे आहेत. बाण, बाँब, सुदर्शन चक्र वगैरे वगैरे. पंतांना दिल्लीहून थेट रसद मिळतेय. अन् तिकडे पहा त्या ठाण्याहून तो दाढीवाला शिलेदार येतोय. त्याच्याकडेही मोठा दारुगोळा आहे. दिल्लीची ‘अदृश्य शक्ती’ दाढीवाल्याला दृश्य मदत करतेय...

 थो. पा. (दात-ओठ खात) : येऊ देत. मी घाबरतो की काय. गद्दार, नीच, नमकहराम, पाठीत खंजीर खुपसणारे, विश्वासघातकी, ५० खोकी घेऊन खोगीरभरती केलेले ४० चोर अन् त्यांचा तो दाढीवाला सरदार... आपण आपला किल्ला भक्कम करुयात. बंधुराज तुझ्यासारखी मुलुखमैदान तोफ असताना मी घाबरतो की काय...परवाच छत्रपती संभाजीनगरात सभेत मला ‘आसूड’ दिला गेला. आम्ही ‘हंबरडा’ फोडला तेव्हा.

धा. पा : अरे बाप रे. तुम्हाला आसूड लगावल्यानं तुम्ही हंबरडा फोडलात की काय?

थो. पा (कपाळावर हात मारून घेत) : अरे तू फार विनोदी आहेस बाबा. व्यंगचित्रच दिसतं तुला सगळीकडे. ही विनोदाची वेळ नाही. आता खांद्याला खांदा लावून लढण्याची वेळ आहे. तर आमच्या हंबरडा मोर्चात मला प्रतिकात्मक आसूड भेट दिला गेला. तो कसा वापरायचा मला ठाऊक नसल्यानं मी थोडा गोंधळलो होतो इतकंच.

धा. पा (जन्मजात छद्मीपणे) : नशीब. आसूडच भेट दिला. हंबरडा फोडणाऱ्या गाय-बैल भेट दिले नाहीत. नाय तर बांद्र्यात गोठ्यासाठीही जागा घ्यावी लागली असती. असो. आता लढूयात एकत्र. त्या पंतांपासूनच आपल्या किल्ल्याच्या बुरुजांना धोका आहे बघ.

थो. पा : अरे सोड. त्या पंताला काय घाबरायचं. असे अनेक पाहिलेत पंतोजी.

धा. पा : अरे या पंतोजीनंच पळता भुई थोडी केलीये सगळ्यांना. तुझ्या नाकाखालून ४० शिलेदार त्यानं पळवून नेले अन् किल्ला सर केला. याचा तुला पत्ताच लागला नाही. त्याच्या भात्यात फारच अस्त्र, शस्त्र अन् अन्यही मंत्र-तंत्र आहेत.

थो. पा. : अरे आपल्याकडे काय कमी आहे. तू आहेस. बारामतीचे भीष्माचार्य आहेत. शिवाय बिहार निवडणूक झाली की ‘पंजा’वालेही येतीलच की ‘हात’ चोळत आपल्या गोटात. जाणारेत कुठे? आता बोगस मतदारयाद्यांचं खणखणीत अस्त्र आहे आपल्याकडं. भेदून टाकू सगळ्यांना. ‘पंताच्या गोटात’ दाणादाण उडवून देऊ. आधी याद्या बदला मगच लढाई...

धा. पा : तरीही ताक फुंकूनच प्यायला हवं आपल्याला. त्या पंतांकडे ‘मूषकदंशा’ची कला आहे. मूषक म्हंजे उंदीर काय करतो, झोपलेल्या किंवा बेसावध माणसाच्या पायाला वगैरे कुरतडतो अन् वेदना होऊ नयेत म्हणून त्या जखमेवर फुंकर मारतो. त्या फुंकरीत जखम बधीर करण्याची ताकद असते. अशा तऱ्हेनं जखमी झालेल्याला पत्ताच लागत नाही.

 थो. पा. : खरंय रे बाबा. मलाही अशीच जखम केली त्यानं. आता चांगलीच दुखून भळभळतीय ती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT