Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : विधानपरिषद निवडणूक, कॉक्रोच जनता पार्टीचे आज दिल्लीत आंदोलन यासह आज दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

अंबडचे तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात! वाहनांवर कारवाई न करण्यासाठी 6.40 लाखांची लाच स्वीकारताना अटक

अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये चाललंय, ते आता महाराष्ट्रात सुरू झालंय : बाळासाहेब थोरात

विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये दहशतीचासुद्धा वापर झालेला आहे. ऐनकेन प्रकारे सत्ता मिळविणे, ही भाजपची पद्धत आहे. सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही गैर मार्गाचा वापर हे आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातसुद्धा घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये चाललंय, ते आता महाराष्ट्रात सुरू झालं आहे. दहशत, गैरमार्गाचा वापर करून सत्ता मिळविण्याचे काम भाजपकडून सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

जंतरमंतरवर अराजकता पसरविण्याचे काम : देवेंद्र फडणवीस

नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी येत्या पाच दिवसांत मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा पुढच्या शनिवारी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी दिला आहे. दरम्यान दिल्लीतील जंतरमंतरवर अराजकता पसरविण्याचे काम सुरू आहे. संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या आणि व्यवस्था उखडून टाकायचे बोलायचे. या आंदोलनामुळे त्यांचा अराजकतेचा चेहरा उघड झाला आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

रोहित पवार 12 जूनपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करणार

आमदार रोहित पवार हे येत्या 12 जूनपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थवर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी, प्रोत्साहनपर अनुदानाची अट शिथिल करावी, एक रुपयात पीकविमा योजना सुरू करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहे.

भाजपने सातत्याने माझ्या विरोधात उमेदवार उभा केला आहे : किशोर पाटील

अब्दुल सत्तार यांनी भाजपला उद्देशून स्लो पॉयझन असं म्हटलं आहे, हे त्यांचं वैयक्तीक मत आहे. पण सत्तार यांच्या अगोदरही किशोर पाटील यांचा बळी गेला आहे. गेल्या १० ते १५ वर्षांत भारतीय जनता पक्षाने सातत्याने माझ्या विरोधात उमेदवार दिला आहे, असा आरोप शिवसेनेचे नेते किशोर पाटील यांनी केला आहे.

माघारीसंदर्भात चर्चा झाली नसल्याचे बंटी पाटील अन्‌ सपकाळ यांनी सांगितले : दिप्ती चवधरी

बंटी पाटील आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी मी बोलले. त्यांनी माघारीसंदर्भात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. इतर कोणत्या नेत्यांशी त्यांची चर्चा झाली, हे आम्हाला माहिती नाही. कार्यकर्त्यांच्या भावना मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली आहे, असे काँग्रेसच्या पुणे महिला शहराध्यक्ष दिप्ती चवधरी यांनी सांगितले.

मी लोकांचे अर्ज भरतो आणि माझाच अर्ज रिजेक्ट झाला, हे समजण्यापलीकडेच : गोपीकिशन बजोरिया

माझा उमेदवारी अर्ज लीगल होता आणि आहे. पण मतदान अधिकाऱ्यांवर कोणी दबाव आणला, हे बोलणं योग्य नाही. मी वकील असून आमदार आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तो अर्ज घेतला. पण मलाही आश्चर्य आहे की, मी लोकांचे फार्म भरतो आणि माझाच फार्म रिजेक्ट झाला, हे समजण्यापलीकडेच आहे, असे गोपीकिशन बजोरिया यांनी केला आहे.

Supriya Sule : बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्यावर महाविकास आघाडी ठाम

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाला, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. दुसरीकडे खासदार संजय राऊत आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीत जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही, तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार समोर आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या विचारांवर सहमती दाखवली आहे. दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील या बहिष्कारावर मत व्यक्त केले. हा मुद्दा आता मी थेट इंडिया आघाडीच्या बैठकीत उपस्थित करणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

मनोज जरांगे समर्थक आणि लक्ष्मण हाके यांच्यात शाब्दिक बाचाबाची

पुण्यातील मनोज जरांगे समर्थक अर्चना शहा आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये आज चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली आहे. लक्ष्मण हाके पत्रकार संघातून पत्रकार परिषद आटोपून आल्यानंतर अर्चना शहा यांनी मनोज जरांगे यांच्याविषयी लक्ष्मण हाकेंना प्रश्न विचारल्यानंतर दोघांमध्ये चांगली शाब्दिक बाचाबाची झाली आहे. तुम्ही मनोज जरांगे यांच्यावर चिखल फेक का करता? त्यामुळे समाजातील निर्माण होतो, असं प्रश्न मी लक्ष्मण हाके यांना विचारल्यानंतर त्यांनी माझ्यावर चिडण्यास सुरुवात केली असा दावा अर्चना शहा यांनी केला आहे.

राज्य सरकारने ॲानलाईन खतविक्री शिथील करावी : राजू शेट्टी

केंद्र सरकारने रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' अंतर्गत अ‍ॅग्रीस्टॅक प्रणाली, शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) आणि नवीन एल-वन (L-1) ई-पॉस मशिनद्वारे खत विक्री अनिवार्य केली आहे. मात्र, या प्रणालीतील किचकट अटी आणि तांत्रिक त्रुटींमुळे ग्रामीण भागातील शेतकरी पुरता कोलमडला असून, ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून राज्य सरकारने ॲानलाईन खतविक्री शिथील करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

पाण्याच्या आवर्तनासाठी मालनगाव धारणामध्ये काँग्रेसचे जलसमाधी आंदोलन

मालनगाव धरणातून काननदी किनारी असलेल्या 17 गावांना पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे या मागणीसाठी मालनगाव धारणामध्ये काँग्रेसच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले आहे, धरणातील जवळपास कमरेभर पाण्यामध्ये काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी या जलसमाधी आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवत प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला आहे.

गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळावे : केसरकर

रायगडमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार असल्यामुळे भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळावे. केवळ वादामुळे येथील पालकमंत्री पद स्थगित राहिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालेन.

वैभव नाईक यांच्याशी माझे जवळचे संबंध, त्यांच्याकडून असे काही झाले असेल असे वाटत नाही : केसरकर

चौकशीच्या प्रक्रियेचा हा भाग आहे, शेवटी ती पूर्ण करावी लागते. मला खात्री आहे की, वैभव नाईक यातून सहीसलामत बाहेर पडतील. वैभव नाईक यांच्याशी माझे जवळचे संबंध असून अनेक वर्षे आम्ही एकत्र काम केले आहे. ते चांगले व्यावसायिक असून त्यांच्याकडून असे काही झाले असेल असे वाटत नाही.

सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का; महिला शहर अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा

सिंधुदुर्गात सावंतवाडी मधील भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीने लडकाफडकी राजीनामा दिला आहे. शहराध्यक्ष तथा नगरसेविका मोहिनी मडगावकर आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत दुफळीमुळे हा राजीनामा देण्यात आला आहे. मोहिनी मडगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महीला जिल्ह्याध्यक्ष श्वेता कोरगावकर, सरचिटणीस महेश सारंग व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या दबावामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याच सांगितल आहे. फक्त आपल्यालाच शहर अध्यक्ष पदाचे काम थांबविण्यास सांगण्याचे कारण काय असा प्रश्न ही त्यानी उपस्थित केला आहे.

वडेट्टीवारांच्या टीकेला शिरसाटांचे प्रत्युत्तर; 2019 नंतरची भूमिका विचारली

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषद निवडणुकीतील कथित घोडेबाजारावरून नाराजी व्यक्त करत राजकारणातील प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्याला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर देत, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर वडेट्टीवारांनी स्वतः कोणती भूमिका घेतली होती, असा सवाल उपस्थित केला. यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.

Devendra Fadnavis : निवडणूक प्रक्रियेतील परिवर्तनाचं बिल आणलं पाहिजे; मुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं विधान

विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी घोडेबाजार केल्याचा विरोधकांनी गंभीर आरोप केला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात. निवडणूक प्रक्रियेत बदल झाले पाहिजेत. निवडणूक प्रक्रियेतील सुधारणांचं बिल आणल्यास आपण त्याचे स्वागत करू, असे मोठं विधान केलं आहे.

Supriya Sule : घोडेबाजारावर भाजपने तोंड उघडायला लावू नये; खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला

'विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजारावर भाजपने तोंड उघडायला लावू नये. घोडेबाजार झाला आहे, हे सर्वांना माहिती आहे. फक्त पैशांच्या जीवावर कोणीही उड्या मारू नये. विधान परिषद निवडणुकीत कोणतीही रंगत नव्हती,' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

Natural Gas Reserves Andaman Sea : अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूचा महाप्रचंड साठा, भारताला मोठा जॅकपॉट लागला

ऊर्जा सुरक्षा दिशेने भारताला मोठा जॅकपॉट लागला आहे. अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूचा महाप्रचंड साठा सापडला आहे. आता भारताला मोठा वायू साठा सापडल्यामुळे भारत इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भतेच्या दिशेने वाटलाच करु शकतो. अंदमान समुद्रात नैसर्गिक गॅसचा महत्त्वपूर्ण शोध लागला असून भारताच्या ऊर्जा सुरक्षा दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे.

Ahilyanagar Update : वादळी पावसामुळे घर कोसळून एका वृद्धा महिलेचा मृत्यू

वादळी पावसामुळे पाथर्डी तालुक्यातील कडगाव इथं घर कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. पत्र्याचा जबर मार लागल्याने समाबाई शिरसाट यांचा मृत्यू झाला. यात पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. घरासह संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Rajesh Exports : म्युच्युअल फंड गुंतवणूक काढून घेत असतानाच, राजेश एक्सपोर्टमध्ये 10 वर्षात LICने पाच पट गुंतवणूक वाढवली

गेल्या 10 वर्षांमध्ये राजेश एक्सपोर्टसमध्ये देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी, म्युच्युअल फडांनी गुंतवणूक केली नाही. मात्र, एलआयसीची गुंतवणूक गेल्या 10 वर्षात पाच पट वाढली आहे. राजेश एक्सपोर्टसच्या वेबसाईटवरील डेटाचा आधार घेत हे वृत्त समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. राजेश मेहता राजेश एक्सपोर्टस या कंपनीचे प्रमोटर आहेत. या कंपनीत 2016 मध्ये म्युच्युअल फंडांची गुंतवणूक 0.5 टक्के होती. गेल्या 10 वर्षात ती पूर्णपणे काढून घेण्यात आली.

CJP : अभिजीत दीपके सव्वा तासापासून दिल्ली विमानतळावरच; बाहेर का आला नाही, कारण समजेना

NEET-UG पेपर लीक आणि देशातील इतर परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात आज दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाला एक मोठे आणि नाट्यमय वळण मिळाले आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके सकाळी अमेरिकेतून दिल्ली विमानतळावर दाखल झाला आहे. गेल्या एका तासाहून अधिक काळ तो विमानतळाच्या आतच असून, ते अजूनही बाहेर का आला नाही, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Konkan Politics : बाळ माने यांचे समाज माध्यमांवरील स्टेटस चर्चेत; रोख कुणाकडे याची चर्चा

रत्नागिरी-कोकण विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेणाऱ्या बाळ माने यांचे समाज माध्यमांवरील स्टेटस चर्चेत आले आहे. काळ हा मोठा शिक्षक आहे, असं त्यांचे स्टेटस आहे. ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर काल देखील बाळ माने यांनी स्टेटस ठेवलं आहे. बाळ माने यांच्या स्टेटसचा रोख कुणाकडे आहे, याची चर्चा आहे. बाळ माने यांच्याकडून विनायक राऊत यांच्यावरती आरोप झाले होते.

Ulhasnagar Crime : उल्हासनगर दुहेरी हत्याकांडात मोठा ट्विस्ट! फिर्यादी दीपक ठाकूरच निघाला आरोपी

उल्हासनगरच्या कैलास कॉलनी दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिस तपासात मोठा खुलासा झाला आहे. गोळीबार प्रकरणात फिर्यादी असलेल्या दीपक ठाकूर यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारापूर्वी अजय राव याला अडवून मारहाण करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

Chandrapur News : चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; डेटा लॉक करून लाखोंची खंडणी मागणी

चंद्रपूर शहरातील कॅन्सर केअर फाउंडेशनचे (कॅन्सर हॉस्पिटल) मुख्य सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॅकर्सनी रुग्णालयाचा महत्त्वाचा डेटा लॉक करून 1.23456 बिटकॉईनची खंडणी मागितल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 1 जूनला सकाळी आयटी विभागाला सर्व्हरमध्ये बिघाड आढळला. तपासणीदरम्यान सर्व्हरवर रॅन्समवेअरचा धमकीचा संदेश दिसून आला.

काॅक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी

अभिजित दीपके यांचे भारतात आगमन झाल्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी नेल्याची अफवा पसरली होती. मात्र, जंतरमंतरवर आंदोलनासाठी पोलिसांनी आपल्याला परवानगी दिल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सर्वांनी जतंर मंतर येथे जमण्याचे आवाहन देखील केले.

दारूमाफियांविरोधात कारवाई

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू माफियांविरोधात राज्यभर धडक मोहीम हाती घेतली आहे. २८ मे ते ४ जून या अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत ३ हजार ३१२ गुन्हे दाखल करण्यात आले असून २ हजार ७५७ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९ कोटी ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ७४ हजार लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

फुगेवाडी, दापोडी व हडपसर येथील प्रथमदर्शनी मेथेनॉल मिश्रित गावठी दारू प्राशन घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २९ मे ते ४ जून या कालावधीत धडक कारवाई करुन एकूण १ कोटी ४७ लाख २७ हजार १४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.

अभिजीत दीपके भारतात दाखल

कॉक्रोच जनता पार्टी चे संस्थापक अभिजित दीपके हे अमेरिकेवरून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतात आज सकाळी दाखल झाले आहेत. त्यांनी आपल्या समर्थकांना विमानतळावर न येण्याचे आवाहन देखील केले होते.

वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा, सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश

बारामती शहर आणि परिसरात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Cockroach Protest :  कॉक्रोच जनता पार्टीचे आज दिल्लीत आंदोलन, जंतर-मंतर मैदानावर मोठा बंदोबस्त

कॉक्रोच जनता पार्टीकडून आज दिल्लीत जंतर-मंतरवर मोठे आंदोलन करण्यात येत आहे. नीट पेपर फुटीबाबत शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या आंदोलनात जेनजी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेत जंतर-मंतर मैदानावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT