Sarkarnama breaking news sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Breaking News LIVE : धरणातील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाला परवानगी

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 15 MAY महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि प्रशासकीय इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

सरकारनामा ब्यूरो

हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला अटक

हडपसर परिसरातील उषाकिरण रुग्णालयात टायमर बॉम्ब स्फोटक ठेवून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूर रेल्वे जंक्शन येथून अटक केली. आरोपीची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामागील हेतू, त्याचे साथीदार आणि इतर ठिकाणी अशाच प्रकारचा कट रचण्यात आला होता का, याचा तपास यंत्रणांकडून सुरू आहे.

Maharashtra Farmer : धरणातील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाला परवानगी

राज्यातील धरणांमधील गाळ वाढत असल्याने पाणीसाठ्याची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे उजनी, गिरणा, गोसीखुर्द, मुळा, जायकवाडी आणि हतनूर या सहा मोठ्या प्रकल्पांच्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्यास राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली. हा गाळ शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी विनामूल्य दिला जाणार आहे. गाळ उपशासाठी कंत्राटदार नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना गाळ आणि वाळू दोन्ही काढणे बंधनकारक राहील. तसेच नैसर्गिक जमिनीच्या पातळीखाली दोन फुटांपेक्षा अधिक उत्खनन करण्यास मनाई करण्यात आली आहे. गाळ घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी फक्त वाहतूक खर्च करायचा असून कोणतेही स्वामित्व शुल्क आकारले जाणार नाही.

NEET Paper Leak : धनंजय लोखंडेपर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचवायचं काम पुण्यातील मनीषा वाघमारे करायची, तपासात धक्कादायक माहिती समोर

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती मिळाली असून, बुधवारी पहाटे केलेल्या कारवाईत केंद्रीय अन्वेषण विभागाने पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 7 च्या मदतीने कात्रज परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव मनीषा संजय वाघमारे (46) असून, ती सुखसागर नगर भागात ब्युटी पार्लर चालवते. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अहिल्यानगरमधून यापूर्वीच अटक करण्यात आलेला आरोपी धनंजय लोखंडे याला मनीषा वाघमारेने मदत केल्याचा संशय आहे. तथाकथित "गेस पेपर्स"च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुख्य आरोपींशी जोडून देण्यात तिची महत्त्वाची भूमिका असावी, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे.

NEET UG 2026 Re-Exam : पेपरफुटीमुळे रद्द झालेली NEETची पुर्नपरीक्षा आता 21 जून होणार

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जून 2026 रोजी होणार आहे. याबाबत आज एनटीएकडून घोषणा करण्यात आली आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली होती. ही परीक्षा जून महिन्यात होणार असल्याने पुढील प्रवेशांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती.

LPG Price Hike Speculation : पेट्रोल आणि डिझेलच्या पाठोपाठ घरगुती गॅस सिलिंडरच्या दराचा भडका उडण्याची शक्यता

देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल 3 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 3.11 रुपये प्रति लीटर इतके महागले आहे. या इंधन दरवाढीमुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे. अशातच आता सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी एक माहिती समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेलनंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी मार्च महिन्यात एलपीजीच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

Palghar Update : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर व्हॅन पलटी; 17 कोटी 66 लाखांची चांदी समोर, पालघरमधील घटना

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहून नेणारी व्हॅन पलटी झाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या व्हॅनमध्ये तब्बल 600 किलो चांदीच्या विटा असून त्यांची किंमत अंदाजे 17 कोटी 66 लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून वापी जीआयडीसी इथल्या मोदी सन्स लिमिटेडकडे ही चांदी घेऊन जात असताना अपघात घडला. अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला आहे.

Shirdi Update : खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला वेग; बियाणे, खत, कीटकनाशकांच्या वाढत्या किमतीमुळे बळीराजा हवालदील

अहिल्यानगर जिल्ह्यात बळीराजा खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला लागला आहे. सहा लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी केली जाणार असून यावर्षी प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसतो आहे. यासह मका, बाजरी, मूग, उडीद, तूर या पिकांची देखील लागवड वाढू शकते, तर दुसरीकडे खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने बळीराजा हतबल झाला आहे. वाढलेला लागवड खर्च, उत्पादनात झालेली घट तसेच कोलमडले बाजारभाव अशा अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत बळीराजा खरीप हंगामासाठी पुन्हा शेतात उभा राहत आहे.

Sangali News : शक्तिपीठ रद्द मागणीसाठी काढण्यात आलेल्या रॅली मधील 250 आंदोलनकर्त्यांवर गुन्हे

सांगलीच्या वाळवा तालुक्यात काल शक्तिपीठ महामार्ग बाधित गावांमधून जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी बेकायदेशीर जमाव जमवून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी दुचाकी रॅली काढल्याप्रकरणी सुमारे 250 आंदोलनकर्त्यांविरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक अरुण जंगम यांनी फिर्याद दिली आहे.

Sensex News : ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टॅन्लेचा भारताबाबत मोठा आशावाद; सेन्सेक्स जून 2027 पर्यंत 89 हजारांवर पोहोचणार

परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री, युद्ध आणि महाग मूल्यांकनाच्या चिंतेमुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव असतानाही ब्रोकरेज कंपनी मॉर्गन स्टॅन्लेने भारताबाबत मोठा, आशावाद व्यक्त केला आहे. पुढील वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्था नव्या वाढीच्या टप्प्यात प्रवेश करेल आणि त्यामुळे सेन्सेक्स जून 2027 पर्यंत 89 हजारांवर पोहोचू शकतो, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे. सध्याच्या पातळीच्या तुलनेत हा 15 टक्क्यांचा संभाव्य वाढीचा अंदाज आहे. हा अहवाल समोर येताच गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शेअर बाजारात 789 अंकांची उसळी पाहायला मिळाली.

MNS NEWS: मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा अपघात

मुंबई - पुणे दुर्गती मार्गावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय दिलीप धोत्रे यांचा अपघात झाला आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बॉम्ब प्रकरणात मांजरीत पोलिसांची मोठी छापेमारी

हडपसरच्या कामधेनु इस्टेट मधील नामांकित रुग्णालयात बॉम्ब ठेवल्या प्रकरणात पुणे पोलिसांची मांजरीत मोठी छापेमारी केली आहे. काही गोष्ट जप्त केल्या आहेत.

जळगाव महापालिकेच्या महासभेत भाजप आणि शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांमध्येच खडाजंगी

मेहरूण रस्ता फेरआखणीच्या मुद्द्यावर भाजप-शिवसेना शिंदे गटात मतभेद दिसून आल्याने , या विषयात दोन्ही पक्ष आमनेसामने आले होते. महापालिकेच्या महासभेत भाजप महापौर व शिवसेनेचे उपमहापौर यांच्यासह नगरसेवकात शाब्दिक चकमक झाली.

गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात रंगलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना आता महत्त्वपूर्ण वळण मिळालं आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. यात युतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र भाजपकडून “९० टक्के युती” तर शिवसेनेकडून “१०० टक्के युती” झाल्याचा दावा करण्यात आल्याने राजकीय संभ्रम कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT