पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचले असून शनिवारी सीबीआयच्या पथकाने नांदेडातील विद्युतनगर भागात धडक कारवाई केली. इथल्या कदम कुटुंबीयांच्या निवासस्थानी तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी आणि झाडाझडती घेतली. मुलीसाठी पाच लाख रुपयांत नीटचा पेपर खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप या कुटुंबावर आहे. लातूरमध्ये शुक्रवारी एका कोचिंग क्लास चालकाची चौकशी केल्यानंतर सीबीआयचे हे पथक थेट नांदेडात दाखल झाले होते.
राज्यात तीव्र पडसाद उमटवणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. अशोक खरात याला त्याच्या घरातून बेड्या ठोकल्या होत्या. तेव्हापासून सुरू झालेल्या तपासाचा विळखा आता अधिकच घट्ट झाला आहे. गेल्या दोन महिन्यात या प्रकरणात केवळ अंधश्रद्धाच नव्हे, तर महिलांवरील लैंगिक अत्याचार, कोट्यवधींची आर्थिक फसवणूक, पतसंस्थांमधील बोगस खाती आणि राजकीय कनेक्शनपर्यंतचे अनेक धागेदोरे समोर आले आहेत.
जनतेला पेट्रोल डिझेल कमी वापरा म्हणून उपदेश करणाऱ्या सरकारने, तेल कंपन्यांना निर्यात कमी करा असं सांगायची हिंमत का दाखवली नाही? 1 लाख 32 हजार कोटींचं कच्चं तेल आयात करायचं, त्यातील 52 हजार 876 कोटींचं तेल परदेशात विकायचं आणि मग देशातील नागरिकांच्या खिशातून महाग पेट्रोल डिझेलच्या नावाखाली पैसे वसूल करायचे. म्हणजे नफा कंपन्यांचा आणि लूट सामान्य माणसाची, असा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. भारतीय जनता पार्टी सरकारला जनतेच्या खिशाची नाही तर उद्योगपतींच्या तिजोरीची जास्त काळजी आहे, हे पुन्हा स्पष्ट झालं. स्वतःच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी देशभक्तीच्या घोषणा दिल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला अक्षरशः पिळलं जातं, अशीही टीका वड्डेटीवार यांनी केली आहे.
धुळ्यातील साक्री तालुक्यामधील वर्धाने व उभरांडी शिवारात एका महिलेसह तरुणाचा मृतदेह आढळला. शिरपूर इथल्या दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच 24 तासांत ही दुसरी घटना समोर आली. या मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित भोंदू बाबाला अटक केली आहे. भडगाव (वर्धाने) टेंभे फाट्याजवळ जयश्री काकुस्ते (वय 25) या विवाहितेचा मृतदेह आढळला. तिच्या अंगावर दुचाकी टाकलेली होती व तोंड रुमालाने बांधलेले होते. घटनास्थळी तिचा मोबाईल व पर्स सुरक्षित असल्याने लुटीचा हेतू नसल्याचे पोलिसांनी सांगितले. जयश्री ही खासगी कंपनीत कलेक्शनचे काम करत होती. निजामपूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून योगेश उर्फ भैय्या खैरनार याला ताब्यात घेतले. तो स्वतःला ‘महाराज’ म्हणवत मठात भविष्य सांगण्याचे काम करत होता.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नियुक्तीच्या वादावरून चर्चांना तोंड फुटलं आहे. पक्षात काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्री उशिरा पार पडलेल्या या गुप्त बैठकीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
भांडुपच्या प्रभाग क्रमांक 110 च्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका आशा कोपरकर त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि चालकावर भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आशा कोपरकर या नगरसेविका आहेत. पतीशी संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेचे अपहरण, मारहाण आणि धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेनं भांडुपच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील चार ठिकाणी छापा घालत चार लाख 40 हजार 296 रुपये किमतीचा गुटखा व पानमसाला आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी 22 लाख रुपये किमतीची तीन वाहने स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केली आहे. शरद सिताराम वडवकर (रा. लोणी व्यंकनाथ) व नागेश नीलकंठ सुमकवर (रा. श्रीगोंदा) या दोघांना कारवाईत अटक केली आहे.
देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनार याला केंद्रीय अन्वेषण विभागाने नाशिकमधून अटक केल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. शुभमच्या थेट संपर्कात असलेले नाशिकमधील अनेक मोठे मासे आता 'सीबीआय'च्या रडारवर आले असून, यात काही प्रतिष्ठित क्लासचालकांचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारकडून या प्रकरणात न्याय होताना दिसत नाही. कोणताही पुरावा नसलेल्या टीसीएस प्रकरणात घरे पाडली जातात. संशयतांना अडकवण्यासाठी सर्व यंत्रणा काम करते. मात्र पेपर फुटीच्या गंभीर प्रकरणात फक्त कोठडी मिळते? त्यांची घरे कधी पाडणार, असा सवाल माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे.
आमदार अनिल पाटलांकडून अंमळनेर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान, रुग्णालयातील अस्वच्छता तसेच सुविधांवरून अनिल पाटलांनी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. रुग्णांनी या रुग्णालयात मरायला यायचं का? या शब्दात आमदार अनिल पाटील यांनी संताप व्यक्त केला.
भांडुपमधील काँग्रेसच्या नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि कारचालकावर भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर एका महिलेचे अपहरण मारहाण आणि धमकवल्याचा आरोप आहे. पतीशी संबंध असल्याच्या संशयातून आशो कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी महिलेचे अपहरण केल्याचा आरोप आहे.
पुणे जिल्ह्यात बालसंस्काराचे मुख्य केंद्र असलेल्या अंगणवाडी केंद्रांच्या पायाभूत सुविधांबाबत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. डिजिटल आणि स्मार्ट अंगणवाड्यांच्या गप्पा मारल्या जात असताना, प्रत्यक्षात जिल्ह्यातील तब्बल ३२३ अंगणवाडी केंद्रांना स्वतःची हक्काची जागाच उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात दौऱ्यावर आहेत. महापालिकेंच्या विविध कामाचे भूमिपूजन, लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुण्यात विविध कार्यक्रमाये आयोजन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.