दिल्लीतील जंतर मंतरवर 26 दिवस उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सीजेपीनं आंदोलन मागे घेतल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारने आणि धर्मेंद्र प्रधान यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. हा देशातील लोकशाहीचा मोठा विजय आहे," असल्याचं म्हणत सीजेपीच्या कार्यकर्त्यांचं, विद्यार्थ्यांचं आणि संपूर्ण देशवासियांचे मनःपूर्वक अभिनंदन केलं आहे. तसेच आंदोलनात हिंसाचाराच्या काही दुर्दैवी घटना घडल्या असल्या, तरी आपली खरी ताकद ही शांततेतच आहे. समोर बंदुका असल्या तरी आपण दाखवलेल्या शांततेच्या ताकदीसमोर कोणतेही शस्त्र टिकू शकत नाही."
भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, ‘देर आए दुरुस्त आए’ म्हणत भाजपला घरचा आहेर दिला आहे. ‘श्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, मी अशी आशा व्यक्त करतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच योग्य निर्णय घेतील. मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी आपलं आंदोलन अतिशय शांततेत संपवलं. यामुळे आता लवकरच भारताच्या शिक्षण क्षेत्रात शांती प्रस्थापित होईल. तसेच विद्यार्थ्यांना आपलं उज्जवल करिअर घडवण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळतील,’ असंही मुरली मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.
जी मंडळी आंदोलनाचा गैरफायदा घेतात, मी सगळ्यांबद्दल बोलत नाही; मात्र काही मंडळी तसे करताना दिसत आहेत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता ठाकरे बंधूंच्या उद्याच्या मोर्चावर बोलताना लगावला.
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा लोकशाहीचा विजय आहे. देशातील युवकांचे याबद्दल मी अभिनंदन करतो. आता मंत्र्यांचा राजीनामा झाला आहे. पण आता शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. एका राजीनाम्याने राष्ट्र बनत नाही, त्यासाठी शिक्षण व्यवस्था सुधारण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी सरकार काम करेल, अशी आशाही ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचूक यांनी बोलून दाखवली.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांचा विजय आहे. प्रधान हे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचे प्रतीक होते, त्यामुळे त्यांना मंत्रिपदावरून जावंच लागणार होतं, त्यामुळे ते गेले ते चांगलं झालं आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सांगितले.
नीट पेपरफुटीप्रकरणी नवी दिल्लीतील जंतरमंतर मैदानासह संपूर्ण देशभरात आंदोलन करणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची तयारी केंद्र सरकारने दाखवली आहे. तसेच, पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदतही देण्यास सरकारने होकार दर्शविला आहे. तीनही मागण्या मान्य झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधत बोचरा वार केला. एका वाक्यात सांगायचं तर या जेन झी (Gen Z) नी सरकारच्या झिंज्या उपटल्या, असं राज ठाकरे म्हणाले. त्याचसोबत तरुणांचा हा राग आता प्रधानांवरुन पंतप्रधानांवर गेल्याचाही राज ठाकरेंनी दावा केला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर नाशिकचे ठाकरे सेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सीजेपीच्या अभूतपूर्व आंदोलनाने केवळ एका मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही, तर देशातील लोकशाहीची चेतना पुन्हा जागृत केली आहे. देशात लोकशाही आजही जिवंत आहे, जनतेचा आवाज सत्तेला ऐकावा लागतो आणि संघटित, शांततापूर्ण संघर्षातून परिवर्तन घडू शकते, यावर देशातील तरुणांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. या आंदोलनाने संपूर्ण देशाला जागृत करण्याचे काम केले आहे
लोकशाहीत सत्तेपेक्षा जनता मोठी असते, हे या लढ्याने सिद्ध केले. आता केवळ राजीनामा देऊन हा विषय संपणार नाही. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे, विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे आणि उत्तरदायी प्रशासन उभे करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. देशातील युवकांचा हा जागृत आवाज लोकशाहीच्या बळकटीकरणाचा नवा अध्याय ठरेल अस खासदार वाजे यांनी म्हटलं आहे.
धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP ची उरलेली दुसरी व तिसरी अशा दोन्ही मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. सर्व आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. तसेच यापुढेही कोणत्याही आंदोलकावर गुन्हे दाखल होणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे.
CJP चे सौरभ दास यांनी यासंदर्भातील माहिती पत्रकारपरिषदेत दिली. जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही पत्रकापरिषद झाली. तर तिसरी मागणी, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबालाही सरकार मदत करणार असल्याचं नड्डांनी सांगितलं. या पत्रकारपरिषदेनंतर तीन्ही मागण्या पूर्ण झाल्याने CJP ने दिल्लीत जंतरमंतरवर सुरु असलेलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, तरी आंदोलन सुरूच राहणार, दीपके यांच्या आणखी 2 मोठ्या मागण्या- ज्या विद्यार्थींनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाना एक कोटीची आर्थिक मदत. दिली पाहिजे. गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांनी जो लाढीचार्ज केला होता, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. 20 जुलैनंतर ज्या-ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले ते सर्व मागे घेतले पाहिजेत, अशा मागण्या दीपके यांनी कायम ठेवल्या आहेत.
"धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी देशाचे नवे शिक्षणमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. फडणवीस हे उच्चशिक्षित आणि वकील आहेत, तसेच ते विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत असतात.
"हा नव्या पिढीचा मोठा विजय आहे. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या संपूर्ण व्यवस्थेचा सरकारने अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. परीक्षा पेपरफुटी रोखण्यासाठी ठोस आणि प्रभावी पावले उचलावी लागतील. आजच्या काळात इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेले तरुणांचे हे आंदोलन रस्त्यावर उतरले आणि अखेर जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या, असंख्य मित्रपक्षांचा पाठिंबा असलेल्या भारतीय जनता पक्षालाही झुकावे लागले. हा तरुणांचा मोठा विजय आहे. मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी या आंदोलनातून धडा घ्यायला हवा. भविष्यात परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी लागेल, जेणेकरून पेपरफुटी होणार नाही. तसेच, तरुणांसाठी रोजगार आणि नोकरीच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठीही सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत," असे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला असला तरी तो मंजूर व्हायचा आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांनी राजकीय पातळीवरून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मोठं विधान केले आहे. राहुल गांधी यांनी ‘विद्यार्थ्यांच्या तीन मागण्या आहेत आणि त्या कोणत्याही परिस्थितीत टाळता येणार नाहीत, तसेच धर्मेंद्र प्रधान यांचे खातं बदलून चालणार नाही, तर त्यांना मंत्रिमंडळातून वगळा’, अशी मागणी केली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर नाईलाजाने का होईना राजीनामा द्यावा लागला. यानंतर महाराष्ट्रात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्त्वाने दिल्लीत इतक्या तातडीने का बोलावून घेतले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतरच याबद्दलचा तपशील समोर येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार पहाटेच पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आषाठी एकादशीनिमित्त आपल्या पत्नीसमवेत पांडुरंगाची महापूजा केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीवेळापूर्वीच दिल्लीत पोहोचले आहेत.
NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग 28 दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. तसंच, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार. देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चितपणे नमूद करावसं वाटतं.
आंदोलनाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आणि मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आंदोलकांनी आज सायंकाळी 6 वाजता देशातील प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात शांततापूर्ण 'कॅन्डल मार्च' काढण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत उद्या होणारे आंदोलनासंदर्भार काय करायचे याची चर्चा करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थोड्याच वेळात मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. ठाकरे बंधू यांची थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत, ते पूर्ण मागे घेतले पाहिजे, अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टी उपहासात्मक आंदोलकांनी केली. अभिजित दिपके यांनी पोलिस अधिकाऱ्यांची नावे घेत, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली.
कॉकरेज जनता पार्टी या उपहासात्मक पक्षाच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता यश आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आज दुपारी चर्चा होणार होती. तत्पूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः समाज माध्यमांवर राजीनामा दिल्याची माहिती दिली.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर विठ्ठलमय झाले असतानाच एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. वारीसाठी आलेल्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) एका जवानाने स्वतःवर बंदुकीने गोळ्या झाडून आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे पंढरपूरसह पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. रामेश्वर ध्रुपद साबणे असे जीवन संपवणाऱ्या 30 वर्षीय एसआरपीएफ जवानाचे नाव असून ते मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी होते.
भारत-नेपाळ सीमेवर संयुक्त कारवाई करत सशस्त्र सीमा बल (एसएसबी) आणि पोलिसांनी ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा फरार सदस्य विक्रमजीत सिंह आणि अमेरिकी नागरिक मनवीर सिंह ढिल्लन यांना अटक केली. दोघेही नेपाळमार्गे भारतात बेकायदा प्रवेश करत असताना पकडले गेले. या प्रकरणात त्यांना मदत केल्याच्या आरोपावरून आणखी तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
जंतर-मंतरवरील CJP आंदोलनादरम्यान आंदोलकांना जेवण पोहोचवण्यावर निर्बंध लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. अन्नपुरवठा आणि फूड डिलिव्हरीवर मर्यादा घालण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे आंदोलनस्थळी नव्या वादाला तोंड फुटले आहे. या घडामोडींवर देशभरातून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
अभिजीत दिपके यांच्या बहिणीने राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करून न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. CJP आंदोलन सुरू असताना हे निवेदन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
CJP आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दिपके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी, "दिल्ली पोलिसांनी RSSचा गणवेश घालावा," असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक स्तरावर नव्या चर्चेला सुरुवात झाली.
दिल्लीतील नीट पेपरफुटी आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मुंबईत शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा तिरंगा मोर्चा निघणार आहे. मोर्चा शांततेत पार पडावा आणि विशेषतः विद्यार्थिनींना कोणताही त्रास होऊ नये, असा कडक इशारा राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे दिला.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन हे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा घडवण्यासाठी आहे. मात्र, विरोधी पक्षातील काही नेते या आंदोलनात घुसून स्वतःचा राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत' सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे वितरीत करण्यात आले. संकटांमध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी देण्याचा शब्द राज्यशासनाने पाळला असून देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
'हा 'तिरंगा मार्च' आहे. हा पूर्णपणे अराजकीय आहे, इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या समर्थनाच्या घोषणा नसतील. सरकारचा निषेध असेल, आणि देशभरातील विद्यार्थ्यांना आणि तरुण तरुणींना आपण जो पाठिंबा दर्शवत आहोत त्यासाठीच्या घोषणा असतील. मोर्च्याचे निमंत्रक मी आणि उद्धव असलो तरी आमच्याही नावाने कुणी घोषणा द्यायच्या नाहीत. हा विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे याचं भान आपण बाळगायचं आहे आणि ते तुम्ही बाळगालच याबद्दल तिळमात्र शंका नाही.', असे देखील राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईसाठी एक नवीन अध्याय सुरु केला आहे. या तरुणाईला दिशा द्यायला आशा आकांक्षा पूर्ण करायला. मोदीजी (PM Modi) हा नवा अध्याय लिहत आहेत. त्यातही पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी करतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते शनिवारी पहाटे पंढरपूरमध्ये विठुरायाची महापूजा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा नागपुरातील वकिलांकडून निषेध केला आहे. विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी नागपुरातील वकिल मंडळींनी पुढाकार घेतला आहे.
राज्यात यंदा सर्वत्र झालेल्या दमदार पावसामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. पुण्यात २१ जुलै पर्यंत डेंग्यूचे ३७६२, तर हिवतापाचे २०३६ रुग्ण आढळून आले आहेत
१३ किलोमीटर मार्गावरील मेट्रोच्या सर्व वैधानिक चाचण्या यशस्व झाल्या आहेत. प्रत्यक्ष प्रवासी सेवेच्या शुभारंभाच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकण्यात येत आहे. हिंजवडी आयटी पार्कला शहराशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका-३च्या प्रवासी सेवेचा मार्ग आता अधिकृतरीत्या लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी खुला होणार आहे.
आषाढी एकादशी निमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात पूजा झाली. यावेळी फडणवीसांनी शेतकरी, पंढरपूर कॉरिडोअर, जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलन याबाबत सविस्तर भाष्य केले. पंढरपूर कॉरिडोअरचं काम यावर्षी सुरु झाले पाहिजे. त्यासाठी दोन-अडीच वर्षे लागतील. या कामाविषयी 80 ते 90 टक्के लोकांच्या शंका दूर झाल्या आहेत. उर्वरित लोकांच्या शंकाही दूर होतील. कॉरिडोअर पूर्ण झाल्यावर पंढरपूर नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणार्या प्रत्येक व्यक्तीला पांडुरंगचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.