Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती द्या, मुख्यमंत्र्यांचे शासनाला आदेश

Marathi Breaking Live Headlines Updates : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शहांची भेट, यासह आज २८ जुलै रोजीच्या देशासह, राज्यातील राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युुरो

NEET परीक्षेत अपयश आल्याने कराड तालुक्यातील मुलीने संपवलं जीवन

नीट (NEET) परीक्षेत अपयश आल्याने कराड तालुक्यातील शेरे येथील समीक्षा दीपक पवार या विद्यार्थीनीने आपलं आयुष्य संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीक्षाने मागील वर्षी नीट परीक्षा दिली होती. मात्र, निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्यामुळे ती काही काळापासून मानसिक तणावाखाली होती. या नैराश्याच्या अवस्थेत तिने २३ जुलै रोजी उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध प्राशन केले. सुरुवातीला तिने ही बाब कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती. मात्र, घटनेनंतर दोन दिवसांनी तिची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिने विषारी औषध घेतल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. नातेवाईकांनी तातडीने तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली.

शालेय बस सुरक्षेसाठी सुधारित नियम लागू

सर्व शालेय बस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस विथ पॅनिक बटण, फायर डिटेक्शन अँड अलार्म सिस्टिम , सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टिम, डिजिटल उपस्थितीची नोंद जतन करणे बंधनकारक असणार आहे. तीन महिन्यांत अंमलबजावणी बंधनकारक असेल.

महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (प्रथम सुधारणा) नियम, २०२६ लागू करण्यात आले आहेत. सुधारित नियमानुसार मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यातील इतर भागात शालेय बस व शालेय व्हॅनच्या परवान्यासाठी वाहनाची नोंदणी दिनांकापासूनची वयोमर्याद १५ वर्षांवरून २० वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे. शालेय बसच्या शुल्काचे निर्धारण करण्याचे अधिकार संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांना प्रदान करण्यात आले आहेत.

IMA आणि MARD चा सरकारला आंदोलनाचा इशारा

काही होमिओपॅथी डॉक्टर MMC (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) यांच्याकडे ठिय्या आंदोलन करून नोंदणी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा IMA चा आरोप आहे. या दबावाला बळी पडून BHMS चिकित्सकांना एकही नोंदणी देण्याच्या सरकारने प्रयत्न करू नये, अशी IMAची मागणी आहे. यासाठी आय एम ए महाराष्ट्र राज्य, MARD, तसेच इतर समविचारी वैद्यकीय संघटनांनी सरकार ने असा कोणताही निर्णय पुढे नेल्यास, या संघटनाचे सदस्य डॉक्टर तात्काळ सेवा बंद आंदोलन सुरू करतील, असा इशारा इंडिया मेडिकल असोसिएशनने दिला आहे.

पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती द्या, मुख्यमंत्र्यांचे शासनाला आदेश

पुण्यातील बहुप्रतिक्षीत उच्च द्रूतगती वर्तुळाकार मार्गासाठी (एचसीएमटीआर) शासकीय जागा महापालिकेची अडवणूक न करता मोफत हस्तांतरण करा, रिंगरोडसाठी रोख मोबदला द्या, पाताल लोक प्रकल्पासाठी बोगद्यांच्या अलाईमेंट तज्ज्ञांकडून तपासून घ्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाच्या विविध विभागाला दिले आहेत. या तिन्ही प्रकल्पाच्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक झाल्याने या प्रकल्पांना बुस्ट मिळाले आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाच बोगदे, पीएमआरडीए रिंगरोड आणि एचसीएमटीआर या तीन प्रकल्पांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जुलैच्या अवघ्या सहा दिवसात 144 तालुक्यात 100 टक्के पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण 355 पैकी 144 तालुक्याने जुलैची पावसाची शंभर टक्के सरासरी गाठली आहे. 95 तालुक्यात 50 टक्के तर 39 तालुक्यात 25 ते 50 टक्के इतका पाऊस झाला आहे. जुलैमध्ये एकही तालुका रेड झोन मध्ये नाही मुंबई आणि कोकण मध्ये महाराष्ट्राने सरासरी गाठली आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाने सरासरीखूप कमी असल्याची हवामान विभागाची माहिती आहे.

राजधानी दिल्लीत आता राजकीय घडामोडींना वेग

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकर यांनी केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनावणे हे अमित शहांच्या भेटीला पोहोचले यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उदाहरण आलं आहे.

पुण्यातील दिवे घाट आज दुपारी १२ ते २ पर्यंत बंद

दिवे घाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगसाठी रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. आज दुपारी १२ पासून वाहनचालकांसाठी घाट राहणार बंद असेल तर या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार असल्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने आवाहन केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT