Marathi Breaking Live Headlines Updates Sarkarnama
महाराष्ट्र

Independence Day Live Updates : मुंबईसह राज्यभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; CM, DCM यांच्या हस्ते ध्वजारोहण

Marathi Breaking Live Headlines Updates: स्वातंत्र्य दिन सोहळ्याशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण, लाल किल्ल्यावरचे कार्यक्रम आणि ‘वंदे मातरम्’ गायनाशी संबंधित प्रत्येक क्षणाची माहिती मिळवण्यासाठी वाचा एका क्लिकवर...

सरकारनामा ब्युरो

मुंबईसह राज्यभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; CM, DCM यांच्या हस्ते ध्वजारोहण

देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यभरात उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्राची पुढील पिढी दुष्काळमुक्त पाहण्याचा संकल्प व्यक्त केला.

Hormuz Donald Trump : होर्मुजच्या सामुद्रधुनीला अमेरिका लवकरच स्वतःचे क्षेत्र म्हणून घोषित करणार; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने खळबळ

अमेरिका अन् इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीला अमेरिका लवकरच स्वतःचे क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. न्यूयॉर्क स्टेटमधील एका पोलिस अकादमीत आयोजित रॅलीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली असून आखातात याचे तीव्र पडसात उमटण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis : नदीजोड प्रकल्पातून महाराष्ट्राला कायमचा दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने आणि या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघितला. पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुके असतील या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळ मुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी राज्याला संबोधित केले. महाराष्ट्र देशाचे स्टार्टअप कॅपिटल झाले आहे.

Farmer Hingoli : शक्तिपीठ महामार्गाविरोधात मंत्री झिरवळ यांच्यासमोर शेतकरी आक्रमक

हिंगोलीत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शक्तिपीठ महामार्गाविरोधात कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्याचा प्रकार झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहाचा शेतकऱ्यांनी ताबा घेतला. आक्रमक शेतकऱ्यांसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेटमध्ये चर्चा करतो, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र चर्चा न केल्याने शेतकरी संतप्त झाले होते.

Congress Vs BJP : भाजप अन् संघाची दलित-आदिवासींबद्दल नीच मानसिकता; खासदार बळवंत वानखडे संतापले

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उत्तराखंड येथील सभेनंतर त्या मंचाचे शुद्धीकरण करण्याची संतापजनक घटना घडली होती, यावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. भाजप आणि संघाची अतिशय नीच मानसिक दृष्टी आहे. दलित आणि आदिवासी बांधवा बद्दलची भाजप आणि संघाची ही मानसिकता गेलेली नाही. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेची विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांचा सर्वात मोठा काळ राजकीय क्षेत्रात गेला आहे. त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो, असा घणाघात खासदार वानखडे यांनी केला.

Jalgaon Crime : मुक्ताईनगरमधील बेलसवाडी येथे एका 18 वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या

जळगावच्या मुक्ताईनगरमधील बेलसवाडी येथे एका 18 वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. अबुजर रफिक शेख असे मृत युवकाचे नाव आहे. ​घटनेचे गांभीर्य ओळखून मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र चाटे हे त्यांच्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरून चाकू, लाकडी दांडा आणि चप्पल जप्त करण्यात आली असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Amravati News : डोमा गावच्या आश्रमशाळेतील भूतबाधेच्या खोट्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात फौजदारी; मंत्री भुसे यांचा इशारा

मेळघाटमधील डोमा गावच्या आश्रमशाळेतील भूतबाधेच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. भूतबाधेच्या खोट्या अफवा ज्यांनी कोणी पसरवल्या असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी शिक्षण विभागाला सोबत घेऊन त्या ठिकाणी काम केलं जाईल, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

Ahilyanagar News : अहिल्यानगर पोलिस दलाच्या मुख्यालयात ध्वजवंदन उत्साहात; मंत्री विखे पाटील यांनी दिल्या शुभेच्छा

देशभरात आज 80 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त अहिल्यानगर येथील पोलिस परेड मैदानात ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन कार्यक्रम झाला. पोलिस दलाच्या विशेष पथकाने पालकमंत्री यांना मानवंदना दिली. ध्वजवंदनच्या या कार्यक्रमासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी पंकज आशिया, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांसह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Latur News Update : उदगीरमध्ये स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा प्रयत्न; भुयारी गटाराच्या कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

लातूरच्या उदगीरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी आंदोलकाने केली. भुयारी गटाराच्या कामाची गुणवत्ता, झालेला खर्च आणि कामाच्या प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आत्मदहनाचा प्रयत्न होताच पोलिस प्रशासनाने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Buldhana News : बुलढाण्यात पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण..

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, आमदार मनोज कायंदे, संजय गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचा सोहळा देशभक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.

Dhule News : धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न...

मानव विकास मिशन अंतर्गत भ्रष्टाचाराची चौकशी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांनी आत्मदानाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. उमेद प्रकल्पामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. गेल्या सहा दिवसांपासून बिराड आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची दखल प्रशासनातर्फे घेतली जात नसल्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

Kolhapur News: जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत अमित कांबळे या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर असलेल्या व्यक्तीने आपल्या कागदपत्रांचा वापर करून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप कांबळे याने केला आहे.

विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देण्यासाठी विविध केंद्रे उभारण्याचीही घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या.

कुंभेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष मोबाईल टॉवर पोलीस व्हॅनच लोकार्पण

नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर पदक प्राप्त पुरस्कर्त्याना पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. कुंभेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष मोबाईल टॉवर पोलीस व्हॅनच लोकार्पण केलं जाणार आहे.

PM Modi Speech : 'हीच प्रगतीची गती आहे; हाच विस्ताराचा आवाका आहे: मोदी

"पर्यायी ऊर्जा स्रोतांकडे आपली संपूर्ण ऊर्जा वळवण्यासाठी 'ऊर्जा सुरक्षा' अत्यंत महत्त्वाची आहे, यावर मी भर दिला आहे; परिणामी, ऊर्जेचा वापर अधिक कार्यक्षम करत भारत आज या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. २०१४ पूर्वी — म्हणजेच १२ वर्षांपूर्वी — देशभरात केवळ ७० शहरांमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध होता. या १२ वर्षांत आम्ही ही व्याप्ती ७० शहरांवरून ७०० शहरांपर्यंत वाढवली आहे. हीच प्रगतीची गती आहे; हाच विस्ताराचा आवाका आहे..." असे मोदी म्हणाले.

Independence Day Live Updates: 'नो-गो झोन' संपवला-मोदी

क्रूड ऑइलवरील (कच्च्या तेलावरील) अवलंबित्वाचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, जुन्या संकुचित मानसिकतेमुळे देशाच्या ९९% सागरी किनारपट्टीला (Coastline) 'नो-गो एरिया' (No-Go Zone) घोषित करण्यात आले होते. आपण समुद्राच्या खोलवर संशोधन न करण्याचा निर्णय घेतला होता. ती विचारांची गरिबी होती. आम्ही ही परिस्थिती बदलली असून, आता ९९% सागरी क्षेत्र 'गो-अहेड झोन' (Go-Ahead Zone) म्हणून खुले केले आहे.

लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: मोदी

140 कोटींची लोकसंख्या असलेला देश विकसित होण्याचा संकल्प करतो तेव्हा तेव्हा जगात हे त्या देशाच्या साहसाचे प्रतिक ठरते. जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. हे मी असंच बोलत नाही. गेल्या 12 वर्षात देशातील कोट्यवधी नागरिकांनी गरीब-श्रीमंत, शहरी असो ग्रामीण असो, प्रत्येकाने गेल्या 12 वर्षात समर्पणाच्या भावनेने देशाला उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

80th Independence Day Live Updates: भारत आज 15 ऑगस्ट 2026 रोजी आपला 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, अभिमानाने आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्राला संबोधित करणार आहेत. यंदाचा सोहळा अनेक अर्थांनी खास आहे. पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन सोहळ्यादरम्यान लाल किल्ल्यावर ‘वंदे मातरम्’चे गायन होणार आहे. हा कार्यक्रम ‘वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच ‘युवा शक्ती’च्या योगदानाला अधोरेखित करणारा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT