महामानवांच्या विटंबनाप्रकरणी अहिल्यानगरमधील जनआक्रोश मोर्चाला सुरूवात झाली आहे. आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर हे मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आणि या प्रकरणांमध्ये सखोल चौकशीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी हे पक्षप्रवेश होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली आहे.
ठाणे शहरातील पाणी समस्या, वाहतूक कोंडी समस्या व रस्त्यातील खड्यांच्या प्रश्नांना अनुसरून उद्या सोमवारी मनसेचा व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचा ठाण्यात मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांचे देखील फोटो बॅनवर झळकले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ओला दुष्काळ जाहिर करा, शेतकऱ्यांना सरसकट, विना अट 50 हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई द्या व संपूर्ण कर्जमाफी याशिवाय अन्य महत्वपूर्ण मागण्यांसाठी मागील 13 दिवस पासून बेमुदत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात आज महायुती सरकार निषेध म्हणून तेरवीच्या जेवणाचा कार्यक्रम झाला.
जालन्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी धुळे-सोलापूर महामार्गावरील दुनगाव फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, या मागणीसाठी अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी या महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
संजय राऊत यांना पत्रकारांनी त्यांना कबुतरखान्याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले. कबुतरखान्या संदर्भात भारतीय संविधानात असं कधी म्हटलं आहे का? की कबुतरखाने हटवू नये. यामुळे कबुतरखान्यामुळे लोकांच्या आरोग्याला त्रास होतो, लोकांना अडचणी येतात आणि प्रकृती बिघडते, ज्यामुळे लोकांमध्ये आजार निर्माण होतात. त्यापेक्षा मरीन लाईन्सला लोढांचा एक जनकल्ब निर्माण झाला आहे. ग्रँड मेडिकल जिमखाना हा जैन समाजाने घेतला आहे. त्या मैदानात कबुतरखाना करावा
राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणात सर्वात आधी परवडणाऱ्या घरांना प्राधान्य देण्यात आले आहे. सिडकोकडूनही मोठ्या संख्येने घरांची निर्मिती केली जात आहे. मात्र सिडकोची घरे महाग आहेत, ती लोकांना परवडत नाहीत. त्यामुळे सिडकोला घरांच्या किंमती कमी करण्यास सांगितलं आहे. लवकरच सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होतील, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
बीड कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या कैदाने कारगृहाचे अधिक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केला आहे, गायकवाड हे कैद्यांवर धर्मांतरणासाठी दबाव टाकत मारहाण करत असल्याचे कैद्याने म्हटले.
पुणे पोलिसांकडून इंटरपोल शी पत्र व्यवहारानंतर गुंड निलेश घायवळ विरोधात 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी करण्यात आली आहे. फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आरोपींच्या तपासासाठीची माहिती आणि ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते.
नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजप नेते सुनील बागूल यांना अटक केली आहे. गंगापूर गोळीबार प्रकरणात सुनील बागुल यांच्यासह त्यांचा पुतण्या अजय बागुलला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मुख्य आरोपी अजय बोरीा आणि तुकाराम चोथवे हे अद्याप फरार आहे.
महाराष्ट्रातील 5 समुद्रकिनाऱ्यांनी 'ब्लू फ्लॅग पायलट' हा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवला आहे. समुद्रकिनाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व पर्यावरण स्नेही धोरणांतून भविष्याची वाट निश्चित करण्यासाठी आपण केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आलेले हे यश प्रेरणादायी आहे. आंतरराष्ट्रीय ब्लु फ्लॅग पायलट दर्जासाठी महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांची घोषणा "ब्ल्यू फ्लॅग इंडिया" या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.' महाराष्ट्रातील पर्णका बीच (डहाणू, पालघर), श्रीवर्धन बीच (रायगड), नागाव बीच (रायगड), गुहागर बीच (रत्नागिरी) आणि लाडघर बीच (रत्नागिरी) या समुद्रकिनाऱ्यांना मिळालेले हे यश म्हणजे शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या शासनाच्या कटिबद्धतेची आणि दूरदृष्टीच्या कामाची पावती आहे. भविष्यात आपल्या किनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे पर्यटन वाढेल आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल हा मला विश्वास आहे, असे अदिती तटकरे यांनी म्हटले.
'प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने'चा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, पुसा, नवी दिल्ली येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे झाला. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत राज्यातील ९ जिल्ह्यांची निवड झाली असून केंद्राच्या व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर (कनेरसर) (ता.खेड) आणि वाबळेवाडी (ता. शिरुर) शाळेत राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, तंत्रज्ञानयुक्त शिक्षण, लोकसहभागातून शाळा विकास आदी बाबींची राज्य शासनाने दखल घेतली असून या बाबी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या आहेत, त्यामुळे या शैक्षणिक पॅटर्नची राज्यभरामध्ये अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज एकत्र येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये दुपारी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला दोन्ही नेते एकत्र येतील. या बैठकीमध्ये साखर कारखान्यांच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.