कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या विरोधात आणि शहरातील रस्ते उत्तम दर्जाचे करावे यासाठी सर्किट बेंच पुढे जनहित याचिका दाखल झाली आहे. कोल्हापुरातील 77 रस्त्यांचा सर्वे करून सर्किट बेंच पुढे जनहित याचिका दाखल करण्यात आली. शहरांतर्गत रस्त्यांवर खड्डे आणि धुळीमुळं नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासन खराब रस्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अॅड. असीम सरोदे, कॉम्रेड उदय नारकर, भारती पवार, डॉ. रसिया पडळकर यांच्यासह अन्य नागरिकांनी केली जनहित याचिका दाखल केली आहे.
नागपूर ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती होणार नाही याची शंका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही वाटत आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत अनेक नेत्यांनी ती व्यक्त केली. निवडणूक जाहीर झाल्यावर महायुतीबाबत जे व्हायचे ते होईल, त्यापूर्वी आपली तयारी करून ठेवण्याचे निर्देश या बैठकीत शिवसैनिकांना देण्यात आली. झेडपी आणि नगर पालिकांची निवडणूक आधी होणार आहे. या निवडणुकीचे निकाल बघून महापालिकेत युती करायची की नाही याचा निर्णय घ्यायचा असा धोरणात्मक निर्णयही या बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते. हे बघता आता युती होणार नाही हे एकदाचे स्पष्ट झाले आहे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी “मराठ्यांना माझा इतिहास कदाचित माहिती नाही” असे वक्तव्य करून नवीन वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अॅड. योगेश केदार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अॅड. केदार म्हणाले, “भुजबळ यांनी मराठ्यांविषयी केलेलं विधान हास्यास्पद आहे. मंडल आयोगाच्या काळात कमंडलवाल्यांच्या बाजूने उभे राहून रस्त्यावर गोमूत्र शिंपडणारे आज ओबीसींचे मसीहा बनण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा इतिहास आम्हाला चांगलाच माहिती आहे”
राजकीय क्षेत्रात भुजबळ यांच्या वक्तव्यावर आणि केदारांच्या प्रतिक्रियेनंतर नव्या वादळाची चिन्हं दिसत आहेत.
बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेवर जोरदार हल्लबोल केला. ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे आहे. आमच्या ताटातले आम्ही कोणाला देणार नाही. राज्य सरकारने 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करावा, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
ठाकरे बंधू मनसेच्या दीपोत्सव सोहळ्यात पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने होणाऱ्या या दीपोत्सवाला यंदा उद्धव ठाकरे उद्घाटनाला लाभणार आहेत. त्यांना खास निमंत्रण भाऊ राज ठाकरेंनी दिले आहे. जिथे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकाच मंचावर पाहायला मिळणारे आहेत.
भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह आमदार उपस्थितीत होते. पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले. बुऱ्हाणनगर परिसरातील नागरिकांसह शहर जिल्हा आणि महाराष्ट्रातून नागरिकांची गर्दी जमली होती.
बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होत आहे. मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यांचे मंचावर आगमन झाले आहे. या मेळाव्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी मोठी गर्दी केली आहे.
मनसेच्या दीपउत्सवाचे दिपप्रज्वलन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी शुक्रवारी सायंकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली.
मनसेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव साजरा केला जात आहे. या वर्षी दीपोत्सला महत्त्व प्राप्त होणार आहे, कारण उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू दीपोत्सवच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. दीपोत्सव निमित्ताने तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही भाऊ दिवाळीतच राजकीय धमाका करता की काय याकडे लक्ष लागले आहे.
अजित पवारांच्या हस्ते बारामती शहरातील सावतामाळी सभागृह भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. कुठं भिंतीवर हार्ट काढत बसू नका, मी कॅमेरे बसवणार आहे. कुणी सापडले तर त्याला टायरमध्येच टाकतो, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला.
बीडमध्ये आज मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत 'महाएल्गार' मेळावा होणार आहे,. थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार असून मोर्चासाठी छगन भुजबळ बीडमध्ये दाखल झाले आहेत. ओबीसींकडून मोठे शक्तीप्रदर्शन मराठवाड्यात केले जाणार आहे.
अकोल्यात मांस विक्रीवरून आज दोन गट आमनेसामने आले. बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती आहे. गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर टाकलेल्या धाडीनंतर हा वाद पेटल्याचे समजते.
राज्य शासनाने गुरूवारी काढलेल्या जीआरवरून आमदार रोहित पवारांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कालचा मदतीचा जीआर बघितला असता, २१ लाख शेतकऱ्यांना १३१० कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला ६२२१ रु. मदत, एवढ्या तुटपुंज्या मदतीत काय होणार आहे? लाखोंचे नुकसान आणि सरकारची ५-६ हजाराची मदत, हे या अलिशान सरकारला शोभते का? राज्य सरकारने घोषित केलेले मदतीचे पॅकेज फसवे असल्याचं आम्ही आधीच सांगत होतो, आता सरकारच्या कालच्या जीआरने सरकारच्या ढोंगीपणावर शिक्कामोर्तबच केले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता वाढू लागला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही प्रचारात सक्रीय झाले आहे. बिहारमध्ये 'एनडीए'चीच हवा असून येथील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पुन्हा एनडीएची सत्ता आणेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
सध्या महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटलेला असताना काँग्रेसने मोठा राजकीय डाव खेळला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्देशानुसार प्रा. यशपाल भिंगे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नाशिक येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नवीन उत्पादन केंद्रातून तेजस LCA Mk-1A या स्वदेशी लढाऊ विमानाचे उद्घाटन केले. आज तेजसने पहिली उड्डाण भरत भारताच्या संरक्षणशक्तीत नवा अध्याय लिहिला असून वायुसेनेची ताकद अधिक वाढली आहे.
गुजरातमध्ये आज मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार झाला. गांधीनगरच्या महात्मा मंदिरात झालेल्या शपथविधी सोहळ्यात १९ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. हर्ष संघवी यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड होताच राज्यातील राजकारणाला नवा वेग मिळाल्याची चर्चा रंगली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा कार्यकर्त्यांनी घेराव घालत आरक्षणाच्या फसव्या जीआरचा जाब विचारला. “2 सप्टेंबरच्या जीआरनंतर किती प्रमाणपत्रे मिळाली?” असा सवाल करत पैठणच्या कार्यकर्त्यांनी रामा हॉटेलबाहेर निवेदन दिले. सरकारवर फसवणुकीचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. पण अद्याप मदत मिळाली नाही, याचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिवाळीच्या दिवशी एक तास दिवे बंद करुन सरकारचा निषेध करावा, असे आवाहन काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही आठ महिन्यांपासून पगाराचा प्रश्न न सुटल्यामुळे शहादा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आजपासून शहरातील सर्व स्वच्छता कामकाज ठप्प झाले आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बीड तालुक्यातील पूरग्रस्तांशी संवाद साधला. सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप करण्यात आले. खाद्यपदार्थांसह, कपडे, दिवाळीचे साहित्य आणि फटाके देखील देण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाने राज्यात'सण महाराष्ट्राचा - संकल्प अन्नसुरक्षेचा' हे अभियान सुरु केले आहे. ही मोहीम दिवाळीपर्यंत म्हणजे २५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. ११ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर या कालावधीत घेतलेल्या तपासणी जवळपास ८ लाख ३ हजार ९४२ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, अहवालांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
लोंढे टोळीचे प्रमुख प्रकाश लोंढे,दीपक लोंढे हे अटकेत असताना देखील टोळीकडून नाशिकमध्ये गुंडागिरी कायम आहे. टोळीतील सदस्यांनी एकजणावर प्राणघातक हल्ला केला. डोक्यात कोयता मारत, जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला.
हैद्राबाद गॅझेट जीआरमुळे मराठवड्यातील मराठा समाज आरक्षणात येईल, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. मात्र, हैद्राबाद गॅझेट जीआरचा फायदा झाला नसून ज्यांच्याकडे कागदपत्रे आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळत असल्याचे ओबीसी नेते बबनराव तायवडे यांनी म्हटले आहे.
राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही काळापासून त्यांनी तब्येत ठीक नसल्याचे सांगितले जात होते.
सोलापुरातील विविध पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये माजी उपमहापौर पद्माकर काळे, दिलीप कोल्हे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर माजी सभागृह नेता सुरेश पाटील, बिज्जू प्रधाने यांनी भाजपत घरवापसी केली आहे.
कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमधील 10 सदनिकावर गुंड निलेश घायवळने बेकायदेशीर ताबा घेतला होता. या सदनिका भाड्याने देऊन त्यातून पैसे कमवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या सदनिका खाली करू सील करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेत.
महानगरपालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धतीवर आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने याचिकाकर्त्याला तांत्रिक कारणांवरून चार आठवड्यात याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या उमेदवारांचा गटनिहाय मतदान करायचे आहे. त्यामुळे ही पद्धत असंवैधानिक आहे आणि मूलभूत अधिकारांचे हनन करणारी असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.
जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरला 10 लाखांची लाच घेताना जालना एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. महानगरपालिके अंतर्गत केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून ही लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.