नांदेडमधील फायनान्स कार्यालयात झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुखाची बदली करण्यात आली. फायनान्स कार्यालयाचे धागेदोरे कुबेरफल पतसंस्थेपर्यंत पोहोचले होते. या पतसंस्थेचा अध्यक्ष आणि सचिवाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांना पथकाचे प्रमुख करण्यात आले. पण कुबेरफल पतसंस्थेच्या उदघाटन समारंभात रामेश्वर व्यंजने प्रमुख पाहुणे म्हणून उपास्थित असल्याचे समोर आले. त्याचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे व्यंजने यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला गेला. दोन दिवसापूर्वी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी एसआयटी प्रमुख बदली करण्याची मागणी केली होती. त्यानुसार व्यंजने यांना हटवून अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. विशेष पथकात कोणाला घ्यावे याचे सर्व अधिकारही अर्चना पाटील यांना देण्यात आले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांकडून ज्या शेतकऱ्यांवर खासगी पतसंस्थाचे कर्ज आहे, आणि सातबारावर बोजा आहे, अशा शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ होत होती. अशा गंभीर तक्रारी आमदार श्वेता महाले यांच्याकडे शेतकऱ्यांनी केल्यावर, त्यांनी उदयनगर येथील स्टेट बँकेच्या शाखेत जात बँक मॅनेजरला चांगलेच धारेवर धरत खडसावले. शेतकऱ्यांकडून बाँड पेपरच्या नावाखाली पैसे घेतले, त्यांचे सहाशे रुपये सुद्धा परत देण्याचे सांगितले. यावेळी बँक मॅनेजर सुद्धा पैसे परत करू म्हणत वरिष्ठांचा निर्णयानुसार कारवाईचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा, आमदार महाले यांनी दिला.
दिल्ली पोलिसांनी एक नोव्हेंबर रोजी मिंटो रोड येथे ताब्यात घेतलेल्या आंदोलकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. रामलीला मैदानावर रॅली काढण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, दिशा ग्रुपच्या काही आंदोलकांनी जंतरमंतरच्या दिशेने मोर्चा काढण्याचा कथित प्रयत्न केला. जंतरमंतर हे आता आंदोलनासाठीचे अधिकृत ठिकाण राहिलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी सायंकाळी सुमारे पाच वाजता हा मोर्चा काढला होता.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणाऱ्या केलेल्या ट्विटबाबत काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, "तुम्ही संसदेत येतच नाही. पंतप्रधान स्वतःला इतके नाजूक समजतात की, संसदेत गेल्यानंतर कुणी आपल्याला प्रश्न विचारेल आणि त्याची उत्तरे द्यावी लागतील, अशी त्यांना भीती वाटते. तुम्ही लोकशाही देशाचे पंतप्रधान आहात. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारले जाणारच आणि त्या प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला द्यावी लागतील. तुम्ही पत्रकार परिषद घेत नाही. गेल्या 12 ते 13 वर्षांत तुम्ही एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. संसदेत येण्याचीही तुम्हाला भीती वाटते..."
सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार नरेंद्र मेहता यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. वसईतील वर्सोवा खाडीजवळ सुरू असलेल्या टनेलच काम 200 मीटर होणार होते. मात्र 70 मीटर झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. काम वेळेत पूर्ण न झाल्यास मिरा-भाईंदर शहरातील पाणीपुरवठा सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने मेहता यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिचार्ज मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने डाॅक्टरांनी त्यांनी डिचार्ज दिला.
दिल्लीत रामलीला मैदानावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या रॅलीला गैरहजर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मध्य प्रदेशामध्ये सर्वाधिक 59 जणांना निलंबित करण्यात आले आहे. तर, हरियाणामध्ये देखील पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी स्वतंत्र फॉर्मची गरज नाही आता ईसीआयनेट (ECINet) पोर्टलवर नोंदणी करताना नवीन मतदारांना हे घोषणापत्र वेगळे भरावे लागणार नाही.याआधी फॉर्म ६ मध्ये या घोषणापत्राचे उत्तर देणे बंधनकारक होते.आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी यावर आक्षेप घेतला होता, त्यानंतर आयोगाने हा मोठा निर्णय घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.