Maharashtra Vidhan Sabha Election Sarkarnama
महाराष्ट्र

MLC Election 2026 : विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्याची 'डेडलाईन' जवळ, पण जागावाटपाचा तिढा कायम : ‘लास्ट मिनिट’ला कोण बाजी मारणार?

Maharashtra MLC Election 2026 News : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा चार दिवसाचा कालावधी शिल्लक असताना अद्याप महायुती अन् महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले नाही.

Sachin Waghmare

MLC News : विधानपरिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप आणि उमेदवारांच्या नावांबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. पाचही जागांसाठी प्रमुख पक्षांकडून इच्छुकांची मोठी संख्या असल्याने शेवटच्या टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

महायुतीत फॉर्म्युला जवळपास ठरला :

महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यानुसार पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपकडे, तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाण्याचे संकेत आहेत.

मात्र पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप, शिवसेना पक्षांचा दावा असल्याने अंतिम निर्णयाकडे लक्ष लागले आहे. यामुळे फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त असले तरी प्रत्यक्ष उमेदवारांची अधिकृत घोषणा आणि काही जागांवरील अंतिम तडजोड अद्याप महत्त्वाची ठरत आहे.

पुणे पदवीधरची जागा भाजपकडे गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्येही नाराजी निर्माण झाली आहे. अरुण लाड यांनी गतवेळी एकसंघ राष्ट्रवादीकडून विजय मिळवला होता. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहावा यासाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि इतर नेत्यांचे प्रयत्न सुरु होते. पण आता पुणे पदवीधर भाजपकडे गेल्याचे चित्र स्पष्ट होताच भैय्या माने यांनी बंडखोरीची तयारी केली आहे.

अमरावतीत जागावाटपाआधीच बंडाचा झेंडा

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा पेच मात्र आणखी वाढला आहे. ही जागा शिवसेनेला मिळण्याचे संकेत असतानाच विद्यमान आमदार किरण सरनाईक आणि माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. त्यात देशपांडे यांनी १ ऑक्टोबरला दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. यात एक शिवसेना पक्षातर्फे आणि दुसरा अपक्ष म्हणून. पक्षाने उमेदवारी नाकारली तरी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मविआतही जागावाटपाची चर्चा

महाविकास आघाडीतही पाचही जागांबाबत घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. पुणे आणि नागपूर शिक्षक मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने या जागांवर काँग्रेसचा दावा आहे. छत्रपती संभाजीनगर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघावर मात्र काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून अदिती पोहरे यांच्या नावाची घोषणा यशोमती ठाकूर यांनी केल्याने या जागेवरील आघाडीतील स्पर्धा अधिक चर्चेत आली आहे.

६ ऑक्टोबरनंतर चित्र स्पष्ट होणार?

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे काही दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे जागावाटप, पक्षाचा अधिकृत उमेदवार आणि संभाव्य बंडखोरी या तिन्ही मुद्द्यांवर पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेषतः पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात कोणता पक्ष कोणता दावा सोडतो आणि कोण उमेदवारी अर्ज दाखल करतो, यावर अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT