कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर एग्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. येथे आमदार सतेज पाटील विरूद्ध खासदार धनंजय महाडिक असा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पोलच्या अंदाजनुसार भाजपला २१, शिंदेंची शिवसेना १५, अजित पवारांची एनसीपी ७, काँग्रेस ३४, ठाकरेंची शिवसेना २ तर जनसुरासला २ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली असून यात मुंबई महानगरपालिकेचा समावेश आहे. आज सकाळपासून २२७ जागांसाठी मतदान झाले असून १६ जानेवारी रोजी मुंबईसह सर्वच महापालिकेचे निकाल उघड होणार आहेत. पण त्याआधीच एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले असून मुंबईत ठाकरे बंधूंना झटका बसला आहे. येथे डीव्ही रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार महायुतीतील भाजप-शिवसेनेला (शिंदे) १०७ ते १२२ जागा मिळतील. तर ठाकरे बंधूंच्या युतीला ६८ ते ८३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप शिवसेना युतीला १३१ ते १५१ जागा, ठाकरे बंधूंच्या युतीला ५८ ते ६८ आणि काँग्रेसला १२ ते १६ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार शिशिर जाधव याचे वडील शरद जाधव यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा भाजप उमेदवाराने आरोप केला आहे. प्रभाग क्रमांक चारमधील अमननगर परिसरामध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला. या घटनेमुळे मोठा तणाव निर्माण झाला असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवार 17 जानेवारी 2026 रोजी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या 13 जानेवारी 2026 रोजीच्या पत्रान्वये राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची आचारसंहिता जाहीर झाल्याने ही बैठक रद्द करण्यात आली आहे. सुधारित दिनांक व वेळ कळविण्यात येईल. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी कळविले आहे.
बीड नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद मुळूक यांची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने नगराध्यक्ष तथा पिठासिन अधिकारी प्रेमलता पारवे यांनी मुळूक यांची निवड जाहीर केली. दरम्यान, सारिका क्षीरसागर यांनी नगराध्यक्षांवर सत्तेचा दुरुपयोग करत अन्याय केल्याचा आरोप केला.
अमरावती मध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये बोगस मतदान केल जात असल्याचा बहुजन समाजवादी पार्टीच्या उमेदवाराचा आरोप...
बेलपूरा शाळा नंबर 3 मधील घटना;बोगस मतदानाच्या संशयावरून एका जनाला घेरलं...
ज्या मतदाराला घेरलं तो मतदार भाजपच्या उमेदवाराचा नातेवाईक असल्याची माहिती...
काहीकाळ मतदान केंद्रावर उडाला होता गोंधळ..
धुळे : मतदानाची मुदत संपल्यानंतर मतदान केंद्राबाहेर मतदारांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ
पोलीस प्रशासनातर्फे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावरच उशिरा आलेल्या मतदारांना रोखण्यात आल्याने मतदारांतर्फे करण्यात आला रोष व्यक्त
परंतु नियमानुसार ठरवून दिलेली वेळ संपल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदारांना रोखल्याने काहीकाळ मतदान केंद्राबाहेर तणावाचे वातावरण
मालेगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
दिनांक १५ जानेवारी २०२६
सकाळी ७.३० ते ३.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : ४६.१८%
नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजप उमेदवार नितीन खोले यांच्या घरावर हल्ला झाला. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नितीन खोले हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट व भाजप पदाधिकारी एकमेकांसमोर भिडले.
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता आज सकाळी 07:30 वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला असून सकाळी 07:30 ते 03:30 एकूण 8 तासाची मतदानाची टक्केवारी 39.64% असल्याची माहिती मनपा निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली
बोटावरील शाई पुसल्याचा व्हिडीओ करून जर कुणी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे गैरकृत्य असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये यास्मीन आमेर पठाण ही महिला एका अपक्ष उमेदवाराची पत्नी आहे. तासभर मतदानासाठी रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांना तुमचे मतदान झाल्याचे सांगण्यात आले. बोगस मतदान होत असल्याचा आरोप होत आहे.
उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतूनच प्रत्युत्तर दिले. मतदान सुरू असताना ठाकरे पत्रकार परिषद कशी घेऊ शकतात, असा सवाल शेलार यांनी केला. आयोगावर आरोप करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. ठाकरेंनी केलेले आरोप असत्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीसाठी मतदारांच्या बोटावर लावण्यात येत असलेली शाई पुसली जात असल्याचे आरोप होत आहेत. त्यावर निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी खुलासा केला आहे. याच शाईचा वापर २०११ पासून वापरली जात आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीही मार्कर पेन वापरलेला आहे.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली पहीली प्रतिक्रिया
उध्दव ठाकरेंनी मार्कर पेन वापरून शाई पुसत असल्याने.. लोकशाही पुसली अशी टिका केली होती.
दुबार मतदारांमुळे सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत..
पिंप्री चिंचवडच्या माजी महापौर अपर्णा डोके यांना बहुमताने विजयी करा. अशी फेसबुक पोस्ट करत EVM समोरली बटन दाबताना मोबाईलमध्ये फोटो काढून तो फोटो वायरल करण्यात आला आहे.
निलेश डोके हे उमेदवार अपर्णा डोके यांचे पती आहेत.
याबाबत संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी निलेश डोके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज 81 जागांवर मतदान होत आहे. 20 प्रभागांमधून साडेतीनशेहून अधिक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर 13 जानेवारीपासून जाहीर प्रचारावर पूर्ण बंदी घालण्यात आली होती. यामध्ये सोशल मीडियावरील प्रचारालाही मनाई करण्यात आली होती. तरीही काही उमेदवारांनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रचार सुरूच ठेवला. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याने सायबर पोलीस आणि निवडणूक प्रशासनाने अशा उमेदवारांवर कारवाईचा इशारा दिला असून नियम तोडणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.
‘पैज लावून सांगतो’ असे म्हणत भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान होत असून उद्या मतमोजणी पार पडणार आहे. निकाल जाहीर होण्याआधीच त्यांनी भाजपच्या संभाव्य जागांबाबत भाकीत मांडले आहे. मुंबई महापालिकेत भाजपला 90 जागा मिळतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 40 जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. पुण्यात 165 पैकी 115 जागा भाजप जिंकेल, असे ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये 62, सांगलीत 55, तर इचलकरंजीत 65 पैकी 48 जागांवर भाजपचा विजय होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हे भाकीत कितपत खरे ठरणार, हे उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज 15 जानेवारी 2026 रोजी सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
राज्यभारात महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरु असताना पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रभाग क्रमांक 33, 34 आणि 35 मधील अनेक केंद्रावर मतदानाची शाई पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला आहे. रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह त्यांनी मतदान केले आहे.
जालना शहर महापालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित यांनी मतदानाचा हक्क बजावला.
आज 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. आपल्या प्रत्येकाच्या एका मताने लोकशाही मजबूत होते. कृपया वेळ काढून मतदान करा आणि लोकशाहीचा अधिकार बजावून आपली जबाबदारी देखील पार पाडा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
कोल्हापूर महापालिकेत सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 9.64% मतदान झाले. आत्तापर्यंत 47 हजार 698 मतदारांनी मतदान केले असून 27 हजार 250 पुरुष तर 20447 महिला मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे.
अकोला महापालिकेसाठी मतदान करण्यासाठी गेलेल्या प्रभाग 3 मधील 25 ते 30 मतदारांची नावे मतदार यादीतून गायब असल्याचे समोर आले. हातात मतदान कार्ड आहे.. मात्र मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांना मतदान करता येणार नाही... विधानसभा लोकसभेचे मतदान केलं, मात्र महापालिकेच्या मतदानांपासून इथल्या नागरिकांना आता दूर राहावे लागणार आहे...
नवी मुंबईतील शाळा क्रमांक 94 मधील मतदान केंद्रात मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेला मतदान केले होते. मात्र, या वेळी ते मतदानासाठी गेले असता त्यांचे नाव मतदान यादीत नसल्याचे सांगितण्यात आले. त्यामुळे ते प्रचंड चिडले. त्यांच्या बिल्डिंगमधील काही जणांचे मतदान तेथेच होते. तपासानंतर त्यांना सांगण्यात आले की त्यांचे मतदान सेंट मेरीक मतदान केंद्रावार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेवर बहुमत आमचंच होणार असा विश्वास काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर सध्या भाजपमध्ये नवीन भाजप आणि जुनी भाजप असा वाद सुरू आहे. जुनी भाजप सतरंज्या उचलत आहे तर नवी भाजप खुर्चीत बसल्याचा टोला यावेळी पाटील यांनी लगावला. शिवाय मतदारांना धमकावणे, पैसे वाटणे दहशत निर्माण करण्यापलीकडे महायुतीकडे सध्या काहीच नाही, असंही पाटील म्हणाले.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे १५ मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही.. एकूणच हे सगळंच संशयास्पद आणि निवडणुकीबाबत अविश्वास निर्माण करणारं आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देऊन हा गोंधळ तातडीने दूर करावा आणि मतदान हे मुक्त व निर्भय वातावरणासह मत दिलेल्या उमेदवारांनाच ते गेलं पाहिजे, याची काळजी घ्यावी, असं ट्विट शरद पवारांच्या ऱाष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक सघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीआज नागपूर महानगर पालिकेसाठी मतदान केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सहकुटुंब डोंबिवलीत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी प्रचार केला आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे 29 महापालिकेत महायुतीचा महापौर असेल.
वार्ड क्रमांक 192 चे उमेदवार यशवंत किल्लेदार हे सकाळी मतदान केंद्रावर मतदानासाठी आले असता त्यावेळी एक दुबार मतदार आढळला. या दुबार यादीत असलेल्या महिला मतदाराला थांबविण्यात आल्याची माहिती आहे. या दुबार यादीत असलेल्या महिला मतदाराला थांबविण्यात आले आणि आधारकार्ड पाहून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतल्यानंतर मतदान करून दिलं जाणार आहे. तर ही सगळी निवडणूक आयोगाची चूक असल्याचं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आहे.
नाशिकमध्ये मतदानाच्या सुरुवातीलाच EVM मध्ये बिघाड झाल्याने प्रभाग क्रमांक 24 मधील मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक 9 मध्ये अद्याप मतदानाला सुरुवात झालेली नाही.
पुण्यात आज 9 वर्षांनंतर महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली असून पुण्यात निवडणुकीच्या रिंगणात एकूण 1153 उमेदवार आहेत.
राज्यभरातील 29 महानगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.