Aaditya Thackeray Shiv Sena UBT Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update: 'चोरलेलं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंकडे राहू नये...': आदित्य ठाकरे

Marathi Breaking Live Headlines Updates : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीविरोधात तक्रारदारांनी उच्च न्यायालयात धाव, सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची आज सुनावणी, कपिल सिब्बल करणार युक्तीवाद, यासह राज्य आणि देशभरातली महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर

Roshan More

'चोरलेलं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंकडे राहू नये...': आदित्य ठाकरे 

आदित्य ठाकरेंनी चोरलेलं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंकडे राहू नये अशी मागणी केली आहे. त्यांनी ‘आपल्या सर्वांना माहिती आहे की, कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, दरोडेखोर असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू शकत नसल्याचं म्हटलं. तसेच जर कोणाला पक्ष सोडायचा असेल तर राजीनामा देऊन ते पक्ष सोडू शकतात, पण पक्षाची चोरी म्हणजे तुम्ही त्याचे मालक बनू शकत नाही, तुम्ही पक्षप्रमुख बनू शकत नाही, असं ठाकरेंनी सांगितलं.

केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळणार का..?ओम राजेनिंबाळकर हसत हसत म्हणाले...

उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ओम राजेनिंबाळकर यांनी आता त्यांची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळणार असल्याचीही चर्चा आहे.याबाबतचा प्रश्न ओम राजेनिंबाळकरांना विचारण्यात आला. यावर त्यांनी हसत हसत नंतर सांगतो असं म्हटलं.

ज्यांच्या पक्षाचा निकाल कोर्टाकडे आहे त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलू नये; यादव यांचा अंधारेंना टोला

मंगळवेढा : ज्यांच्या पक्षाचा निकाल कोर्टाच्या पटलावर आहे, त्या पक्षाच्या नेत्यांनी दुसऱ्याच्या पक्षाच्या बोर्डबद्दल बोलू नये, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना दिले.

भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्राची बैठक उद्या सोलापूर शहरात येथे होत आहे त्या अनुषंगाने सोलापूर येथे लावण्यात आलेल्या डिजिटल फलकावर गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो नाही त्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपातील गटबाजीवर मत व्यक्त करत या बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याला डिवसण्याचा प्रयत्न केला.

त्यावर युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष सुदर्शन यादव यांनी त्याला प्रत्युत्तर दिले ते म्हणाले की, स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे उघडून अशा पद्धतीने फोटो वरून तिर्‍हाईतानी आम्हाला शिकवायचे नाही. आमची पार्टी ही पारिवारिक पार्टी नसून कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्यामध्ये प्रोटोकॉल ठरलेला असतो कुणाचे फोटो वापरायचे कोणाचे नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपाचे बलस्थान वाढले आहे अशा परिस्थितीत पालकमंत्र्यावर बोलताना शिवसेनेचे काही नेते त्यांना उपरा म्हणून संबोधतात मात्र शिवसेना उबाटाच्या नेत्या सुषमा अंधारे या देखील सोलापूरच्या दृष्टिकोनातून उपऱ्याच आहेत उलट स्वतःच्या पक्षाची जी वाताहत जिल्हात सुरू आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे.

Tushar Gandhi : जंतरमंतरचे आंदोलन म्हणजे, माॅर्डन सत्याग्रह; तुषार गांधींकडून 'जेन झी'चे कौतुक!

Chhatrapati Sambhaji nagar : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे जेन झींच्या जंतरमंतरवरील आंदोलनाने प्रभावित झाले आहेत. हे आंदोलन म्हणजे 'माॅडर्न सत्याग्रह' असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

महात्मा गांधी मिशन आणि महाराष्ट्र गांधी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ८ व ९ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरात एमजीएम विद्यापीठात दुसरे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

Bjp News : भाजपाची भटके-विमुक्त प्रकोष्ठची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजप प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेश भटके विमुक्त प्रकोष्ठ प्रभारी राजेश पांडे आणि प्रकोष्ठ प्रदेश संयोजक, माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भटके विमुक्त जमाती प्रकोष्ठ प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली . प्रदेश सह-संयोजकपदी राजू साळूंके (रायगड), शिवाजी आव्हाड (ठाणे), पी. टी. चव्हाण (बीड) यांची तर अमोल बावणे (नाशिक), राजेश धोत्रे (पुणे), बाबुराव (तुळशिराम) केंद्रे (नांदेड) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकोष्ठ प्रदेश कार्यलय प्रमुखपदी राजेंद्र गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

supreme court : सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली

सुप्रीम कोर्टात गेल्या सात दिवसापासून शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. त्यातच बुधवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर प्रसार माध्यमाशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, 'आम्हाला चिन्ह देणार नसाल तर गोठवा, असे मोठे विधान त्यांनी केले.

शिवसेना प्रकरणात आयोगाचा निर्णय योग्य? देवदत्त कामत यांचा कोर्टात पहिला वार 

शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली आहे. काल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आज सिब्बल युक्तिवाद पुढे नेणार असून, त्यानंतर शिंदे गटाचे वकील आपली बाजू मांडणार आहेत.

राहुल गांधींची पुण्यात तोफ धडाडणार; २२ ऑगस्टच्या दौऱ्याला पोलिसांची परवानगी

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाला अखेर पोलिसांची परवानगी मिळाली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांचा पुण्यात कार्यक्रम होणार असून, पोलिसांनी काही अटी आणि शर्ती घातल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, कार्यक्रमात ते कोणता मुद्दा मांडणार याची उत्सुकता आहे.

नवले पूल की अपघातांचा सापळा? पुण्यात पुन्हा भीषण अपघात

पुण्यातील नवले पुलाजवळ आज पुन्हा भीषण अपघात झाला आहे. कात्रजकडून वले पुलाच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर ५ ते ६ वाहनांची धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे नवले पूल पुन्हा एकदा अपघातांचा सापळा ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रिक्षा परवान्यासाठी मराठी बंधनकारक करण्यास आठवलेंचा विरोध

रिक्षा परवान्यासाठी मराठी बंधनकारक करण्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. आपल्या भाषेचा सन्मान आणि प्रसार करणे आवश्यक आहेच. पण त्यासाठी रोजगाच्या अटीची शिक्षा नको. एखाद्या गरिबाला भाषा येत नाही, म्हणून त्याचा रोजगार हिसकावून घेणे, हे योग्य नसल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवर गुरूवारपासून कारवाई

मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांवर गुरूवारपासून कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. गुरूवारपासून संबंधित चालकांना एक महिन्याची नोटीस दिली जाईल. या कालावधी त्याने मराठी शिक्षणे आवश्यक आहे. एक महिन्यानंतरही मराठी बोलता न आल्यास तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Aaditya Thackeray : भाजप किती निर्दयी आहे - आदित्य ठाकरेंची टीका

आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, भाजप किती निर्दयी आहे, किती GenZ विरोधी आहे आणि कशी मुंबई लुटत आहे, याचे खुले प्रदर्शन BMC मध्ये सुरू आहे. लहान मुलांपासून अगदी देशासाठी खेळणाऱ्या फुटबॉलपटूंचे 'नेव्हिल डिसोझा फुटबॉल टर्फ', सत्तेचे बळ वापरून कसं चोरता येतं याचं देखील प्रदर्शन! नेव्हिल डिसोझा टर्फ घेऊन प्रदर्शन केंद्र करणार. बाजूला SRA येत आहे. तिथेच बांद्रा बे रिडेव्हलपमेंट होत आहे. तिथेच अदानीने MSRDC ची जागा घेतली आहे… बांद्रामध्ये किती ट्रॅफिक होईल, किती गळचेपी होईल... याचा विचार न करता जागा ढापायची असं भाजपने ठरवलं आहे.

भुसावळ तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई, १३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ तालुका पोलिसांनी प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल आणि ५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण १३ लाख ४५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साकेगाव शिवारातील ग्रामीण रुग्णालयाजवळील सर्व्हिस रोडवर सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

कृषी विद्यापीठाच्या हवामान खात्याकडून मराठवाड्यातील बळीराजाला महत्त्वाचा सल्ला

मराठवाड्यात आज आणि उद्या काही भागात पावसाची शक्यता असली, तरी त्यानंतर पावसाची मोठी उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमिवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने शेतकऱ्यांना विशेष कृषी सल्ला दिला आहे. पिकांना पाण्याचा ताण येऊ नये यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यासोबतच आवश्यकतेनुसार कीड-रोग नियंत्रणासाठी फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पिकाची काळजी घेण्याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ कैलास डाखोरे यांनी केले आहे.

पिंपळवंडीतील चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ रास्ता रोको

चिमुकलीवर अत्याचार करुन निघृन खुन केल्यानंतर जुन्नर हादरलंय असून या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर आज ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, तर या चिमुकलीला न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या रास्ता रोकोमुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, प्रशासनासमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.

'युती फक्त राज्यात', पुणे महापालिका सभागृह नेते गणेश बीडकरांचा राष्ट्रवादीला थेट इशारा

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल बालवडकर यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी मंजूर केलेला निधीचा ठराव रद्द करण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष झाला. सभागृह नेते गणेश बीडकर यांनी युती आता फक्त राज्यात असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादीला थेट इशारा दिला. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.

पुण्यातील राजकीय समीकरणे बदलली, राष्ट्रवादीने शहराची जबाबदारी विभागली, नव्या नेतृत्वावर विश्वास

पुणे महापालिका निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. अनेक नेत्यांचे पक्षांतर झाले असून, विविध पक्षांकडून संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे शहराची जबाबदारी दोन भागांत विभागून नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. आता विशाल तांबे आणि श्रीकांत पाटील हे पुण्यात पक्षाला किती बळ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वनमंत्री गणेश नाईकांचा आज पुन्हा शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार

ठाण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राजकीय रस्सीखेच सुरू असतानाच वनमंत्री गणेश नाईक यांचा गडकरी रंगायतन येथे पुन्हा जनता दरबार होणार आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईकांचा वारंवार होणारा जनता दरबार हा राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरत आहे.

बाळासाहेब थोरात झाले विद्यापीठाचे कुलपती

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेला आता विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली आहे.. बाळासाहेब थोरात या विद्यापीठाचे कुलपती झाले असून, विद्यापीठाचा शुभारंभ सोहळा थोरात यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ठाण्यात महायुतीत ठिणगी, भाजपचा विरोध तरी शिवसेकडून प्रस्ताव मंजूर

ठाणे शहरातील रखडलेल्या क्लस्टर पुनर्विकासाला गती देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वतंत्र ‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’ स्थापन करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला. मात्र, याच प्रस्तावावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्येच जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. भाजपचा तीव्र विरोध झुगारून सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केल्यामुळे ठाण्यातील सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

पुण्यात १५० हून अधिक घरमालकांवर थेट पोलिसांची एफआयआर!

भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदवून न देणाऱ्या घरमालक आणि पीजी चालकांविरोधात पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील विविध भागांत केलेल्या कारवाईत 150 हून अधिक घरमालक आणि पीजी चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आम्ही १०० आमदार पाडू - लक्ष्मण हाके

मनोज जरांगे २५ आमदार पाडण्याची धमकी देत आहेत. ते जर 25 आमदार पाडणार असतील तर आम्ही त्यांचे १०० आमदार पाडू, असे खुले आव्हान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिले.

जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या

जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. 25 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना 15.79 कोटींची मदत

यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे करतो. या अशा परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यातील गरजू रुग्णांसाठी आधारवड ठरत असून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 798 रुग्णांना 15 कोटी 79 लाख 66 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT