Sarkarnama Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : मुंबईतील धक्कादायक घटना,लोकलमधून प्रवाशाला किरकोळ वादातून वांद्रे खाडीजवळ ढकलून दिलं

Marathi Breaking Live Headlines Updates : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची आज सुनावणी, ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तीवाद संपल्यानंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेनेचे वकील बाजु मांडणार , यासह राज्य आणि देशभरातली महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर

सरकारनामा ब्यूरो

मुंबईतील धक्कादायक घटना,लोकलमधून प्रवाशाला किरकोळ वादातून वांद्रे खाडीजवळ ढकलून दिलं

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. लोकलला मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. मात्र, गुरुवारी चर्चगेट ते बोरीवली या लोकलमधून एका प्रवाशाला किरकोळ वादातून ढकलून देण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना वांद्रे खाडीजवळ घडली. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

...तसे झाले तर भविष्यात ठाकरेंची अडचण होऊ शकते : वकील असीम सरोदे यांचं मोठं विधान 

सुप्रीम कोर्टात शिवसेना हा पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाचे आहे, या प्रकरणी सुरू सुनावणीदरम्यानचा ठाकरेंचा युक्तिवाद आता संपला आहे. यानंतर 2 सप्टेंबरपासून शिंदेंच्या पक्षाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. मात्र,अशातच वकील असीम सरोदे यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, हे प्रकरण पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले जाऊ नये किंवा ते मोठ्या खंडपीठाकडे जाऊ नये. तसे झाले तर भविष्यात ठाकरेंची अडचण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

धनुष्यबाण चिन्ह गोठवा : ठाकरे गटाची युक्तिवाद संपवताना मागणी; दोन सप्टेंबरपासून शिंदे गटाचा युक्तिवाद

शिवसेनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या वतीने युक्तीवाद करताना देवदत्त कामत यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवणे आवश्यक ठरेल, अशी मागणी करण्यात आली. आज ठाकरेंचा युक्तीवाद संपला असून दोन सप्टेंबरपासून शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे, त्यामुळे शिवसेना वादावर सप्टेंबरमध्येच पडदा पडण्याची चिन्हे आहेत.

आदिती अन्‌ अनिकेत तटकरेंनी दिल्या; सुनील तटकरेंनी अजून पालकमंत्रिपदाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत : भरत गोगावले

रायगडचे पालकमंत्री झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. फक्त खासदार सुनील तटकरे यांच्याकडून शुभेच्छा यायच्या राहिल्या आहेत. बघू आज किंवा उद्या येतील, असे रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

सच्चिदानंद सिंहांची सुनेत्रा पवार यांना रिमायंडर नोटीस : अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा पारदर्शीपणे घ्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना रिमायंडर नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पारदर्शीपणे पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी नोटिशीद्वारे केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

आगामी काळात भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार : जयकुमार गोरे

ज्यांची भाजपसोबत काम करायची इच्छा होती, त्यांचे प्रवेश आम्ही आचारसंहितामुळे थांबविले होते, तेच प्रवेश आज करून घेतले आहेत. आगामी काळात भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार आहेत, हे तुम्हाला कळंबच्या माध्यमातून झलक दिसेल, असा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.

खडकवासल्यात काँग्रेसचे ‘मिशन २०२९’ ; हजार विद्यार्थिनींचे लक्ष्य

खडकवासला : महापालिका निवडणुकीच्या काळात तहान लागल्यावर विहीर खोदण्याची वेळ आली. त्यामुळे जे झाले ते झाले; आता मागील गोष्टी बाजूला ठेवून नव्या जोमाने पक्षबांधणीला सुरुवात केली पाहिजे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा ‘पंजा’ विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

मुंबईत धावत्या लोकलमधून प्रवाशाला ढकललं; गंभीर जखमी

मुंबईत उपनगरीय रेल्वेमधून एका प्रवाशाला दुसऱ्या प्रवाशानं चालत्या ट्रेनमधून बाहेर ढकलल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात संबंधित प्रवाशी गंभीर जखमी झाला आहे.

Shiv Sena case : शिंदे यांची याचिका फेटाळण्यायोग्य होती

एकनाथ शिंदे यांची याचिका फेटाळण्यायोग्य होती. त्यांनी मुख्य नेतेपदाचा दावा करताना योग्य कागदपत्रे जोडली नव्हती, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

 Supreme Court update : निवडणूक चिन्ह गोठवणं गरजेचं

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठविणे गरजेचे असल्याची मागणी देवदत्त कामत यांनी केली. या प्रकरणात सादिक अली केसचा दाखला देणंही चुकीचं होतं, असेही ते म्हणाले आहेत. अध्यक्षांनी याच केसचा आधार घेतला, असा युक्तिवाद कामत यांनी केला.

Shiv Sena Case : अध्यक्षांवरील विश्वास गमावला

चिन्हाचा निकाल केवळ विधिमंडळातील संख्याबळ पाहुन दिला. आम्ही विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास गमावला आहे. त्यांनी योग्यपध्दतीनं हे प्रकरण हाताळलं नाही, असा युक्तिवाद करत देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत विधान केले आहे.

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीला सुरूवात

उद्धव ठाकरेंच्या यांच्याकडून ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार अपात्र ठरत होते, कारण त्यांनी पक्षांतर केले होते. पक्षांतराचा फायदा मिळू नये, म्हणून त्यांना अपात्र करायला हवे होते, असा युक्तिवाद कामत यांनी केला.

मुंबईत आरटीओकडून रिक्षा-टॅक्सीचालकांची तपासणी सुरू

मुंबईत आरटीओकडून रिक्षा आणि टॅक्सीचालकांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मराठी बोलता न येणाऱ्या चालकांना नोटीस दिली जात आहे. महिनाभरात त्यांना मराठी बोलता न आल्यास काही कालावधीसाठी परवाना निलंबित केला जाणार आहे.

Devendra Fadnavis : काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता स्पष्ट

काँग्रेसच्या कार्यकारिणीने वंदे मातरम् ची दोनच कडवी गाण्याचा ठराव केला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता आणि संविधानविरोधी भूमिका स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.

विद्यार्थिनींना दरमहा 2 हजारांचा पॉकेटमनी? चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती

राज्यातील विद्यार्थिनींसाठी सरकारकडून महत्त्वाचा विचार सुरू आहे. ‘कमवा आणि शिका’च्या धर्तीवर विद्यार्थिनींना दरमहा 2 हजार रुपये पॉकेटमनी देण्याचा प्रस्ताव आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. CSRच्या माध्यमातून योजना राबवण्याचा प्रयत्न असून, निर्णय झाल्यास सुमारे 12 लाख विद्यार्थिनींना लाभ मिळू शकतो.

TET परीक्षेबाबत अंतिम निर्णय रखडला; लाखो उमेदवारांची चिंता वाढली

पेपरफुटीमुळे रद्द झालेली TET परीक्षा ऑनलाइन घेण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे. यंदा परीक्षा न झाल्यास पुढील वर्षी तीन वेळा परीक्षा घेण्याचा पर्याय असल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली आहे.

17 सप्टेंबरनंतर कळणार मोदींच काय होणार?' संजय राऊतांचा मोठा दावा 

ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भवितव्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस असल्याचा दावा राऊतांनी केला. तसेच 17 सप्टेंबरनंतर मोदींबाबत नेमकं काय होणार, हे देशाला कळेल, असंही राऊत म्हणाले.

'वंदे मातरमची काँग्रेसकडून अवहेलना!' शाहांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे. काँग्रेस पक्षाने वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. देशवासीयांनी या निर्णयाविरोधात एकत्र येऊन विरोध दर्शवावा असे आवाहन त्यांनी केले असून भाजप याला जोरदार विरोध करेल.

लातूर येथील शाळेचे अभिजीत दिपके यांच्याकडून सोशल ऑडिट

लातूर येथील औसा तालुक्यातल्या उजनी येथील जिल्हा परिषद शाळेची अभिजीत दिपके यांनी स्कूल ठीक करो या अभियानांतर्गत पाहणी केली. शाळेतील विद्यार्थ्यांची त्यावेळी संवाद साधत आहेत. शाळेत असलेल्या अपुऱ्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता याविषयी ते सोशल ऑडिट करत आहेत.

Nashik News: नाशिकच्या हरिहरगड पर्यटकांसाठी बंद, प्रशासनाचा निर्णय

नाशिकच्या हरिहरगड पर्यटकांसाठी अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुसळधार पाऊस, दाट धुकं आणि निसरड्या पाय-यामुळे प्रशासनाचा हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले

PUNE News: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयास गंडा

मागासवर्गीय आयोगाचा प्रतिनिधी असल्याचे भासवत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची फसवणूक झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे. सरकारी सुविधा घेऊन २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुजोर रिक्षा,टॅक्सी चालकांना धडा शिकवू - अमित ठाकरे

मराठी भाषेच्या नियमाला विरोध करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मराठी शिकण्याच्या नियमाला विरोध करणाऱ्या चालकांना मनसेच्या स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे.

ठाकरेंना धक्का, १० नगरसेवक भाजपच्या वाटेवर

धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. धाराशिव-कळंब महापालिकेतील तब्बल १० नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

ग्रामसेवकांवर आता 'जीपीएस'चा वॉच; बायोमेट्रिक हजेरीबाबत ग्रामविकास विभागाचे कठोर आदेश

ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहण्याच्या तक्रारी आता कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांची GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून हजेरी घेण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मंगळवारी लेखी आदेश देण्यात आले आहेत.

धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी पार पडेल. आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या युक्तिवाद संपेल, त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी युक्तिवाद करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT