Former Pune Deputy Mayor Nilesh Magar campaigning for NCP candidates in Ward No. 17 of Pune Municipal Corporation election. Sarkarnama
महाराष्ट्र

Mahapalika Election Campaign: जाहीर प्रचार थांबला, तरीही मतदानापर्यंत 'प्रचार' सुरुच राहणार! आयुक्तांच्या उत्तरानं वाढला गोंधळ; राज्यात खळबळ

Mahapalika Election: पण हा संभ्रमात टाकणारा निर्णय असून आजपर्यंत अशाच प्रकारे प्रचार होत आला असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

Amit Ujagare

Mahapalika Election Campaign: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी येत्या १५ तारखेला मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी ४८ तास आगोदर जाहीर प्रचार थांबतो असा नियम आहे. त्यानुसार आज १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रचार थांबणार आहे. पण यानंतरही मतदानाच्या दिवसापर्यंत संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे. आजपर्यंत अशाच प्रकारे प्रचार होत आला असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळं मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम आज निवडणूक आयोगानं जाहीर केला. यावेळी आयुक्तांनी सध्याच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराबाबत हे स्पष्टीकरण दिलं आहे.

नेमका वाद काय?

देशात लोकसभेपासून विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ती निकाल जाहीर होईपर्यंत लागू असते. पण निवडणुकाचा प्रचार हा मतदानाच्या आगोदर ४८ तासांत थांबवावा लागतो. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराला कुठल्याही प्रकारे प्रचार करता येत नाही, असाच आजवर नियम पाळला जात होता.

पण हा नियम केवळ जाहीर प्रचाराबाबतच लागू असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. म्हणजेच उमेदवारांनी पत्रक, स्पीकर्स वापरुन करण्याचा जाहीर प्रचार थांबवण्याबाबतच हा नियम आहे. तसंच मतदानाच्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत फक्त उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येईल, यावेळी पाचपेक्षा जास्त लोकांनी त्यांच्यासोबत असता कामा नये, असं निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत सांगितलं आहे. नेमक्या याच प्रकारामुळं आता गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

व्हायरल इतिवृत्तात काय म्हटलंय?

या बैठकीचं एक इतिवृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामध्ये ८ व्या क्रमांकाच्या मुद्द्यात निवडणूक आयोगानं म्हटलं की, "१३.०१.२०२६ रोजी निवडणूक आयोगानं निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहिता सायंकाळी ५.३० वा. संपणार आहे. राजकीय पक्ष व त्यांचे प्रतिनिधी आणि उमेदवार यांना त्यांचा प्रचार १३.०१.२०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करता येईल. परंतू १३.०१.२०२६ ते १५.०१.२०२६ पर्यंत राजकीय पक्ष/अपक्ष उमेदवार यांना त्यांचा प्रचार घरोघरी जावून करता येईल. मात्र, सदर राजकीय पक्षांना व त्यांच्या उमेदवार/प्रतिनिधींना पत्रके वाटून प्रचार करता येणार नाही, अशा प्रकारच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिल्या आहेत"

निवडणूक आयुक्त नेमकं काय म्हणाले?

निवडणूक आयोगाच्या बैठकीच्या व्हायरल होत असलेल्या इतिवृत्ताबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं की, आमचा नियम क्लिअर आहे, सन २०१२ च्या आदेशानुसार नियम हाच आहे की, मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचाराला प्रतिबंध असतो. पण त्यानंतर उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करु शकतात. यावेळी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्रितरित्या प्रचारासाठी घरोघरी जाता येणार नाही, हा आचारसंहितेचा भंग असेल. कारण यावेळी कलम ३७ लागू असेल. पण वैयक्तिक जर कोणी घरोघरी गेला तर त्याला तसा प्रतिबंध नाही. लोकसभा, विधानसभेला पण प्रचाराचे हेच नियम लागू आहेत. त्यात कुठलाही बदल झालेला नाही. या नियमाबाबत आम्ही वेगळं प्रसिद्धी पत्रक काढणार आहोत, असंही आयुक्तांनी यावेळी सांगितलं.

त्याचबरोबर आजचा जाहीर प्रचार संपताना आता अनेक ठिकाणी उमेदवार पैसे वाटप करत असल्याचंही निर्दशनास आलं आहे. मग मतदानाच्या दिवसापर्यंत घरोघरी जाऊन जर उमेदवारांना प्रचार करता येणार असेल तर त्या काळात ते अशा प्रकारे पैसे वाटणार असतील तर त्यावर आयोगाची कशी नजर असेल. कारण आयोगाकडं निवडणूक कामासाठी माणसांची कमतरता असताना याकडं कसं काय लक्ष दिलं जाईल? यावर उत्तर देताना राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे म्हणाले, जर कोणी अशा पद्धतीनं पैशांचं वाटप करत असेल तर तो गुन्हा आहे, आम्ही त्याच्यावर कारवाई करु.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT