Ajit Pawar Raj thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Navnirman Sena : मनसेने अजित पवारांची 'टगेगिरी' काढली!

सरकारनामा ब्यूरो

MNS ON AJIT PAWAR : वरिष्ठ अभ्यासक्रमात संशोधनाचा विषय म्हणून सारथी व महाज्योती प्रकल्पांतर्गत विद्यार्थी पीएच. डी. साठी अर्ज करतात. त्यावर विचारलेल्या प्रश्नावरील चर्चेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्नकर्त्यांना ‘पीएच. डी. करून काय करणार आहे?. पीएच. डी. करून काय दिवा लावणार आहेत’ अशी विचारणा विधान परिषदेत केली.त्यावरून मनसेने थेट अजित पवारांची 'टगेगिरी' काढली.

"तुम्ही स्वतःला टगे म्हणवून घेता.. कारण तुमची टगेगिरी खपवून घेणारी व्यवस्था तुमच्या पायाशी आली. पण तुमच्यासारखं नशीब प्रत्येकाचं कसं असणार ? म्हणून शिकून, पीएचडी करून, चांगली नोकरी करून, सचोटीने आयुष्य जगण्याची इच्छा बाळगत महाराष्ट्रातला तरुण-तरुणी राबत असतात... ते ज्ञानाचा दिवा लावत आहेत, त्यामुळे त्यांना तरी तुमच्या टगेगिरीचा प्रसाद देऊ नका," असे ट्विट करून मनसेने अजित पवारांवर निशाना साधला.

"महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, ह्यांच्यासारख्या अनेकांमुळे महाराष्ट्रात शिक्षणाची कवाडं बहुजनांना खुली झाली. अगदी लोकमान्य टिळकांपासून ते गोपाळकृष्ण गोखलेंपर्यंत प्रत्येकांनी शैक्षणिक संस्था काढण्यावर भर दिला कारण शिक्षणच समाजाच पुनरुत्थान करू शकतं ह्याची जाणीव होती. राहिला प्रश्न पीएचडीचा तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः डॉक्टरेट होते आणि त्यांना सचोटीने, संघर्षाने मिळविलेला हा बहुमान हा महाराष्ट्रातील लाखो तरुणांना प्रेरित करतो की एखाद्या विषयात दीर्घ अभ्यास करून पारंगत होऊन, पीएचडी मिळवावी..."असा महापुरुषांचा उल्लेख करत मनसेने अजित पवारांना सुनावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आणि सारथी, महाज्योती, बार्टी ह्या संस्थांच्या शिष्यवृत्तीचा विषय होता म्हणजे बहुजनांची मुलं उच्चशिक्षित होणार ना... मग महाराष्ट्राचा उप-उपमुख्यमंत्री इतकं बेजबाबदार विधान आणि तेही सभागृहात करूच कसा शकतो ? "मी स्पष्टवक्ता, मी कठोर, मी टग्या..." असं स्वतःला म्हणवून घेतलं म्हणजे महाराष्ट्राने तुमची वाट्टेल ती विधान सहन करायची का?" असा सवाल देखील मनसेने उपस्थित केला आहे.

(Edited by Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT