राज्याचे उद्योगमंत्री व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख नेते उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंच्या यांनी राम मंदिर घोटाळा प्रकरणावरुन पुकारलेल्या आंदोलनाच्या घोषणेवरुन हल्लाबोल केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी काँग्रेससोबत आघाडी केली, त्यावेळी त्यांचे हिंदुत्व कुठे गेले होते? तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाकरे यांनी भूमिका का घेतली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला. त्यामुळे सध्याची भूमिका ही केवळ राजकीय असल्याचा आरोप त्यांनी केला.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी मॅनहोल दुर्घटनेनंतर हसल्याच्या वादात अडकलेल्या साटम यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.मॅनहोल प्रकरणामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.
चंद्रपूर महापालिकेत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटात जोरदार बाचाबाची झाली. आजच्या सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार होती. मात्र मुनगंटीवार गटातील नावे नसल्याचे पाहून महापौरांनी सभा रद्द केल्याचा आरोप जोरगेवार गटाने केला आहे. महापौरांनी कोणत्या अधिकारात सभा रद्द केली, असा जाब जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी आयुक्तांना घेराव घालून विचारला.
महाबळेश्वर-पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट पावसामुळे चार दिवस बंद राहणार आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने सुरक्षेसाठी हा घाट ६ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण पावसाळ्यात घाटातून रात्रीच्या वेळी वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबई महापौरांच्या कार्यालयात येऊन रेखी करून किशोरी पेडणेकर यांनी फार मोठी चूक केली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याला न शोभणारे वर्तन केले आहे. आतापर्यंत कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याने पेडणेकर यांच्यासारखं वर्तन केलेले नाही. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही सवय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्याप्रमाणे सर्वांनी सुरू केली आहे.
अशोक खरात प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयातून आशा मिरगे, रुपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया यांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यांना येत्या १० जुलैला दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आल्या आहेत, असे चाकणकर यांनी सांगितले. त्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्या कायदेशीर भीतीला आम्ही कोणीही भीक घालत नाही. त्यांच्या पप्पांचा कायदा नाही, असे उत्तर दिले आहे.
पुणे : स्मार्ट सिटीचा आव आणणाऱ्या महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची संततधार पावसाने पुरती पोलखोल केली. शहरातील तुंबलेल्या सांडपाणी वाहिन्या आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला समोरे जावे लागले. महापालिका आणि वाहतूक प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शुक्रवारी ऐन गर्दीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
शिवाजीनगर : पुणे शहरातील वाढत्या नागरी समस्यांकडे, विशेषतः रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण आणि अनधिकृतपणे सुरू असलेल्या प्री-स्कूल (नर्सरी) शाळांवर सभागृहाचे लक्ष वेधले. नियम २९३ च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी या गंभीर बाबींवर राज्य सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी केली.
पुणे शहराच्या विकासाला अतिक्रमणामुळे गालबोट लागत असून, पुणेकरांमधून यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असताना पवित्र इंद्रायणी नदीचे पात्र केमिकलयुक्त पाण्यामुळे फेसाळली आहे. वारीत लाखो वारकरी इंद्रायणीत स्नान करून माऊलींच्या दर्शनाला जात असल्याने या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त होत आहे. केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे नदीचे पाणी दूषित झाल्याचा आरोप होत असून, वारीच्या पार्श्वभूमीवर ही बाब गंभीर मानली जात आहे. दरवर्षी लाखो वारकरी इंद्रायणीत स्नान करून या पाण्याचा तीर्थ म्हणून स्वीकार करतात. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक आणि वारकरी करत आहेत.
जळगाव सराफ सोने-चाडीया दरात सातत्याने चढउतार पाहण्यास सक्षम आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी खाली आलेल्या दरात पुन्हाच्या प्रगतीचे आहे. सोन्याच्या दरात 3 हजार रूपये, तर चांदीमध्ये तब्बल 5 हजार रूपयांची वाढ झाली आहे. यानंतर जुलै महिन्याच्या दोन दिवसात म्हणजे 1 जुलैला सोने दीड हजार, तर चांदी दोन हजार रुपयांनी स्वस्त होती.
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गांवरील दक्खन ते कळकदारा इथं महामार्गांवर दरड कोसळण्याचे प्रकार सुरू असून आज सकाळी दरड कोसळली. सद्य स्थितीत दक्खन ते कळकदारा हा एकेरी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. मात्र ही भली मोठी दरड सध्या वाहतूक सुरू असलेल्या महामार्गाच्या अत्यंत जवळ आली आहे. चार पदरीच्या मधोमध लोखंडी कंपाउंड असल्यामुळे दरड वाहतुकीच्या मार्गांवर आली नाही. मात्र काही दगडीचे तुकडे आले असून वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो. पाऊसाचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहन धारकांनी वाहने सावधतेने चालवावीत असे आवाहन करण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील चिंचपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने, आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना भर पावसाळ्यातही झाडाखालीच शिक्षण घ्यावे लागत आहे. उन्हाळ्यानंतर आता पावसाळ्याचे नवे आव्हान विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले असून, मुसळधार पाऊस, वारा आणि चिखलामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा व शैक्षणिक नुकसानीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या या शाळेत परिसरातील 100 टक्के आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज दुपारच्या सत्रातील सर्व व्यवस्थापनाचा शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई आयुक्तांनी तसे आदेश काढले आहेत. तसेच सकाळचे सत्र व सर्वसाधारण सत्र सुरू असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पालकांना तात्काळ सूचना देऊन सर्व विद्यार्थ्यांना केवळ पालक अथवा अधिकृत पालक प्रतिनिधी यांच्या ताब्यात सुरक्षितपणे देऊनच शाळा सोडण्यात यावी.
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुरुवारी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत भगवतीनगर तळावरून अमरनाथ यात्रेच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. ही 57 दिवसांची यात्रा तीन जुलैपासून पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांनी सुरू होणार असून 28 ऑगस्टला तिची सांगता होईल. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात पाच हजारांहून अधिक भाविकांचा ताफा रवाना झाला. यात्रेकरूंनी प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या व्यवस्थेचे कौतुक केले.
तिरुअनंतपुरम इथल्या शबरीमला मंदिरातील सोने हरविल्याप्रकरणी 2025 मध्ये मंदिरातील धातूच्या कलाकृतींचे पुनर्प्लेटिंग करण्यासाठी मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी याच्याशी संगनमत केल्याचा आरोप त्रावणकोर देवस्वम मंडळाचे माजी अध्यक्ष पी. एस. प्रशांत यांनी फेटाळला. 2019 मधील पुनर्प्लेटिंगची माहिती 2025 मध्ये न्यायालयीन कागदपत्रांमधूनच समजल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी ‘एसआयटी’ तपास सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. काल रात्रीपासून रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. केंद्रीय जल आयोगाकडून प्रमुख नद्यांची पाणी पातळी, प्रवाह यांची मापणी केली जात आहे. काउंटर आणि कर मशीनच्या सहाय्याने सध्या नद्यांची पाणी पातळी आणि पाण्याचा प्रवाह मोजला जात आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून पश्चिम उपनगरात रिप रिप पाऊस सुरूच आहे. आता जोर वाढला आहे. मात्र मागील 20 मिनिटांपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. पहिल्या पावसा पासून आजही हि परिस्थिती कायम आहे. रस्त्यावर साचलेल्या या पाण्यामधुन मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. महामार्गावर साचत असलेल्या या पाण्याकडे आणि येथे निर्माण होणाऱ्या परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.