Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Update: त्र्यंबकेश्वरमध्ये देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक फसवणूक, विश्वस्ताला अटक

Maharashtra Breaking News Today : आज 14 एप्रिल रोजी देशासह राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची135 वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी होत आहे. यासह महाराष्ट्रातील सर्व राजकीय व प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

त्र्यंबकेश्वरमध्ये देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक फसवणूक, विश्वस्ताला अटक

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर संस्थानमध्ये देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकऱणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात 'व्हीआयपी' दर्शनाच्या नावाखाली भाविकांना गंडा घातल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. रांगेतून दर्शनाला 4-5 तास लागतील, आम्ही 10 मिनिटांत दर्शन घडवून देतो, असं सांगत संशयितांनी या भाविकांकडून 3 हजार रुपये उकळल्याचं समोर आलं आहे.

धक्कादायक! पुण्यातील येवलेवाडी येथे 33 आंब्याच्या पेट्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरातील येवलेवाडी येथे धक्कादायक चोरी उघडकीस आली आहे. एका आंब्याच्या दुकानातून तब्बल 33 पेटी आंब्याच्या पेट्या चोरीला गेल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना 11 एप्रिल रोजी रात्री 2 ते सकाळी 6 च्या दरम्यान घडली. 1 लाख 8 हजार रुपये किमतीच्या तब्बल 33 आंब्यांच्या पेट्यांवर डल्ला मारला.

'अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो...'; काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा मोठा दावा 

नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात लैंगिक अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणानं राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी खरातबाबत मोठा दावा केला आहे. प्रणिती शिंदे यांनी अशोक खरातसोबत अनेक मोठे नावे जोडली गेली असून भविष्यात त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो," असं विधान केलं आहे.

लाखांदूरच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण...

मागील वर्षभरापासून 22 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली भंडाऱ्याच्या लाखांदूर येथील बहुप्रतिक्षित मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहराज्यमंत्री सत्ता भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी आमदार नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे, आमदार परिणय फुके यांच्यासह भंडारा जिल्हाधिकारी, भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सर्व विभागाचे अधिकारी प्रामुख्यानं उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा छगन भुजबळांना डिवचले...

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनोज जरांगे पाटील यांनी माजलगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून एका हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी जमलेल्या नागरिकांना संबोधित करताना दलित, मुस्लिम, मराठा एकत्र करू व सर्वांना एकत्र घेऊन आपण पुढे जाऊ. तीन लाख मतांनी निवडून येणारा देखील पडला आहे. ही मराठ्यांची ताकद आहे. तर दुसरीकडे ते येवल्याचे कुठे आहेत? आता काही बोलत नाहीत, उलटा चष्मा डोक्यावर लावतात आणि कुठे जातयं काहीच कळत नाही, असे म्हणून मनोज पाटील यांनी छगन भुजबळ यांना डिवचले आहे.

अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणी मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

जिल्ह्यातील गौण खनिज व्यवसायाशी संबंधित गंभीर प्रकरणात अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाण आणि क्रशर व्यवसायिकांकडून खाणी सुरू ठेवण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला असून, यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून समोर आली आहे. दरम्यान, गायकवाड यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ते बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

जालना महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांचे विकासकामांना गती देण्याचे पंकजा मुंडेंना साकडे!

जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांसह पंकजा मुंडे यांची भेट व बैठक झाली. या बैठकीत शहरातील विविध नव्याने प्रस्तावित विकास कामांवर सखोल चर्चा करण्यात आली. जालना शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व्यवस्था, स्वच्छता, तसेच नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात विस्तृत आढावा घेण्यात आला.

'प्री-वेडिंग फोटोशूट केल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय, दोषींवर कडक कारवाई होणार' : आदिती तटकरे

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी, तमाम शिवप्रेमींचे तीर्थस्थान असलेल्या किल्ले रायगड येथे प्री-वेडिंग फोटोशूट केल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या घटनेबद्दल मी स्वतः रायगडचे जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे व पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांना दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशा सूचना दिल्या आहे. तसेच, पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी डॉ. अभिजित आंबेकर यांच्यासोबतही संवाद साधून किल्ले रायगडाचे पावित्र्य जपण्यासाठी तातडीने मार्गदर्शक सूचनांची रचना करावी अशा सूचना दिल्या. याबाबत रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबतही चर्चा केली. किल्ले रायगड येथे कोणत्याही प्रकारचे प्री वेडिंग शूट, फोटो शूट, वैयक्तिक कार्यक्रम करू नयेत असे सूचना फलक दर्शनी भागांमध्ये लावण्याबाबत जिल्हा स्तरावर व शासन स्तरावर योग्य कार्यवाही करण्याबाबत त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.

किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट, भरत गोगावलेंचा संताप

किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसरात एका जोडप्याने प्री-वेडिंग शूट केल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या ऐतिहासिक स्थळाच्या पावित्र्याचा भंग झाल्याची भावना व्यक्त होतेय. दरम्यान, गडकिल्ल्यांवर अशा प्रकारच्या चित्रिकरणाला अजिबात स्थान नाही अशी आक्रमक भूमिका मंत्री भरत गोगावले यांनी घेतलीय.

Ahilyanagar Update : निळवंडेच्या उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्यातून २५ एप्रिलपासून पाणी सुटणार

अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील उच्चस्तरीय आणि उजव्या कालव्यातून १५ एप्रिलपासून पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. तसेच डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Strait of Hormuz : होर्मुजच्या सामुद्रधुनीत चीन अन् इराणच्या जहाजांनी यशस्वीपणे प्रवास, भारताची 15 जहाजे अडकून पडली

मध्य-पूर्व आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेली सर्वात मोठी खेळी सपशेल अपयशी ठरली आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीत अमेरिकेने केलेली नाकेबंदी तोडून चीन आणि इराणच्या जहाजांनी यशस्वीपणे प्रवास केला आहे. यामुळे ट्रम्प यांच्या लष्करी शक्तीवर आणि निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, दुसरीकडे या जागतिक वादात भारताची 15 जहाजे अडकून पडल्याने भारताची चिंता वाढली आहे.

Mumbai Crime : 30 कोटींचं ड्रग्स जप्त, गुजरातमधील फरार कुख्यात ड्रग्स तस्कराला मुंबईत अटक

केवळ 13 हजार रुपये भाड्याच्या छोट्या खोलीतून तब्बल 30 कोटी रुपयांचा ड्रग्स व्यवसाय चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. अंधेरीतील सहार रोड परिसरात एमडी (सिंथेटिक ड्रग्स) तयार करणारी फॅक्टरी उभारून मोठ्या प्रमाणावर ड्रग्स उत्पादन आणि पुरवठा केला जात होता. या प्रकरणात पोलिसांनी कुख्यात ड्रग तस्कर मोहम्मद आरिफ मोहम्मद इलियास शेख (44) याला अटक केली आहे. तो गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला असून गेल्या काही काळापासून मुंबईत सक्रिय होता.

West Bengal : भाजप अन् तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रोड शोनंतर पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बांकुरा मोड परिसरात ही घटना घडली असून, दोन्ही पक्षांच्या समर्थकांमधील वादाचं रूपांतर अचानक हिंसक संघर्षात झालं. या चकमकीत दोन जण जखमी झाले आहेत.

Beed Update : आरपीआय युवक प्रदेशाध्यक्षाच्या ढोलवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी धरला ठेका

बीडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह आहे. आरपीआयचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी बडवलेल्या ढोलवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी ठेका धरला. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती लावली होती. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या या डान्सची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Congress Vs BJP : उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांकडून होणारा ड्रग्जचा धंदा भाजपच्या आशीर्वादानं, काँग्रेसचं टीका करणारं ट्विट

मुंबईत मंत्रालयापासून तासभर अंतरावर सहजपणे ड्रग्ज उपलब्ध होतात तर राज्याच्या इतर शहरांमध्ये काय स्थिती असेल? देशाच्या आर्थिक राजधानीत बेकायदेशीर तस्करीमार्गे येणारे अंमली पदार्थ रोखण्यात मोदी सरकार, तर राज्यात या पदार्थांची विक्री रोखण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अदानीच्या मालकीच्या गुजराती बंदरातून व उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांकडून होणारा ड्रग्जचा धंदा भाजपच्या आशीर्वादाने होत आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? हे विचारण्याची वेळ राज्यातील कोट्यवधी नागरिकांवर आली आहे, असे टीका करणारे ट्विट महाराष्ट्र काँग्रेसने केलं आहे.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणावरील डिजिटल भूकंपमापक यंत्र राज्य सरकारकडून रद्द

जायकवाडी धरणावर बसवण्यात येणारे डिजिटल भूकंपमापक यंत्र राज्य सरकारने रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरातील भूकंपांच्या नोंदी तत्क्षणी नोंदविणारे अद्ययावत भूकंपमापक यंत्र कोयना प्रकल्पावर कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे. जुने भूकंपमापक यंत्र 10 वर्षांपासून निकामी झाले असल्याने पैठणच्या जलसंपदा प्रशासनाने यासाठी उपलब्ध निधीतून 46 लाख रुपयांचा धनादेशही नाशिक येथील ‘मेरी’ या संशोधन संस्थेकडे सुपूर्द केला होता.

Eknath Shinde Shivsena : जनतेची कामे न करणार्‍या मंत्र्यांना घरी पाठवा; आमदार संतोष बांगर

सत्ता आल्यानंतर आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही जणांना मंत्री केले. मात्र काही मंत्र्यांच्या डोक्यात वारं गेलं आहे. आमदारांचे फोन उचलले जात नाही, काम करणं तर बाजुलाच उंटावरून शेळ्या हाकणार्‍या मंत्र्यांना आता घरची वाट दाखवा, हा पक्ष म्हणजे त्यांच्या बापाची जहागीर नाही, अशी खदखद कळमनूरीचे आमदार संतोष बांगर यांनी व्यक्त केली आहे.

Marathi Language : मराठी बोलून, लिहून, वाचून दाखवा अन्यथा रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द...

आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

Arvind Kejriwal Vs Justice Swarana : न्यायमूर्ती RSSच्या कार्यक्रमाला हजेरी! राजकीय खटल्यात निष्पक्षपाती न्याय कसा मिळणार?  केजरीवालांचा व्हिडिओ तुफान व्हायरल

दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी (13 एप्रिल) दिल्ली उच्च न्यायालयात हजर झाले. सुनावणीदरम्यान त्यांनी न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा यांनी स्वतःला या प्रकरणातून दूर करावे, अशी मागणी केली. तसेच, यावेळी केजरीवालांनी महिला न्यायाधीशांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात गेल्याचा आरोप केला.

पटना भाजप कार्यालयात विधिमंडळ गटाची महत्त्वाची बैठक सुरू

पटना येथील भाजप कार्यालयात विधिमंडळ गटाची बैठक केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा उपस्थित झाले असून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या बैठकीत पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

अखेर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला, बिहारच्या राजकारणात खळबळ

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल सय्यद अता हसनैन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय चौधरी होते. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.

निवडणुकीआधी बंगालमध्ये ईडीची कारवाई, आय-पॅक संचालक अटकेत

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. आय-पॅकचे सह-संस्थापक व संचालक विनेश चंदेल यांना दिल्लीतून अटक करण्यात आली. या घडामोडीमुळे राजकीय वातावरण तापले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक 

व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली त्र्यंबकेश्‍वरमधे भाविकांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक केली आहे.

Ashok Kharat Case : अशोक खरातवरील फास आवळला खाती गोठवली, गाडी जप्त

ईडीनं अशोक खरातच्या नाशिक, शिर्डी आणि पुणे मिळून 11 ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत खरातची आलिशान मर्सिडीज बेंझ गाडी जप्त केलीय. तसंच सीएच्या घरातून 42 लाखांची रोकड जप्त केलीय. खरातची अडीच कोटींची बँक खाती गोठवण्यात आलीयत. सुमारे 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रं ईडीच्या हाती लागलीयत

जातीभेद, धर्मभेद बाबासाहेबांनीच दूर केले - CM फडणवीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना फडणवीस यांनी जातीभेद आणि धर्मभेद बाबासाहेबांनीच दूर केले असं वक्तव्य केलं.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर दाखल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.

चाकणकर भगिनींना शिर्डी मध्ये हे प्रिवीलेज का मिळाले? अंधारेंचा सवाल

सुषमा अंधारेंनी उपस्थित केलेले सवाल पुढीलप्रमाणे -

आम्ही एसआयटी ला भेटायला गेलो होतो एस आय टी या मुख्य इमारती पासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्या लगतपर्यंतचे सगळे गेट लॉक केले होते. पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पस मध्ये शिरकाव करू दिला नव्हता.

मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डी मध्ये हे प्रिवीलेज का मिळाले ?

चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीय...

१. जर दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं फडणवीसांच म्हणणं आहे तर अजून पर्यंत दमानिया ला अटक का केली नाही?

२. दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी ?

३. पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते ?

४. स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियाने सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकर मध्ये 236 कॉल 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा enjoy period संपत का नाही?

५. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे ?

६. कोण कुणाला वेड्यात काढत आहे? चाकणकर एस आय टी ला ? दमानिया महाराष्ट्राला ? SIT पीडित महिलांना ?

_ कळसुत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे... !

मुंबईत लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुंबईतील एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. शनिवारी झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगावजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झालेत.

देशासह राज्यात आंबेडकर जयंतीचा उत्साह

आज 14 एप्रिल रोजी देशासह राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची135 वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी होत आहे. राज्यभरात अभिवादन सभा, मिरवणुका, रक्तदान शिबिरे अशा सामाजिक उपक्रमांनी भीम जयंती साजर केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT