कारभारी (नेहमीच्या सरकारी हास्यवदनाने) : हॅलो, अहो ठाणेकर कसे आहात? कधी आलात? भेटायचं का?
उपकारभारी (गंभीरपणे) : लवकर आलोय उशिरा जाणार आहे. भेटायला नको. तुम्ही कधी आलात?
कारभारी : उशिरा आलोय अन् लवकर जाणार आहे. असो. कसे आहात?
उपकारभारी (दाढी खाजवत नाराज वदनाने) : तुम्ही फोन करेपर्यंत बरा होतो.
कारभारी (पुन्हा सरकारी हास्य) : फार बुवा विनोदी तुम्ही. का रे दुरावा, कारे अबोला... चला त्यानिमित्ताने विनोद तरी करायला लागलात. नाय तर गेले काही दिवस मला पाह्यलं की तुम्ही दाढीतच गंभीर होऊन जायचा राव. ‘लास्ट टाइम आमचे साहेब दिल्लीतच मोटाभाईंकडे पाहून हसले होते, तेही कसनुसं हसले होते’, असं तुमचेच कार्यकर्ते गंभीरपणे सांगतात.
उपकारभारी (न ओसरलेल्या नाराजीनेच) : मला तर सध्या हसावं की रडावं हेच समजेनासं झालंय. कोणी विनोद केला तरी रात्री घरी जाऊन बंद खोलीत हसतो.
कारभारी : अहो एवढं काय झालंय राव? राजकारणात छोट्या-मोठ्या गोष्टी काय मनाला लावून घ्यायच्या. मागच्या वेळी मोठ्या आटापिट्यानं ४० आमदारांना व्हाया सुरत, गुवाहाटी, गोव्यातून मुंबईला नेत आपलं सरकार आणलं तेव्हा तुम्हालाच दिलं ना कारभारीपद मी. तेव्हा मी असा फुगून बसलो का?
उपकारभारी : त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करताय म्हणे तुम्ही? आमचे ३५ शिलेदार फोडून ‘कमळपंथा’त सामील करणार आहात म्हणे तुम्ही.
कारभारी : कोणी सांगितलंय हे तुम्हाला?
उपकारभारी : अहो, त्या संपादक असलेल्या दिव्यदृष्टी लाभलेल्या ‘संजया’नं आपला आजार बाजूला ठेवून अवघ्या जगाला ही ‘ब्रेकिंग न्यूज’ दिली.
कारभारी (खो खो हसत) : अहो, कोण तो बोरुबहाद्दर दिव्यदृष्टी लाभलेला पराभूत ‘सामना’वीर...त्याच्या बोलण्याला काय गांभीर्यानं घेताय. गेल्या विधानसभेत आपलंच सरकार येऊन मुख्यमंत्रिपदी पुन्हा ‘मातोश्री’वाले येणार असाही विनोद केला होता एके काळी त्यानं.
उपकारभारी (गंभीरपणेच) : पण आता एवढ्या आजारपणातही ते आमचे ३५ जण तुम्ही पळवणार असं छातीठोकपणे सांगत आहेत पोटतिडकीनं. त्यामुळे गंभीरपणानंच घ्यावं लागेल आम्हाला.
कारभारी : अहो, त्या कऱ्हाडवाल्या माजी कारभाऱ्यांनी परवा असाच धुरळा उठवून दिला, की महिनाभरात मराठी पंतप्रधान होणार म्हणून देशाचा. असा गंभीर विनोद करतात ही मंडळी अधूनमधून. त्याशिवाय ते महाराष्ट्राच्या लक्षात कसे राहणार ना? हल्ली त्यांच्या पक्षातच त्यांना कुणी विचारत नाही.
उपकारभारी (थोड्या उत्साहानं) : काय पंतप्रधानपदी मराठी माणूस. मग तुमच्याशिवाय कोण असणार या पदास लायक माणूस. तुम्ही लवकरात लवकर दिल्लीचा विचार करा. नव्हे दिल्लीलाच जा.
कारभारी (उपहासानं) : हो. म्हणजे इथं कारभारीपदाची खुर्ची मोकळी होईल तुमच्यासाठी. असंच ना...एवढे आग्रही राहू नका. मी महाराष्ट्रात पुन्हा आलोय. पुन्हा पुन्हा येईन. मी पुन्हा येईन...
उपकारभारी (निराश) : तुम्ही पुन्हा येणार तर मग आम्ही कुठं जाणार राव. आमच्या दरे गावीच जावं लागेल.
कारभारी (समजुतीच्या स्वरांत) : अहो थांबा आधी ‘स्थानिक स्वराज्य’मध्ये शक्यतो एकत्र लढू. नाही तर मैत्रीपूर्ण लढू.
उपकारभारी (उसळून) : मैत्रीपूर्ण कसं लढायचं आम्ही? अहो ठाण्यात आमचे शिलेदार तुम्ही पळवलेत. आता ३५ मुख्य शिलेदार तुम्ही पळवणार असल्याच्या बातम्या येताहेत. असं कसं चालेल?
कारभारी (शांतपणे) : उल्हासनगरात सुरुवात कुणी केली तुम्हीच ना...तिकडे सिंधुदुर्गात आमच्या नेत्याच्याच घरावर ‘स्टिंग ऑपरेशन’ केलं तुमच्या नेत्यानं. तो तुमचाच नेता आहे (सध्या तरी) तरी तुमचेच मंत्री मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार का घालताहेत?
उपकारभारी (वरमून) : आपल्या दोघांच्या भांडणात ते ‘घड्याळ’वाले उपकारभारी दादा लाभ उठवताहेत. चांगलेच अडचणीत असतानाही त्यांनी धडाका लावलाय निवडणूक प्रचाराचा. मतदान केलं नाय तर निधी मिळणार नाय वगैरे उघड धमकीच देताहेत.
कारभारी : ते बोलण्याच्या ओघात बोलायची पद्धत आहे दादांची. ते सगळ्यांची कामे करतात. मध्ये तर काही जण त्यांच्याकडे कामे घेऊन आले तर त्यांनी लगेच एकच मिनिट थांबा बघतो, असं आश्वासन देऊन पीएला फोन फिरवायला सांगितलं. नंतर समजलं त्या लोकांचं बिहारमधलं काम अडकलं होतं. मग तिथलं कामही त्यांनी मार्गी लावलं म्हणे त्यांनी खटपट लटपट करून.
उपकारभारी : मग त्यात काय एवढं. मीही भरसभेत फोन लावतो आमच्या मंत्र्यांना. तो फोन स्पीकरवर घेऊन थेट काम करण्याचे आदेश देतो. मंत्रीही लगेच हो म्हणतात. शेवटी हे गरिबांचं सरकार आहे, हे दीनदुबळ्यांचं सरकार आहे, हे मध्यमवर्गीयांचं सरकार आहे, गतिमान सरकार आहे...
कारभारी : हे माझं सरकार आहे, तेवढं मात्र विसरू नका
(उपकारभारी तातडीने फोन ठेवून, कारभाऱ्यांना न भेटताच सभेला निघून जातात)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.