Ganeshotsav 2025,local body elections 2025 Sarkarnama
महाराष्ट्र

Ganeshotsav 2025: हे देवा, आम्हाला महापालिका निवडणुकीत उदंड यश दे!

local body elections 2025: जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांचेही वेध आता राजकीय वर्तुळाला लागले आहेत. या गणेशोत्सवाकडे आपल्या प्रतिमा वर्धनासाठी, प्रसिद्धीसाठी एक सुवर्णसंधी म्हणून या निवडणुकांचे इच्छुक उमेदवार पहात आहेत.

सरकारनामा ब्यूरो

अभय नरहर जोशी

लाडक्या गणरायाच्या उत्सवाचं चैतन्यपर्व सुरू झालं आहे. येत्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांचेही वेध आता राजकीय वर्तुळाला लागले आहेत. या गणेशोत्सवाकडे आपल्या प्रतिमा वर्धनासाठी, प्रसिद्धीसाठी एक सुवर्णसंधी म्हणून या निवडणुकांचे इच्छुक उमेदवार पहात आहेत. या निवडणुकांत यश येण्यासाठी आपापल्या परीनं ते गणरायाला साकडं घालत आहेत. वाचा गणरायाला या नेत्यांनी घातलेलं साकडं, स्तवन आणि मांडलेलं गाऱ्हाणं...

पयलं नमन

गणपती बाप्पा मोरया...

पयलं नमन हो पयलं नमन

करितो वंदन हो करितो वंदन अरे हो

हे पयलं नमन करुनी वंदन

‘ईडी’शी भांडण, ‘ईडी’ नेत्याला,

‘ईडी’ उद्योजकाला, विरोधकाला...

मंत्र्याला ईडीनं झाकोळिला

आम्ही सांगतो नमन

तुम्ही ऐका हो गुणिजन

हे हे हे...पयलं नमन आम्ही करितो वंदन

पयलं नमन हो करितो वंदन

आम्ही करितो कथन

विस्कटली घडी, घोषणांवर जनता झुले

लाडकी बहीण आश्वासनांना भुले

बोगस बहिणींचे

गुपित खुले

सत्तेतली गजलक्ष्मी मदमस्त डुले

गणपती बाप्पा मोरया

मंगलमूर्ती मोरया

पयलं नमन हो करितो वंदन

आम्ही करितो कथन

नेत्यांचं बाप्पाला गाऱ्हाणं...

नेता : हे श्रीगणेशा, हे गणराया,

हे शंकर-पार्वती पुत्रा,

हे कार्तिकाच्या भावा,

हे वक्रतुंडा, हे बाप्पा मोरया

तुका, आम्ही, आज, गाऱ्हाणा घालतो,

तां ऐकून घे महाराज्या....

कार्यकर्ते : होय महाराज्या!

नेता : हे देवा, तूं आमच्या ह्या सगळ्या गोतावळ्याक सुखी ठेव.

तेंची, सर्वांची प्रकृती चांगली ठेव.

आमचीच सदैव, भरभराट होऊ दे

सत्ता आमच्याच घरी असू दे

माझी बायको, पोरगं, पोरगी, जावईबापू

झालाच तर नातवालाबी सत्ता मिळूं दे

असा आमचा तुका, हात जोडून सांगणा.

कार्यकर्ते : होय महाराज्या!

नेता : हे देवा आम्हाला महापालिका निवडणुकीत उदंड यश दे

कार्यकर्ते : होय महाराज्या!

नेता : हे गणनायका, लवकरच राजकारणात येणाऱ्या आमच्या पोरा-पोरीवर, परदेशांत गेलेल्या नातवंडांवर तुझी चांगली नजर असूं दे देश-विदेशांतील खात्यांतली रक्कम शाबूत ठेव, व्याज वाढू दे, आमच्या पुढं कोणालाच जाऊ देऊ नकोस, मंत्रिपद, आमदारकी, खासदारकी, सगळी आमच्या घरात अन् भावकीतच राहू दे

कार्यकर्ते : होय महाराज्या!

नेता : हे गौरीपति, पुढची सगळी पाच वर्षांची टर्म सुखाची जावूं दे,असा तुका आमचा सांगणा.

कार्यकर्ते : होय महाराज्या!

नेता : शेवटी देवा,आमच्याकडून काय चूक झाली असल्यास किंवा काय श्रेष्ठींचा, तुझा उपमर्द झालो असल्यास , किंवा तुझो आमकां, विसर पडलो असल्यास, किंवा वाडवडीलांचो, पूर्वजांचो किंवा लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडून अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास आमका सगळ्यांक क्षमा कर.

कार्यकर्ते : होय महाराज्या!

नेता : पुढ्ल्या वर्षीसुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक अशीच ताकद, सत्ता आणि संपत्ती दे ह्या पार्वतीपुत्रा तुका अखेरचा सांगणा.

कार्यकर्ते : होय महाराज्या!

इच्छुकाचे स्तवन

गणा धाव रे मला पाव रे

गणा धाव रे मला पाव रे

तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे

तिकीट निवडणुकीचं दाव रे

सगळा जुळून आण की डाव रे

श्रेष्ठी कृपेची छाया असू दे

त्यांच्या मनी नाव माझे ठसू दे

दूर किनारी हाय सत्तेचा धाम रे

वादळातून काढ माझी ही नाव रे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT