युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहे. याचदरम्यान, सर्वसामान्यांना आता सीएनजी आणि पीएनजी दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. सीएनजीच्या दरात 1 रुपये आणि तर घरगुती पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना आता सीएनजीसाठी प्रति किलो 95 रुपये 75 पैसे तर घरगुती ग्राहकांना पीएनजीसाठी प्रतिमानक घनमीटर 51 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत.
सध्या मुंबईत जैन धर्मियांकडून अनेक ठिकाणी या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांना विरोध झाल्यानंतर त्यांच्यावर दुसरा रंग लावण्यात आला आहे. हा वाद चिघळत चालला आहे. जैन मुनी निलेशचंद्र आणि संदीप देशपांडे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. जैन मुनी निलेशचंद्र यांनी देशपांडेंवर सुनावलं आहे. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राम तर नितेश राणे हनुमान असल्याचं उद्गार काढले आहेत.
चंद्रपुरात पुन्हा एकदा धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार संघर्ष उफाळून आला आहे. राजेश अडूर यांना गटनेतेपदावरून हटवावं आणि सुरेंद्र आडपाले यांना गटनेतेपदी नियुक्ती करावं, यासाठी धानोरकर गटाच्या १६ नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. दुसरीकडे धानोरकर गटातील सर्व नगरसेवकांना अपात्र घोषित करावं. आयुक्तांनी दबावात निर्णय घेऊ नये; अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा विद्यमान गटनेते राजेश अडूर यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दोन गटात वादाला पुन्हा सुरुवात झाली आहे.
मॉन्सूनसाठी कोकणच्या सीमेवरच रेंगाळला आहे. जून महिन्यात राज्यात पावसाची ७२ टक्के तूट आहे. आणखी चार ते पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन पुणे वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. या योजनेत 60 टक्के निधी केंद्र सरकार तर 40 टक्के निधी राज्य सरकार देईल. महाराष्ट्र पोलिस दलासाठी इतका मोठा निधी मंजूर केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मनापासून आभारी आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने अशा अनेक दृष्टीने महाराष्ट्र पोलिस दल अधिक सुसज्ज करणे यातून शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
पुरुषोत्तम (अधिक) मासात तब्बल १५ लाख भाविकांनी पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले आहे. या महिन्यात विठुरायाच्या दानपेटीत तब्बल ९ कोटी ४६ लाख रुपयाचं दान जमा झालं आहे. तसेच, भाविकांनी सोन्या-चांदीचे दागिनेही दान केले आहेत.
फुटणाऱ्या खासदारांची उद्धव ठाकरेंकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये... ठाकरेसेनेचे नेते खासदारांशी संपर्क साधत आहे... खासदारांचा गट फुटण्याची चर्चा असल्याची प्रत्येक खासदारांशी वैयक्तिक संपर्क साधला जातोय... खासदारांची मत ऐकून घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळवली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये..
भोंदू खरातची पत्नी कल्पना खरातचा औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळलाय...शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कल्पना खरातने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता...मात्र, कोर्टाने अर्ज फेटाळलाय...फिर्यादीने कर्ज आणि व्याजाची संपूर्ण रक्कम परत केल्यानंतरही जमीन परत करण्यात आली नसल्याचा आरोप केलाय...खरातच्या पत्नीने आपण व्यवहारात सहभागी नसल्याचा आणि मुख्य आरोपीची पत्नी असल्याने गोवण्यात आल्याचा दावा केला...मात्र, अर्जदाराचा गुन्ह्याशी संबंधाचे पुरावे उपलब्ध असल्याचं न्यायालयानं म्हटलं...त्यामुळे जामीन अर्ज फेटाळून लावलाय...
सध्या गुजरातमधील वनतारा येथे असलेल्या माधुरी हत्तिणीचा कोल्हापुरातील नांदणी मठात परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी वनतारातील एक टीम नांदणीत आली होती. तेथील सुविधांची पाहणी करण्यात आली. पुढील महिनाभरात माधुरी हत्तीण मठात परत येण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने आमदार मंदा म्हात्रे नाराज झाल्या आहेत. याप्रकरणी आज त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. संबंधितांना समज देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणातील आरोपी कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आज त्यावर सुनावणी झाली. कोर्टाने कल्पना खरातच्या विरोधात पुरावे असल्याचे स्पष्ट करत अर्ज फेटाळून लावला.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मंत्रालयाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलांना वेग आला असून रिक्त पदे भरणे आणि काही महत्त्वाच्या नियुक्त्यांबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षातील महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तसेच महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी वैशाली नागवडे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल 20 जूनला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ओमराजे निंबाळकर भावूक झाले. त्यांनी सांगितले की, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली. या घटनेची वेदना आजही मनात ताजी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, या प्रकरणात पूर्ण न्याय मिळावा आणि सत्य सर्वांसमोर यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 जूनपर्यंत टेलिग्राम अॅपवरील काही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मेसेज एडिटिंगचे वैशिष्ट्यही तात्पुरते निष्क्रिय करण्यात आले आहे. परीक्षेसंदर्भातील संवेदनशील माहितीचा गैरवापर टाळणे आणि पारदर्शकता राखणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला दिलासा दिला होता. इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. मात्र आता कराराच्या मसुद्यातील एक अट खोटी असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'इराणने कधीही अणुशस्त्र न बाळगण्याचे मान्य केले आहे! तसेच, अमेरिका इराणला ३०० मिलियन डॉलर्स देत आहे ही बातमी म्हणजे 'डमोक्रॅट्स'नी (Dumocrats) पसरवलेली एक खोटी बातमी आहे." असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज, 16 जून रोजी मुंबई सत्र न्यायालयात लागणे अपेक्षित होते. मात्र, निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचं सांगत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला आहे. आता या खटल्याचा अंतिम निकाल 20 जून 2026 रोजी लागण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातील वेदांत बंडगर हत्या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू असतानाच सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. "सांगलीतील अनेक खुनांच्या घटनांमध्ये एक ठराविक पद्धत दिसून येते. अल्पवयीन मुलांना पुढे करून गुन्हे घडवले जातात आणि त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली दिली जाते. अशा मुलांना गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणारे एक रॅकेट कार्यरत असून त्यातून पैशांचा मोठा व्यवहार सुरू आहे," असा गंभीर आरोप पाटील यांनी केला.
Maharashtra State Wrestling Council : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द करण्याचा घेतलेला निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवत कुस्तीगीर परिषदेची याचिका फेटाळून लावली आहे.
नागपूर विधानपरिषदेमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढत असून अतुल लोंढे हे अधिकृत उमेदवार आहे. तर भाजपकडून राजीव पोतदार मैदानात आहे. नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे 19 नगरसेवक मतदार आहे. त्यात हिंगण्याचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भीमाशंकर देवस्थान प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा इतर कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नाही. सर्व भाविकांना एकाच नियमातून दर्शनाची सुविधा मिळणार आहे. दर्शन व्यवस्थेत समानता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय लागू करण्यात आला. सध्या 24 तारखेपर्यंतचे सर्व ॲानलाईन बुकिंग स्लॉट भरले असून भाविकांनी किमान दोन दिवस अगोदर ऑनलाईन बुकिंग करूनच दर्शनासाठी यावे, असे आवाहन देवस्थान प्रशासनाकडून करण्यात आले.
"इंधनाच्या बाबतीत नफेखोरी हा भारत सरकारचा धंदा बनला आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये चार हजार ईव्हीएम मशीनच जळणं आणि नीट परीक्षेचे डॉक्युमेंट जळणं, यामध्ये चोर तो चोर वर शिरजोर, असा भारतीय जनता पार्टीचा कित्ता गिरवणं सुरू आहे," असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
महाबळेश्वर येथील हेरिटेज क्षेत्रातील प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या वृक्षतोड आणि उत्खननप्रकरणी संबंधित संस्थेच्या चेअरमन आणि सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर महाबळेश्वर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच उच्चस्तरीय समितीच्या पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सावकारीचे लायसन्स मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती 30 हजारांची लाच स्वीकारतान, भुसावळातील सहकारी संस्था कार्यालयातील दोन प्रमाणित लेखा परीक्षकांना जळगाव एसीबीने अटक केली. कारवाई दरम्यान, सहकार अधिकारी मात्र पसार झाला. प्रामाणित अधिकारी मानधनावर, तर पसार अधिकाऱ्याला तब्बल 1 लाख रुपये वेतन आहे. सहकार विभागाचे 'प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश विसपुते व प्रमाणित लेखापरीक्षक हेमंत प्रकाश काळे अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. तर वर्ग तीनचा सहकार अधिकारी विजय गरूड हा पसार झाला आहे. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यानंतर, राज्यभरात बनावट पनीर, खवा यासह भेसळयुक्त अन्नपदार्थावर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. लातूरमध्ये आज सकाळपासून खवा निर्मिती करणाऱ्या आठ दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून तपासणी सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील हे पथक लातूरच्या वेगवेगळ्या भागात अचानक धाड टाकत, भेसळुक्त अन्न तसेच खवा पनीर निर्मितीचे नमुने घेतले आहे, दरम्यान या पथकाच्या धास्तीने कालपासून शहरातील पान टपऱ्या देखील बंद आहेत.
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आतापर्यंतची मोठी कारवाई करत 4 गावठी पिस्तुल, 3 जिवंत काडतुसे आणि मोटारसायकलसह दोन आरोपींना अटक केली. शहरातील साळुंखे नगर भागातील कमानीजवळ सापळा रचून बालाजी बबन काळे व आश्रू उर्फ भुऱ्या भिमा काळे यांना अटक केली. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून सुमारे 2 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमरावती विधान परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवाराच्या भूमिकेवरून वाद सुरूच आहे. निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आज दुपारपर्यंत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता अमरावतीत स्थानिक काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. नीलेश विश्वकर्मा यांना काँग्रेसने पाठिंबा दिला, तर हर्षजित देशमुख यांची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागलं आहे.
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची न्यू पॅलेस येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. एकेक घास खाऊया. एकदम काही मिळणार नाही, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांना दिला. या वेळी बाबा इंदुलकर यांनी कोल्हापूर गॅझेटियरची माहिती दिली. रूपेश पाटील यांनी कुणबीचे दप्तर लपवले असून, कुणबी दाखल्यासाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप केला. तसेच कुरवाडी, कुळवाडी शब्दांना कुणबी म्हणून मान्यता दिली जात नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर जरांगे-पाटील यांनी कुरवाडी व कुळवाडी शब्दांना मान्यता आहे. काही अधिकारी नकारात्मक सांगत असतील, तर थेट तहसीलदारांना भेटा, अशी सूचना केली. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला एक वर्षे मुदतवाढ दिली आहे. ही समिती महाराष्ट्रात कुणबी नोंदींचा पुन्हा शोध घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वसंतराव मुळीक यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सारथीला कमी निधी मिळत असून, त्यांचे कामकाज ठप्प आहे. दोन्ही संस्थांना पाच हजार कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.