हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, तसेच पुणे , रायगड आणि रत्नागिरी येथील घाट क्षेत्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.
मोदी सरकारमधील केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये भाजपने जॉर्ज कुरियन यांना पुन्हा संधी दिली नाही. त्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती भवनाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसरात पूर्वतयारी सुरू केली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मुक्काम स्थळी वारकऱ्यांसाठी प्रशस्त विसावा उभारण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मुंबईत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहरातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुण्यातील फुरसुंगी परिसरातील मंतरवाडी येथे काल रात्री एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडणीच्या फोनकडे दुर्लक्ष केल्याच्या रागातून हा गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले असून, कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडिया पोस्टद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे पुण्यातील व्यापारी आणि व्यावसायिक वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच आपल्या नेहमीच्या डॅशिंग स्टाईलने कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंढे यांच्या या कडक कारवाईच्या धसक्यामुळे राज्यातील खाद्यपदार्थ विक्रेते आणि उत्पादकांचे धाबे दणाणले असून, परवाने आणि नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सध्या अन्न व्यावसायिकांची मोठी घाई सुरू झाली आहे.
देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे,ती शक्ती सगळ्यांच समाधान करणारी आहे, त्यामुळे ज्यांना आमदार व्हायचे,त्यांनी काळजी करू नये,असे विधान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मला, धैर्यशील कदम, अतूलबाबा, मनोजदादा, अश्या चौघांना विधानसभेत जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता मी चौघेही आमदार झालोत, प्रामाणिकपणे काम केल्यावर देवाभाऊ पाठीशी ठाम उभे राहतात आणि ज्यांना आता आमदार व्हायचं इच्छा आहे, त्यांनी काळजी करू नये, कारण देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे, जी सगळ्यांचा समाधान करणारी आहे, असं विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे.
इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली असलेल्या पश्चिम आशियातून एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. नैसर्गिक वायू उत्पादनात जगातील आघाडीचा देश असलेल्या कतारमधील 'रास लफान' औद्योगिक शहरातील गॅस प्लांटमध्ये एक भीषण स्फोट झाला. या भीषण अपघातात 13 कामगारांचा मृत्यू झाला असून 66 जण गंभीर जखमी झाले आहेत. कतारच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्यांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे.
"मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, त्या मतदारांचे भविष्यात कामे करण्यासाठी, त्यांच्या काही अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना पक्षाचा सहयोगी म्हणून काम करण्यास परवानगी दिलेली आहे. भविष्यात पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर ती सुद्धा मी पार पाडेन," अशी भूमिका आमदार गोळुक गीते यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल होताच मागणी केली आहे.
शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा, या मागणीसाठी सांगलीच्या विटा इथं महिलांनी लाटणे मोर्चा काढला. हातात लाटणे घेऊन महिला आणि शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. काही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोर्चाच्या अग्रभागी होते. मोर्चात सहभागी पथनाट्याने लक्ष वेधले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हालगी ताशाच्या गजरात काढण्यात आला. खानापूर तालुक्यातील जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग मुळे बागायत शेती उध्वद्स्त होऊन शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असल्याने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, ही मागणी घेऊन हातात लाटणे घेऊन थेट सरकारच्या विरोधात महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.
वाशिम जिल्ह्यात नाफेडमार्फत शासकीय हमीभावाने ज्वारी खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 3 हजार 699 रुपये दर मिळत असल्याने बाजारभावापेक्षा अधिक दराचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात 3 हजार 467 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांकडून 44 हजार 68 क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी 16 कोटी 30 लाख 85 हजार रुपयांहून अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे. खरेदी केलेली ज्वारी शासकीय गोदामांमध्ये साठवून सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे रेशनधारकांना वितरित केली जाणार आहे. ज्वारी खरेदीची अंतिम मुदत 30 जून असल्याने नोंदणीकृत शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर ज्वारी आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर काल मुंबईवरून नांदेड विमानतळावर दाखल झाले, त्यानंतर हिंगोली लोकसभेतील हादगावकडे गाड्यांचा ताफा घेऊन निघत असताना आष्टीकरांना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवले. गद्दार लिहिलेले फलक झळकावले. त्यानंतर आता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी देखील ऑपरेशन तुडवा राबवत असाल, तर जशास तसे उत्तर देऊ,असे म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांना प्रति आव्हान दिले आहे. कुणी आपल्या अंगावर येत असेल, तर आम्ही सोडणार नाही, असं खासदार आष्टीकर हिंगोलीत दाखल झाल्यानंतर म्हटले.
पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात एका बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात कालबाह्य बिस्किटे, मॅगी आणि इतर खाद्यपदार्थ पाण्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने हा साठा विल्हेवाट लावण्यासाठी पाण्यात टाकण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले असून, नळदुर्ग येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. ओम राजेनिंबाळकर यांनी गद्दारी केल्याचा आरोप करत प्रतिमा घेऊन निषेध मोर्चा अन् त्यानंतर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. गद्दारी करणाऱ्या ओम राजनिंबाळकरांनी सभा घेतल्यास ती उधळून लावू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
संसदेत शिवसेना ठाकरे पक्षाला खिंडार पाडल्यानंतर महायुतीचे नेते आता विधानसभेतही उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्याच्या तयारीत आहेत. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर आपले आमदार फुटू नयेत आणि सभागृहात त्यांनी आक्रमक राहावे, यासाठी उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. या बैठकीला विधानसभेच्या 20 पैकी 16 आमदारांनी आणि विधान परिषदेच्या सर्व 5 आमदारांनी हजेरी लावत उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. संजय देरकर, राहुल पाटील, सुनील शिंदे, संजय पोतनीस हे चार आमदार या बैठकीला गैरहजर होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.