Live Update 2 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : घुले हत्या प्रकरणात एसआयटीला सहकार्य करणार - बजरंग सोनवणे

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 27 June महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) प्रशासकीय, आर्थिक, शैक्षणिक तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

सरकारनामा ब्युरो

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’.या योजनेची अंमलबजावणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून होणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लाखो शेतकरी कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

वनमंत्री गणेश नाईक यांची मोहोळ कुटुंबियांसोबत सांत्वनपर भेट

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले; आज राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पुण्यातील कोथरूड येथे श्री. मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट देत स्व. किसनराव मोहोळ यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण करून मोहोळ कुटुंबियांचे सांत्वन केले.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटूंबीय उपस्थित होत्या.

1 जुलैपासून मोठे बदल

UIDAI कडून पुढील ६ महिन्यांसाठी आधार अपडेट सेवा पूर्णपणे मोफत केली जाणार आहे.यापूर्वी नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलण्यासाठी ७५ रुपये शुल्क मोजावे लागत होते. पासपोर्टचे शुल्क १,५०० रुपयांवरून थेट २,५०० रुपये करण्यात येणार आहे.तर तत्काळ पासपोर्टसाठी ३,५०० ऐवजी ५,००० रुपये मोजावे लागणार आहेत, असे बदल १ जुलैपासून होणार आहे.

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

​राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी महाकर्जमुक्ती योजना म्हणून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ या योजनेकडे पाहिले जात आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लाखो शेतकरी कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

बुलढाणा येथे गर्भ लिंग निदान करताना दोन बनावट डॉक्टरांना रंगेहात अटक

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ असलेल्या परतापुर परिसरात एका घरात दोन बनावट डॉक्टर बंदी असलेल्या सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याच्या गोपनीय माहितीवरून बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दत्तात्रय बिराजदार यांच्या पथकाने छापा टाकून दोन बनावट डॉक्टरांना गर्भलिंगनिदान चाचणी करताना रंगेहात पकडले आहे.

केतन अग्रवालच्या कुटुंबीयांना न्याय मिळवण्यासाठी नागरिकांचा कॅण्डल मार्च

पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असलेला केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून ढकलून खून त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केला होता. या खून प्रकरणात निनिष्पापळी ठरलेल्या केतन अग्रवाल ला न्याय मिळवून देण्यासाठी आज त्याच्या लोढा बेल्मोनॉट सोसायटीत राहणाऱ्या हजारो नागरिकांनी कॅण्डल मार्च काढला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या प्रकरणात पोलिसांनी अतिशय कठोर कारवाई करून अग्रवाल कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या कॅण्डल मार्चच्या माध्यमातून नागरिकांनी केली आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग, आतापर्यंत दहा जणांचे जबाब नोंदवले

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. काल सियाचा भाऊ साहिल याची पोलिसांनी सखोल चौकशी केली होती. तर आज सियाचे आई-वडील यांची लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून चौकशी सुरू असून, गेल्या दोन तासांपासून त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. या चौकशीचे नेतृत्व लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे करत असून, तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता गद्दार गद्दार म्हणून ओरडत फिरत आहे : खा. श्रीकांत शिंदे

उद्धव ठाकरेंनी रामाचा विरोधात जाऊन हिंदुत्वाच्या विरुद्ध जाऊन काँग्रेसचे पाय पकडले बाळासाहेबांच्या विचाराला हरताळ फसला मात्र राम मंदिर हे एनडीएच्या सरकारने केलं नरेंद्र मोदींनी करून दाखवलं आणि 2019 मध्ये स्वतःच्या खुर्चीसाठी कोणाबरोबर जाऊन बसले ? हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजेल. राम मंदिरला ज्यांनी विरोध केला त्यांच्याबरोबर हे जाऊन बसले होते. त्यामुळे 2024 ला जनतेने तुमची अशी हालत करून ठेवली आहे. हे खासदार आले त्यांनाही तुम्हाला सांभाळता आले नाही, तुमच्या बरोबर होते तेव्हा खासदार चांगले होते. आता गद्दार गद्दार म्हणून ओरडत फिरत आहे आणि आता तुम्हाला दिलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन मंगल कार्यालयात सभा घ्याव्या लागत आहेत अशी तुमची परिस्थिती झाली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्या नावाने घेता खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली

उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर

राज्यातील ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडले असून 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू केला आहे. उद्धव ठाकरेंनी ईशान्य मुंबईत जाहीर सभा घेऊन खासदार संजय दिना पाटील यांना स्पष्ट इशारा दिला. यानंतर आज विदर्भात दौरा करत खासदार संजय पाटील यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. यावेळी वाशिम विधानसभा मतदारसंघातून डॉ. सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारीच उद्धव ठाकरेंनी जाहीर केलीय.

धावत्या लोकलमधील हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा अलर्ट मोड; संशयित प्रवाशांची झडती सुरू

अंधेरी-बोरिवली मार्गावरील धावत्या लोकलमध्ये किरकोळ वादातून २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी संपूर्ण उपनगरी रेल्वे मार्गावर सतर्कता वाढवली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनीही अलर्ट मोडवर जात स्थानक परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. धावत्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हत्येच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संशयित प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे.

केतन अगरवाल हत्याकांडात नवा खुलासा; क्रिकेटमधून सिया-चेतनची ओळख

पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणाच्या तपासात नवे धागेदोरे समोर येत आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिया आणि चेतन चौधरी यांची चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान दोघांची ओळख क्रिकेटच्या माध्यमातून झाल्याचे उघड झाले आहे. सियाचा भाऊ साहिल याच्यामुळे सिया आणि चेतन यांच्यात संपर्क निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.

टीईटी पेपरफुटीवरून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून ठाकरे गटाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना (ठाकरे) उपनेत्या शुभांगी पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. नीट आणि टीईटीसारख्या परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून केंद्र व राज्य सरकार परीक्षा व्यवस्थापनात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

केतन अग्रवाल हत्याकांडात तपासाला वेग; सियाच्या आई-वडिलांची पोलिसांकडून चौकशी

पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत १० जणांचे जबाब नोंदवले आहेत. शुक्रवारी सियाचा भाऊ साहिल याची चौकशी करण्यात आली होती. आज सियाचे आई-वडील यांची लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपासासाठी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फडणवीस-ठाकरे एकाच विमानात; उदय सामंतांच्या स्टेटसने रंगल्या राजकीय चर्चा

काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते नागपूर असा एकत्र विमानप्रवास केल्यानंतर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचे स्टेटस चर्चेचा विषय ठरले. सामंत यांनी फडणवीस-शिंदे यांचा फोटो शेअर करत सूचक संदेश दिला. दरम्यान, ठाकरे यांनी विमानातील चर्चेबाबत लवकरच माहिती समोर येईल, असे सांगितल्याने राजकीय तर्क-वितर्कांना आणखी वेग आला आहे.

टीईटी परीक्षार्थ्यांना दिलासा; नव्या तारखेची लवकरच घोषणा

महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या ६ लाखांहून अधिक शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. राज्यातील ३७ शहरांतील १०२८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा नव्याने घेतली जाणार असून, पुढील २ ते ३ दिवसांत परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती उपायुक्त प्रिया शिंदे यांनी दिली.

5 टक्क्याप्रमाणे 40 लाख दिले, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने शिंदेच्या आमदाराचे स्टिंग ऑपरेशन करत केला भंडाफोड

कोल्हापूर ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रवीकिरण इंगवले यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकत शिवसेनेचे नेते आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. तब्बल वर्षभरापूर्वीची घटना व्हायरल करत टक्केवारीतून पैसे मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. याबाबत संबंधित व्यक्तीने पाच टक्के म्हणून आमदार राजेश क्षीरसागर यांना दिल्याचा उल्लेख करत आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान, आमदार राजेश क्षीरसागर याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भरती ; १ लाख प्रतिनिधींची गरज असताना केवळ १२ हजार नियुक्त 96 हजार जागा रिक्त

Pune News : निवडणुकी दरम्यान आणि निवडणूक निकालानंतर मतदार यादी मधील घोळा बाबत मोठ्या प्रमाणात टीका करणारे आणि आपल्या पराभवाला निवडणूक यादी जबाबदार असल्याचा सांगणारे राजकीय पक्ष अन नेते प्रत्यक्ष कामाच्या वेळी मात्र ढिम्म असल्याचे धक्कादायक चित्र पुण्यात समोर आले आहे.

 तुम्ही निवडून दिलेले गदार निघाले, मतदारसंघातील सर्वांची मी माफी मागतो : उद्धव ठाकरे

MUMBAI :मुंबईकरांवरील पाणीसंकट आणखी वाढणार

मुंबईवरील पाणीसंकट आणखी तीव्र होत असल्याचे चित्र आहे. धरणांनी तळ गाठला आहे, त्यातच जून महिना संपला तरी समाधानकारक पाऊस न पडल्याने टेन्शन अधिक वाढले आहे. .त्यामुळे आता मुंबईतील पाणीकपातीत वाढ केली जाईल. जुलैपासून मुंबईसह उपनगरांत 25 टक्के पाणीकपातीची शक्यता वर्तवली जाते आहे.

खासदार फुटले याची मतदाराकडे माफी मागणार; उद्धव ठाकरे

मी दौरा केला म्हणून हे सहा खासदार निवडून आले होते , माझ्या शब्दावर ते निवडून आले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

केतन अग्रवाल हत्या प्रकरण; मित्तल दाम्पत्याची चौकशी

लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रेनू मित्तल आणि नरेंद्र मित्तल यांची चौकशी केली. दोघांचेही जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

हिंगोलीत आज उद्धव ठाकरे यांची सभा

शिवसेनेतील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. हिंगोलीत त्यांची सभा होणार आहे.

Election Commission : देशभरात सुमारे सहा कोटी मतदारांची नावे वगळली; विरोधक अन् निवडणूक आयोग यांच्यात वाद उफळला

मतदारयाद्यांच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेला (एसआयआर) प्रारंभ होऊन एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत निवडणूक आयोगाने सदर उपक्रमाद्वारे देशभरात सुमारे सहा कोटी नावे मतदार यादीतून वगळली आहेत. या प्रक्रियेमुळे विरोधक आणि निवडणूक आयोग यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला असला, तरी आयोगाने मतदारयादीतील त्रुटी दूर करण्याची मोहीम 19 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू ठेवली आहे.

Amravati Crime : अमरावतीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; फ्लॅटवर छापा टाकून प्रतिबंधित लाखो रुपयांच्या ई-सिगारेट जप्त...

अमरावती शहर गुन्हे शाखेने एका आलिशान अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा घालत, सरकारने प्रतिबंधित केलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा (E-Cigarette) मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 75 हजार रुपये किमतीच्या 55 हायटेक ई-सिगारेट जप्त करत आशिष बाबुराव कडू (वय 40, रा. केडिया नगर, अमरावती) मूळ गाव जवळा शहापूर अचलपूर तालुका या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Beed Crime Update : विलास घुले हत्याप्रकरण; खासदार सोनवणे पुत्राची एसआयटीकडून आज चौकशी होणार

विलास घुले हत्या प्रकरणात एसआयटीकडून खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राची आज चौकशी होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. केज पोलिस ठाण्यामध्ये आज दुपारी सौरव सोनवणे स्वतः हजर राहून चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती आहे. विलास घुले हत्या प्रकरणात फिर्यादीने पुरवणी जबाबात नाव दिलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांना चौकशीसाठी एसआयटीने पोलिस ठाण्यामध्ये बोलवलं आहे.

Beed Update : खिंडकर बंधूंवर एमपीडीएनुसार कारवाई; बीड पोलिसांकडून हरसूलमध्ये कारागृहात रवानगी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आणि महत्त्वाचा साक्षीदार धनंजय देशमुख यांचा साडू दादासाहेब खिंडकर याच्यावरती बीड पोलिसांनी मोठी कार्यवाही केली. दादासाहेब खिंडकर याच्यावर एमपीडीए अंतर्गत कार्यवाही करत भाऊ समाधान खिंडकर आणि दादासाहेब खिंडकर दोघा भावांची आता हरसूल कारागृहात बीड पोलिसांनी रवानगी केली. बीड जिल्ह्यामध्ये अशांतता निर्माण करणे एकमेकांना मारहाण करणे, दहशत निर्माण करणे, असे प्रकार दोघा भावांकडून सुरू होते. यामुळे बीड पोलिसांनी ही कारवाई केली.

Shivsena vs ShivsenaUBT : 'जो गरजते है, वो बरसते नही'; उद्धव ठाकरेंवर शिंदेंच्या शिवसेना मंत्र्यांची सडकून टीका

'जो गरजते है, वो बरसते नही', अशा शब्दात मंत्री संजय राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ दौऱ्याबाबत आणि ऑपरेशन तुडवाबाबत टीका केली. कोणी कितीही धमक्या दिल्या, टीका टिपणी केली तरी त्याचे उत्तर आम्ही कामाने देऊ. आम्ही 40 आमदारांनी उठाव केला होता, त्याचे 60 आमदार झालो, अजूनही संख्या वाढत आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून अनेक जण यायला तयार आहेत. आगामी काळात अनेक प्रवेश शिवसेनेत बघायला मिळतील. त्यामुळे कुणाच्याही टीकेला उत्तर न देता आम्ही काम करत राहू, असे संजय राठोड यांनी म्हटलं आहे.

Bhiwandi News : भिवंडीत मुदतबाह्य पिठाचा नऊ टन साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात भेसळ करणारे व मुदतबाह्य साहित्य विक्री करणाऱ्यां विरोधात कारवाईचा जोर आहे. त्यानुसार भिवंडी शहरातील निजामपूर परिसरात अन्न निरीक्षण पथकाने केलेल्या कारवाईत 5 लाख 18 हजार रुपये किमतीचा मुदतबाह्य पिठाचा नऊ टन वजनाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Washim Crime : आंतरजिल्हा दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 10 चोरीच्या दुचाकी जप्त...

वाशिम पोलिसांनी आंतरजिल्हा दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन सराईत चोरांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे 7 लाख रुपये किमतीच्या 10 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानुसार तपासाचे चक्र फिरून वैभव प्रल्हाद घुले आणि लखन उर्फ पुष्पा राठोड या दोघांना अटक करण्यात आली. आरोपींनी वाशिमसह हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती ग्रामीण आणि धाराशिव जिल्ह्यांत दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली.

Konkan Update : गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘रोबोटिक लाईफगार्ड’चा वापर होणार

गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. बुडणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी ‘रोबोटिक वॉटरक्राफ्ट’ यंत्रणा कार्यान्वित करण्याची कल्पना मांडली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी हा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीला सादर केला आहे.

Shivsena Operation Tiger : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आणखी 14 पेक्षा जास्त आमदार शिंदे शिवसेनेत दाखल होणार

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाचे सहा खासदार आधीच फुटले असताना, आता ‘ऑपरेशन टायगर 3’अंतर्गत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आणखी 14 पेक्षा जास्त आमदार लवकरच शिंदे शिवसेनेत दाखल होणार असल्याचा खळबळजनक दावा जळगावचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंनी दाढीवर हात फिरवला की ‘टायगर सक्सेस’ होतो, असं सांगत त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला खिंडार पाडण्याचा थेट इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT