बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असातानाच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. यावरून विरोधी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांनी, हा राजीनामा म्हणजे आश्चर्याची बाब आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज व्यवस्थित चालले असतानाच धनखड यांनी राजीनामा दिला. पण आता तो दिला की घेतला हे तेच स्पष्ट सांगू शकतात.
जळगावमधील जामोदचे भाजप आमदार संजय कुटे याचे कार चालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. पंकज देशमुख मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा हात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तर या प्रकरणात मृत पंकज देशमुख यांच्या पत्नीने तीन संशयितांची नावे पोलीस अधिक्षकांना दिली आहे. तसेच त्यांनी भाजप कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमक्या येत असल्याची तक्रारही केली आहे.
कल्याणमध्ये एका मराठी तरुणीला एका अमराठी तरुणाने बेदम मारहाण केली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणात मनसेनं उडी घेतली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेतली आहे. तसेच तुला झालेल्या मारहाणीचा बदला घेऊ, असे आश्वासनही त्या पीडित तरुणीला दिले आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण कोकाटे यांनी यावरही वादग्रस्त विधान केलं आहे. यावरून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांनी आपण, कोकाटेंच्या विधानाचं समर्थन करणार नाही. पण त्यांनी आणि मंत्र्यांनी अशी विधानं टाळायला हवीत. तर त्यांच्या राजीनाम्याच्या योग्य तो निर्णय अजितदादाच घेतील, असही सामंतांनी म्हटलं आहे.
माणिकराव कोकाटेंच्या विधानाचं समर्थन करणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की मंत्र्यांनी अशी विधानं टाळायला हवीत, असे मत सामंत यांनी व्यक्त केले. तसेच राजीनाम्याच्या विरोधकांच्या मागणीवर अजित पवार योग्य तो निर्णय घेतील, अशी माहितीही सामंतांनी दिली. माणिकराव कोकाटेंनी वादविवाद होणारी विधाने टाळायला हवीत.
शेतकरी आमचा अन्नदाता आणि मायबाप आहे, त्यामुळे मंत्री महोदयांनी असे बोलू नये, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. जर असे वक्तव्य केले असेल, तर ते टाळले पाहिजे. संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणीही जोर धरत आहे. या मंत्र्यांच्या पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत. जे काही बोलले गेले, त्याची वस्तुस्थिती काय आहे, याची पडताळणी होणे आवश्यक आहे, असेही शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात रम्मी खेळणे अयोग्य असल्याचे म्हटले. यावर संबंधित मंत्र्यांनी मुख्यमंत्री बातम्या पाहून बोलले असावे असा दावा केला. तसेच, मुख्यमंत्र्यांना आपण माहिती दिली नसल्याचे आणि चौकशी बंद झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मीडियावरील विश्वासाने मुख्यमंत्र्यांनी विधान केले असावे असे त्यांचे म्हणणे आहे.
नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती करावं, अशी मागणी भाजपाच्याच एका आमदाराने केली आहे. उपराष्ट्रपतीपद बिहारला द्यावं, असं त्यांनी म्हटलंय. अशी मागणी करणाऱ्या भाजपा आमदाराचे नाव हरिभूषण ठाकूर बचौल असे आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'महाराष्ट्र नायक' पुस्तकात फडणवीस यांच्या कार्याबद्दल शरद पवार यांनी मतं व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट आहे. फडणवीसांचे कष्ट पाहून, ते थकत कसे नाहीत? असा प्रश्न पडतो, अशा शब्दांत शरद पवारांकडून फडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आलाय.
मुंबईतील सावली डान्स बार हा गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्रींच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला होता. परब यांच्याविरुद्ध दोन दिवसांत हक्कभंग आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अनिल परबने दादागिरीची भाषा करू नये, मी भीक घालत नाही. हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव, असे आव्हान रामदास कदम यांनी अनिल परब यांना दिलं आहे. मी राज्यातले सगळे डान्सबार बंद करण्याची मोहिम हाती घेण्यासाठी योगेश कदम यांना सांगणार आहे, असेही त्यांनी म्हटले.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर भारतीय जनता पक्षाने प्रथमच एकहाती सत्ता मिळविली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यतर्वी सहकारी बॅंकेच्या 21 पैकी 15संचालक हे भाजपचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रथमच बॅंकेवर वर्चस्व मिळविले आहे. आता आम्ही बॅंकेच्या 15 जागा जिंकल्या आहेत. आगामी काळात सर्वच्या सर्व 21 जागा आम्ही जिंकू असा दावाही बंटी भांगडीया यांनी केला आहे
महायुती सरकारमधील शिवसेना मंत्र्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री नऊ वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर होणार आहे. पक्षांतर्गत शिस्त, महायुतीमधील सध्याच्या घडामोडींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे हे मंत्र्यांना काही गोष्टी सांगणारही आहेत
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा दोषमुक्तीचा आर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर विष्णू चाटे व इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळ्यात यावे, दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज दिला होता. त्यावर मी हरकत घेऊन ते सर्वजण खटला लांबविण्यासाठी हे करत असल्याचे न्यायालच्या निदर्शनास आणून दिले, असे विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांनी सांगितले.
‘महाराष्ट्र नायक’ या गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या पुस्तकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. फडणवीस हे हुशार आणि प्रमाणिक राजकारणी आहेत. त्यांना भविष्यात केंद्रात महत्वाची जबाबदारी मिळू शकते, असा दावाही ठाकरेंकडून करण्यात आला आहे.
गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्र नायक या पुस्तकातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट आहे. त्यांचे कार्य आणि कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत, असा प्रश्न पडतो. फडणवीस यांच्या कामांचा झपाटा आणि उरक पाहिला की, मला माझ्या मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ आठवतो. फडणवीसांची ही गती माझ्या वयाचे होईपर्यंत अशीच राहू, अशा शुभेच्छाही पवार यांनी फडणवीसांना दिल्या आहेत.
संभाजी ब्रिगडचे कार्यकर्ते मुंबईत मंत्रालयात घुसले असून त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे. जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात वाद होता. त्या वादात मदत मिळावी, यासाठी संबंधित महिला ही किरण काळे यांच्या संपर्कात आली होती. पीडित महिलेला मदतीचे आमिष दाखवून शहरप्रमुख किरण काळे यांनी बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्य कारणामुळे पदाचा राजीनामा दिला आहे. धनखड यांचा उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. धनखड यांच्या राजीनाम्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भाष्य केले आहे. मोदी म्हणाले, जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती आणि इतर काही पदांच्या माध्यमातून देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यांना आरोग्यासाठी उत्तम शुभेच्छा.
रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विरोधकांच्या रडारवर आहेत. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्यावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाला कोकाटे उपस्थित होते, यावेळी हा प्रकार घडला. कोकाटे यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी वेळ नाही म्हणून आम्ही त्यांना रमी खेळण्यासाठी बोलावत होतो अशी प्रतिक्रिया यावी पत्ते उधळणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
एखादा माणूस मोठा झाला की आईच्या नावे शाळा,हॅास्पिटल काढतो. पण एका राज्यमंत्र्यांने आईच्या नावे डान्सबार काढलाय, असा घणाघात आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केला
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे परब म्हणाले.
जगदीश धनखड यांच्या राजीनाम्यामागे काहीतरी गुढ असावे, असा संशय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंद सामंत यांनी व्यक्त केला आहे. संसद भवन परिसरात ते माध्यमाशी बोलत होते.
माणिक कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केली आहे. कृषिमंत्री हा शेती आणि शेतकरी यांच्या बद्दल आस्था असणारा असावा, त्या प्रश्नांची जाण असणारा असावा आणि त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला असावा अशी साधारण जनतेची अपेक्षा असते. दुर्दैवाने महाराष्ट्राला जो कृषिमंत्री मिळालाय त्याची शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे हे याच्या आधी केलेल्या बेताल विधानावरून लक्षात येतच. शेतीचं ज्ञान त्यांचं त्यांना माहिती आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती किती आहे हे त्यांनी सभागृहात बसून जंगली रमी सारखा जुगार खेळून सिद्ध केलं आहे, असे सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं आहे.
आपल्या प्रकृतीचे कारण देत जगदीश धनखड यांनी सोमवारी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी कोण विराजमान होईल याची चर्चा सुरु झाली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींनी दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयाकडे सादर केला आहे. मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सर्वच आरोपींनी दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयाकडे सादर केले आहेत. सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्याला विरोध केला. आरोपींच्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांची गोंधळ केल्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आज दुपारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलवली आहे. पक्षसंघटना, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
ऑनलाइन रमी प्रकरणात दोषी आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्यातील कोणीही निवेदन करावं. त्या क्षणी न थांबता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांकडे मी माझा राजीनामा सादर करेन," असेही माणिकराव कोकाटे म्हणाले. "मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती, विधानसभा अध्यक्ष या सर्वांना लेखी पत्र देणार आहे, असे कोकाटे म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवर पोस्ट करत त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे महाराष्ट्राच्या उध्दाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे महाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा!, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
तसंच, सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र आणि सहकारी, जनतेचा आवाज बुलंद करणारे नेते, महाराष्ट्राच्या समृध्दीयात्रेत दमदार पावले टाकत सदैव पुढे असणारे मुख्यमंत्री, उत्तम प्रशासक, अर्थशास्त्र आणि कायद्याची जाण असलेलं बुध्दिमान तसेच ‘व्हीजनरी’ नेतृत्त्व. अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या आणि सकारात्मकतेचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या मित्रवर्य देवेंद्रजी यांना दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेत रमी खेळतानाच्या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, तो लांबला का ते माहिती नाही. ऑनलाईन रमी हा प्रकार तुम्हाला माहिती नाही का, तो खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट जोडावं लागतं. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लिकेशनला जोडलेलं नाही.
मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही, मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना मी कोर्टात खेचणार आहे. तर मी गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, तो दाखवला गेला नाही. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे स्पष्ट झाले असते. तर मी आता या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत मला रमी खेळता येत नाही असं स्पष्ट करत जर तो व्हिडिओ खरा असेल तर मी स्वत: राजीनामा देईन असं म्हटलं आहे. शिवाय हा छोटा प्रश्न असू त्यामध्ये राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पत्रकार परिषदेला सुरूवात झाली आहे. पत्रकार परिषदेला सुरूवात करण्यापुर्वी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा दिला. शिवाय मला रमी खेळताच येत नसल्याचंही ते यावेळी म्हणाले. शिवाय त्यांनी हा खूप लहान विषय असल्याचंही म्हटलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कराडला बेल मिळणार की आणखी जेलची हवा खावी लागणार याचा फैसला आज होणार आहे. कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जासह प्रॉपर्टी जप्तीच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रात महायुती सरकारची कामे प्रत्यक्षात आणण्यात तुम्ही प्रशंसनीय भूमिका बजावत आहात. मी तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो, अशा शब्दात अमित शहांनी अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मोदीजींच्या नेतृत्वात तुम्ही महाराष्ट्रात सार्वजनिक कल्याण आणि सांस्कृतिक वारशाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सतत प्रशंसनीय कार्य करत आहात. तसेच, गरीब, वंचित आणि शोषितांना पारदर्शक पद्धतीने मूलभूत सुविधा देऊन सार्वजनिक कल्याणाच्या मार्गावर दृढपणे वाटचाल करत आहात. गणपती बाप्पा तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य देवो, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्ये प्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आकाशदीप सिंग आणि अखिलेंद्र प्रताप सिंग या आरोपींनी विशेष मकोका न्यायालयाकडे जामीन मिळावा अशी मागणी केली होती. मात्र, त्यांचा हा जामीन अर्ज न्यायलयाने फेटाळला आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्सवर पोस्ट करत या शुभेच्छा दिल्या. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!"
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे केला जात आहे. अशातच आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात एकूण 9 अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पतीला न्याय मिळावा यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेत तपासाचा वेग वाढवल्याचं पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस असून ते आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कोन्सारी येथे लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) या स्टील प्रकल्पाची पायाभरणी त्यांच्या हस्ते केली जाणार आहे. त्यानंतर गडचिरोलीत 10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
पावसाळी अधिवेशना दरम्यान राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणावरून विरोधकांनीकोकाटे आणि सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे यांनी देखील कोकाटे यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. याच सर्व प्रकरणावर माणिकराव कोकाटे आज आपली भूमिका स्पष्ट करणार करणार आहेत. आज सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेणार असून यावेळी ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.