Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Politics Update : 'सरकारच्या हातात बंदुका- लाठी असेल, पण आमच्या हातात तिरंगा...'; उद्धव ठाकरे

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील आज 24 July 2026च्या दिवसभरातील सर्व राजकीय महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

सरकारनामा ब्युरो

'सरकारच्या हातात बंदुका, लाठी असेल पण आमच्या हातात तिरंगा...'; उद्धव ठाकरे 

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क परिसरात आंदोलनकर्त्या तरुणाईला मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, आपली ओळख विसरुन आपल्याला भीती दाखवून राज्य करत होते. आजपर्यंत त्यांनी हे दृश्य पाहणं गरजेचं आहे. ही 'जन की बात' दिल्लीला ऐकावी लागेल. दिल्लीमध्ये बेछूटपणे विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला झाला. सरकारच्या हातात बंदुका, लाठी असेल पण आमच्या हातात तिरंगा आहे. आम्ही तिरंगा घेऊन तुमच्यासमोर आहोत, बघू तिरंगा जिंकतो की तुमची हुकूमशाही जिंकते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

आदित्य ठाकरेंनी मुंबईतील आंदोलनातून थेट सीजेपीच्या अभिजित दिपकेंना लावला फोन...

मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनातूनच आदित्य ठाकरेंनी थेट कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला. तसेच कॉकरोच जनता पार्टी, सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून समर्थन दिल्याबद्दल अभिजित दिपके यानं ठाकरेंचे आभार मानले. यावेळी दिपके यांनी सीजेपी आणि विद्यार्थी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं सांगितलं. आदित्य ठाकरे यांनीही दिपके यांच्यासोबत संवाद साधताना राजीनामा घेऊनच व्यवस्था बदलायची आहे. हा नवा भारत आहे, झुकणार नसल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.

 काँग्रेसविरुद्ध भाजपही आक्रमक; घोषणाबाजी करत मोर्चा

देशभरात नीट पेपरफुटीवरुन केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात येत आहे. कॉकरोच जनता पार्टीने याबाबत आंदोलन सुरू केलं असून दिल्लीतील जंतर मंतरवर हे आंदोलन मोठं रुप घेत आहेत. देशभरातून आंदोलनास पाठिंबा वाढत असताना, राजकीय विरोधही या आंदोलनात सहभागी होताना दिसून येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधीशांविरुद्ध घोषणाबाजी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी, काँग्रेसविरुद्ध भाजपही आक्रमक झाली आहे. बेळगावमध्ये भाजपने राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी करत मोर्चा काढला होता. त्यावेळी, पोलिस आणि भाजप समर्थकांमध्ये चकमक उडाल्याचे दिसून आले.

नीट पेपरफुटीच्या मुद्यावरुन युवक आक्रमक

शिवाजी पार्क परिसरात शुक्रवारी नीट पेपरफुटीच्या मुद्यावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर जमली होती. तरुणांकडून तिरंगा हाती घेत राष्ट्रगीत गायन केलं. या प्रसंगी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शर्मिला ठाकरे, तुषार गांधी, अभिनेता अतुल कुलकर्णी सहभागी झाले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या फोनवरुन अभिजित दिपके यांनी मुंबईतील तरुणाईसोबत संवाद साधला.

अभिजित दीपके यांनी फोनवरून साधला तरूणाईशी संवाद

आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील आंदोलनातून दिल्लीत अभिजीत दीपके यांना फोन लावला. दीपके यांनी फोनवरून मुंबईतील तरूणाईशी संवाद साधला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नसल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

मुंबईत शिवाजी पार्कात कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ तरूणांचे आंदोलन

मुंबईत शिवाजी पार्कात कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ तरूणांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आमदार आदित्य ठाकरे आणि मनविसेचे नेते अमित ठाकरे सहभागी झाले आहे. आंदोलनात तरूणाईची मोठी गर्दी झाली आहे.

पुण्यात पोलिस चौकीसमोरच तरुणावर गोळीबार

पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार

पूर्व वैमन्यासातून पुण्यात तरुणावर गोळीबार

अवघ्या २० मिनिटात आरोपीला पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात

पुण्यातील घोरपडे पेठेत गोळीबार

आरोपींनी तीन राऊंड केले फायर, घटनेत तरुण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घटना. या घटनेमध्ये नूरु शेख हा तरुण घटनेत जखमी झाला आहे. सुजल सुनील परदेशी आणि त्याचे साथीदार यांनी घोरपडी पेठ येथे नूर शेख यावर हा गोळीबार केला.

जखमी ख्वाजा उद्दीन नाजीर शेख उर्फ नुरू शेख याला हॉस्पिटल येथे उपचार करणे दाखल केले आहे. त्याला पाठीत गोळी लागली असून त्याची प्रकृती ठीक आहे.

यातील हल्लेखोर सुजल सुनील परदेशी याला पळून जात असताना परदेशी याला पोलिस कर्मचारी इम्रान नदाफ यांनी ताब्यात घेण्यात आले असून इतर तीन तरुणांना सुद्धा खडक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झाड कोसळलं

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अचानक झाड कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत शासकीय आणि खाजगी अशा अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसून, प्रशासनाकडून झाड हटवण्याचे काम सुरू आहे.

संसदेत जंतर-मंतर आंदोलनाचे पडसाद! विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 5 व्या दिवशीही जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ पाहायला मिळालाय. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलयं.. कामकाज सुरू होताच विरोधकांनी जंतर-मंतरवरील आंदोलनावरून आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केलीये.

सोनिया गांधी यांचा लेखातून सरकारवर हल्लाबोल

सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाद्वारे देशातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केलं आहे... विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला असून, गेल्या काही वर्षात शिक्षणाचं बजेट घटल्याचा दावाही सोनिया गांधींनी केला आहे...

मला अटक केल्यास आंदोलन देशभर पेटणार, अभिजीत दिपके संतप्त 

अभिजीत दिपके यांनी CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "मला अटक केल्यास आंदोलन देशभर पेटणार," असा इशारा देत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

CJP देशव्यापी आंदोलनाचा जालन्यात एल्गार! विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा

CJP चं आज देशव्यापी आंदोलन असून, जालन्यात तरुणांनी भव्य मोर्चा काढलाय. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी जालन्यातील तरुणाई रस्त्यावर उतरलीये. शहरातील मस्तगड भागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झालेय.

मंत्रिमंडळाची बैठक सुरू, पेपरफुटीवर चर्चा

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत स्वतः पंतप्रधान उपस्थित असून पेपरफुटीच्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. परीक्षा प्रणाली, तसेच पेपर फुटीच्या शिक्षेबाबत या मंत्रिमंडळ बैठकीत जुन्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कठोर करण्यावरही चर्चा होऊ शकते.

मिरजेच्या पंचायत सभापती पदभार तात्पुरता स्नेहल मोरेंकडे

मिरज पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पद एवढी रद्द ठरवल्यानंतर सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्पुरता महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या स्नेहल मोरे यांच्याकडे कारभार दिला आहे.

abhijeet dipke : अभिजीत दीपके धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं. त्यांनी उपोषण सोडल्यानंतरही अभिजीत दीपके धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यातच आता थोड्यावेळातच केंद्र सरकार व सीजेपीच्या प्रतिनिधींची थोड्याच वेळात चर्चा, होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी आशुतोष रांका व सौरभ दास चर्चा करणार आहेत.

...तर विद्यार्थ्यांवर कारवाई होणार, दिल्ली विद्यापीठाचा इशारा

जंतर-मंतर येथे कोणत्याही बेकायदेशीर जमावात किंवा आंदोलनात सहभागी होऊ नका.अशा आंदोलनांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निर्बंध असल्याचे नमूद केले आहे. सहभागी झाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे ट्विट दिल्ली विद्यापीठाने केले आहे.

ठाकरे बंधुंच्या मोर्चात काँग्रेस सहभागी होण्याची शक्यता

नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 26 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर आता याच मोर्चामध्ये आता काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

...अन्यथा देशभरात हे आंदोलन मोठं होईलं - दीपके

अभिजीत दीपके यांनी सरकारला याआधी त्यांनी केलेल्या दोन चुकांची आठवण करून दिली. ते म्हणाले, "सरकारने सोनम सरांना इथून बळजबरीने नेलं ही पहिली चूक केली. त्यानंतर सरकारने लहान मुलींची डोकी फोडली, पुरूष पोलिसांनी मुलींची कपडे फाडून दुसरी चूक केली. मुलींना मारहाण केल्यानंतर हे देशभरात आंदोलन पोहोचलं. त्यानंतर आता आम्हाला अटक करून तिसरी चूक करू नका, अन्यथा देशभरात हे आंदोलन मोठं होईलं."

आता तिसरी चूक करू नका, अभिजीत दीपकेंचा सरकारला इशारा

कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी जंतरमंतरवरून सरकारला मोठा इशारा दिला. सरकारने आधीच दोन चुका केल्या आहेत. मात्र, आता तिसरी चूक करू नका अन्यथा संपूर्ण देशभरात हे आंदोलन आणखी मोठं होईलं, असा इशारा दीपके यांनी सरकारला दिला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत पेपरफुटीविरोधात कठोर कारवाईचे निर्णय घेतले जाणार - PM मोदी

जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाची धग दिवसेंदिवस देशभरात वाढत असल्याने अखेर सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि विरोधक केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. सरकारने आता पेपरफुटीविरोधात कठोर कायदा आणणार असल्याचं सांगितलं. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी मध्यरात्री एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, "मंत्रिमंडळ बैठकीत पेपरफुटीविरोधात अधिक कठोर कारवाईचे निर्णय घेतले जाणार आहेत." असं लिहिलं आहे.

CJP Abhijeet Dipke : धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार; अभिजीत दिपके यांचा केंद्राला इशारा

NEET पेपर लीक प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणांच्या मागणीसाठी सलग 26 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. परंतु अभिजीत दिपके यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत कॉकरोच जनता पार्टीचं जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन असंच सुरू राहील, असे म्हटले आहे. अभिजीत दिपकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. सोनम सर यांनी 26 दिवसांनंतर आपलं उपोषण मागे घेतलं आहे, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. सर, तुमच्या धैर्यासाठी आणि त्यागासाठी खूप खूप धन्यवाद, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.

Uttarakhand BTech Paper Leak : उत्तराखंडमधील टेक्निकल विद्यापीठात बीटेक थर्ड इयरचे दोन पेपर फुटले

एकीकडे नीट परीक्षेतील पेपरफुटीवरून राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनतापार्टीकडून तीव्र आंदोलन आणि देशभरात संतापाची लाट पसरली असतानाच दुसरीकडे शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटीचं सत्र सुरूच आहे. आता उत्तराखंडमधील टेक्निकल विद्यापीठात बीटेक थर्ड इयरचे दोन पेपर फुटले आहेत. परीक्षेपूर्वीच पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे लक्षात येताच परीक्षा रद्द करण्यात आली असून, या प्रकरणी एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे.

Ahilyanagar Update : भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत विसर्ग सुरू; भंडारदरा परिसरातील पर्यटनस्थळे बंद

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार आषाढ सरी बरसत आहेत. 11 टीएमसी क्षमतेच्या भंडारदरा धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू असल्याने, 90 टक्के पाणीसाठा स्थिर ठेऊन प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. गेल्या 24 तासात घाटघर परिसरात 300, तर रतनवाडी परिसरात 248 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगर दऱ्यांवरील धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. पाणलोट क्षेत्रात धो-धो पाऊस आणि वारे वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भंडारदरा परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.

CJP Protest : दिल्लीतील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष कारवाईच्या निषेधार्थ आज देशव्यापी निदर्शने

दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या क्राॅक्रोच जनता पक्ष आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता तीव्र स्वरूप धारण केले आहे. या आंदोलनाची व्याप्ती देशभर वाढविण्यासाठी आज देशव्यापी निदर्शनांची हाक दिली आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान युवकांच्या मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

Jalna Municipal Politics : महापौरांच्या शिस्तभंगाची नोटीस नगरसेवकांनी डस्टबिनमध्ये टाकली

जालन्याच्या महापौरांनी बजावलेली शिस्तभंगाची नोटीस अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांनी डस्टबिनमध्ये टाकली आहे. जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी महापौर वंदना मगरे यांनी भाजपच्या दोन, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या एका आणि एका अपक्ष नगरसेवकाला शिस्तभंगाची नोटीस बजावली होती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर महापौर वंदना मगरे यांनी बजावलेल्या शिस्तभंगाच्या नोटीसा रद्द केल्या आहेत.

PM Modi : पेपरफुटीप्रकरणी जलदगती न्यायालये स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा

नीट-यूजी परीक्षेछी प्रश्नपत्रिका फुटल्याने दिल्लीत विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पेपरफुटी प्रकरणांमध्ये जलदगतीने निर्णय होऊन, त्यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT