एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आल्याचा दावा वकिलांनी केला असून याआधी देखील त्यांना दोन ते तीन वेळा पोलिसांकडून ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा वकिलांनी केला आहे.
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून राज ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर आता शिवसेना-मनसे युती झाली अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, ही आनंदाची बाब असल्याचे म्हणत यात राजकीय पाहण्यासारखं काय आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. तर आमच्याही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा असून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं, यात राजकारण पाहणं योग्य नाही. पण महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे विधानसभेला जनतेनं दाखवून दिलं आहे. आताही महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल, असा टोला लगावला आहे.
खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने चार ही धरणांमध्ये 91 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान खडकवासला धरणातून 18 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पाणी मुठा नदीच्या पात्राबाहेर गेले आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने डेक्कन हद्दीतील नदी पात्रातील रस्त्यावर पाणी वाढलं असून वाहतुकीसाठी रस्ता बंद झाला आहे. दरम्यान रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या काही गाड्या या पाण्यात अडकल्या आहेत.
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई व महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे न्यायालयाने मोठा निर्णय घेतला असून प्रांजल खेवलकरसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यासह सचिवपदी विजय बराटे आणि इतर पदाधिकाऱ्यांही निवड बिनविरोध करण्यात आली आहे. आतापर्यंत प्रत्येक मैदानात केलेल्या चांगल्या कामगिरीची ही पोचपावती असून या संधीचं सोनं करणार, कुस्तीला गतवैभव मिळवून देणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय.
रोहिणी खडसे यांचा नवरा बोळ्याने दूध पित नाही. आपण लोकांना ज्ञान शिकवतोय आणि आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे, हे पाहिले पाहिजे अशी बोचरी टीका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. रोहिणी खडसे यांचा पीए पांडुरंग नापडे यांच्या पत्नीने माझ्याकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. त्यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी रोहिणी खडसे यांनी त्यांच्या पीएच्या पत्नीवर दबाव आणला होता, असा आरोपही चाकणकर यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना वाढदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. हे महाराष्ट्राच्या मनातले चित्र आहे, अशी चर्चा राज्यभरात सुरू आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे योग्य नाही, हे फार मोठे स्टेटमेंट होईल, अशी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आहे आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल असा टोलाही त्यांनी लगावला.
अशापद्धतीनं पत्र लिहून कोणीही वाद तयार करू नये, मंत्र्यांनी आपआपसात बोलावं, आणि त्यांना काही समस्या असतील तर त्या त्यांनी मला येऊन सांगाव्यात. म्हणजे त्यातील अडचणी आपल्याला दूर करता येतील. शेवटी राज्य मंत्री आणि कॅबिनेट मंत्री हे एकाच शासनाचे भाग असतात. सगळे अधिकार हे मंत्र्यांकडे असतात. मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात. त्यामुळे यामध्ये कुठलाही संभ्रम नाहीये, मात्र राज्य मंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही, असं मानणं ही चुकीचं आहे. राज्य मंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.
खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणी खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर अटकेत आहेत. त्यांना पुणे पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलं. या रेव्ह पार्टी प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी प्रांजल खेवलकर यांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. तर खेवलकर यांना कोठडी सुनावण्याची आवश्यकता नाही, असं मत त्यांच्या वकिलांनी मांडलं आहे. खेवलकर यांनी मी अमली पदार्थाचे सेवन केलेच नाही, असा न्यायालयात दावा केलाय.
योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे, टीका करून काम बंद करता येत नाही, राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं, दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणणार तर कसं होणार? योगेश कदम चिंता करायचं काम नाही, अख्खी शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
रोहिणी खडसे यांच्या नवऱ्याचा विषय आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. मला फक्त काळजी ससून रुग्णालयाची आहे. कारण मागच्या काळात जे काही घडलं आहे ते आपण पाहिलं आहे. रोहिणी खडसे सध्या पुण्याच्या दिशेने निघाल्या आहेत. आमचा पक्ष रोहिणी खडसे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
त्या दोनशे दिवसात मी दोन वेळा मरता-मरता राहिलोय. तुमच्या कृपेमुळे ही गोष्ट फक्त लहाने साहेबांना माहिती आहे. ज्या समाजात जन्माला आलो, त्याचा अभिमान निश्चित आहे. अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेंचा नंबर आठवतो, यापेक्षा दुसरं काय हवं? मंत्रिपदाला काय चाटायचं आहे का? असा सवाल माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी ठाणे येथील वंजारी समाजाच्या अधिवेशनात केला.
भारतीय जनता पार्टी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, दक्षिण पुणे जिल्हा, उत्तर पुणे जिल्हा अशा विविध विभागाच्या कोअर कमिटीची संघटनात्मक बैठक आज झाली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, समन्वय, आणि आगामी राजकीय दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली. भाजपाची कार्यसंस्कृती अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरील संघटन अधिक भक्कम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियात दिली आहे.
पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये आमदार एकनाथ खडसे यांचे जावई व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी खडसेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी त्यांच्या सहयोगी पक्षाच्या महिला अध्यक्षाने असे गिफ्ट देण्याची काय गरज होती? किमान सकाळच्या भोंग्याचा तरी विचार करायचा! असो, समाज सुधारणेची जबाबदारी सर्वांचीच आहे. पण त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते,असे संत परंपरा सांगते. ड्रग्जविरोधी मोहीम आणखी तीव्र करा,अशी आमची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विनम्र मागणी आहे, अशी पोस्ट वाघ यांनी सोशल मीडियात केली आहे.
उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा मोठे संकेत दिले आहेत. नेत्यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियात पोस्ट करत त्यांनी सगळे एकत्र! काहीच अडचण नाही!, असे स्पष्ट विधान केले आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू आगामी निवडणुकीत एकत्रित असतील, असे संकेत मानले जात आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियात महाराष्ट्र आज आनंदी आहे, अशी पोस्ट केली आहे.
मुंबई महानगरपलिकेतील मालाड पश्चिम येथील काँग्रेसच्या माजी नगरसेविका सलमा आलमेलकर तसेच मानखुर्द शिवाजी नगर येथील समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका आयेशा नूरजहान रफिक शेख यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
रोहित पवार मनाने भाजपमध्ये आहेत. ते फक्त शरीराने शरद पवारांसोबत आहे. असा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. 'रोहित पवार कोणत्या मंत्र्यांच्या संपर्कात तपासा' असं राणे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी मोठं विधान केले आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, 'झाली युती झाली... आपण जे म्हणता की या भेटी किती वाढल्या आहेत. दोन भाऊ एकत्र येतील की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. अनेकांच्या मनात संशय होता. या संशयाला पूर्णविराम मिळाला. दोन भाऊं एकत्र आले ही महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून आनंदाची गोष्ट आहे. कार्यकर्ते एकत्र येतील आम्ही ते करून. त्याची कुणी काळजी करू नये.'
उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त राज्यभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत.
पुण्यात रेव्ह पार्टीवर मारलेल्या पोलिसांच्या छापेमारीत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यावर खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. खडसे म्हणाले, हे होणारच होतं हे मला माहीत आहे. मात्र मला या कारवाई संदर्भात अजूनही पूर्ण माहिती मिळालेली नाही. मला पूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी स्पष्ट बोलणाऱ्यांपैकी असल्याने त्यावेळी बोलेन असं त्यांनी सांगितलं. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला. मात्र, यामध्ये राजकीय कारवाईचा वास येत आहे का? अशी विचारणा केली असता खडसे यांनी शक्यता नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले.
पुण्यातील खराडी भागातील उच्चभ्रू सोसायटीत सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर मारलेल्या पोलिसांच्या छापेमारीत रोहिणी खडसे यांचे पती व एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. हाऊस पार्टीच्या नावाखाली या रेव्ह पार्टीमध्ये अंमली पदार्थ, हुक्का, दारूचे सेवन सुरु होते. यात सोसायटीतील प्रांजल खेवलकरसह 3 महिला आणि दोन पुरुषांचाही सहभाग होता.
राज्य सरकारकडे जवळपास 90 हजार कोटींची थकबाकी प्रलंबित असून ती मिळवण्यासाठी कंत्राटदारांनी आता न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. या थकबाकीची लवकर परतफेड व्हावी या मागणीसाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. नुकतंच सांगलीतील तरूण कंत्राटदार हर्षल पाटील याने बिल थकल्यामुळे आपलं आयुष्य संपवलं आहे. स्वत:च्या पैशांनी काम करून नंतर बिल निघत नाहीत त्यामुळे आता कंत्राटदार मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांच्याच भीतीचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आता कंत्राटदारांचे पैसे लवकरात लवकर मिळावे यासाठी कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापेमारी केली आहे. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन केलं जात होतं. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू हे रेव्ह पार्टी सुरू असल्याचं आता उघडकीस आलं आहे. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून पोलिसांनी छापेमारीत अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त केली आहे.
मी कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन. आता 50 हजार मिळत असतील तर मी ती रक्कम 1 लाख रुपये करेन, असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात अडथळे येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते कागल तालुक्यातील वंदूर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळ त्यांनी शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान देण्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार म्हणून काही शेतकरी कर्ज फेडत नाहीत. त्यामुळे जिल्हा बँका अडचणीत येतात, असंही ते म्हणाले.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे हे आज भाजप प्रवेश करणार आहेत. नाशिकमध्ये आज भाजपकडून या प्रवेश सोहळ्याचे जंगी आयोजन करण्यात आलं आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज खेडमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन केलं जाणार आहे. खेड मधील सांस्कृतिक केंद्राचा पडदा तब्बल सोळा वर्षांनी उघडणार आहे. त्यामुळे नाट्य प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी एकनाथ शिंदेंसह, पालक मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम आणि नेते रामदास कदम देखील राहणार उपस्थित राहणार आहेत.
परळीतील उद्योजक महादेव मुंडे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय द्यावा यासाठी काल कन्हेरवाडी आणि भोपळा ग्रामस्थांकडून रास्ता रोको करण्यात आला होता. यावेळी सुमारे चार तास परळी-अंबाजोगाई महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी आता ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड आणि कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांच्यासह रास्ता 70 जणांविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दौंडमध्ये मोठा धक्का बसला आहे. कारण माजी आमदार रमेश थोरात हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दौंडचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात हे 1 ऑगस्टला वरवंड या ठिकाणी अजितदादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत.
जेष्ठ नेते शरद पवार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची शक्यता आहे. तसंच कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत या भेटीत दबाव देखील आणण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.