काँग्रेस कार्या लयावर हल्ला करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात मुंबई पोलीस कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 12 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यात भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाचा समावेश आहे.
मुंबईत भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. किल्ला कोर्टसमोर असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयावर युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. यावेळी भाजप युवा मोर्चाचे व काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने राडा झाला. यावेळी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयाची भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.
विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागून महिना होत आहे, तरीही अद्यापही ईव्हीएचे कवित्व अद्यापही संपलेले नाही. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात यावरुन मतभेद सुरुच आहे. हे सरकार जनतेने नव्हे तर ईव्हीएमचे सरकार असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फडणवीसांनी निशाणा साधला. "मला सर्वात जास्त शरद पवार साहेबांचे आश्चर्य वाटले. आतापर्यंत पवार साहेबांनी कधी ईव्हीएमवर वक्तव्य केले नव्हते.परंतु आता त्यांनी ईव्हीएमबाबत धक्कादायक वक्तव्य केले. ते म्हणाले ईव्हीएममध्ये अशी सेटींग केली आहे की छोटी राज्य आम्ही जिंकू, मोठी राज्य तुम्हाला मिळणार. मग कर्नाटक काय छोटे राज्य आहे का? अशी विचारणा फडणवीसांनी केली.
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं या हिवाळी अधिवेशनात पहिलं भाषण झालं. त्यांनी ईव्हीएम, खातेवाटप, फेक नरेटिव्ह यावरुन तुफान टोलेबाजी केली. ईव्हीएमबाबत मागील निवडणुकीची आकडेवारी सांगत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. मला विधानसभा निवडणुकीत घेरण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो,असे ठामपणे फडणवीसांनी विरोधकांना सांगितले.
अजित पवार एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री होणार. ते राज्याचे पर्मनंट उपमुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला घवघवीत यश दिले. आमच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहिली. महायुती सरकारने सुरु केलेली कोणतीही योजना बंद करणार नाही. मला सातत्याने टार्गेट करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. त्याचा फायदा मला या निवडणुकीत झाला. त्याबद्दल विरोधकांचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना आभार मानले.
शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका न्यायालयाने रद्द केली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा निवडणुकीत वायकर विरुद्ध कीर्तिकर असा सामना रंगला होता. यात वायकर यांनी ४८ मतांनी विजय मिळवला आहे. कीर्तिकर यांनी फेरमतमोजणीची मागणी याचिकेत केली होती. ही याचिका फेटाळण्यात आली आहे. 333 मते ही बोगस असल्याचा दावा कीर्तिकरांनी केला होता. हा दावा न्यायालयाने फेटाळला.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कलम ८८ अन्वये कारवाई दोषी आढळल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह इतर तीन जणांचे साखर कारखान्यावरील संचालकपद रद्द होणार आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी यासंदर्भात नोटीस बजावली आहे. जिल्हा बँकेच्या प्रकरणातील कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांची इतर सहकारी संस्थांवरील संचालक पदेही धोक्यात आली आहेत. रणजितसिंह मोहितेंना प्रादेशिक साखर सहसंचालकांचीही नोटीस पाठवली आहे. रणजीतसिंह मोहितेंना भाजपने पक्षशिस्तभंगाची नोटीस बजावल्यानंतर आता साखर सहसंचालकांनी त्यांना दणका दिला आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात सहकार विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्यावर ठपका ठेवला असल्याने त्यांना त्यांच्या शंकर सहकारी साखर कारखाना संचालक पदावरून का अपात्र ठरवू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार राम शिंदे यांची निवड झाली. सभागृहात एकमताने राम शिंदे यांची निवड करण्यात आली. यापूर्वी प्रा. ना. स. फरांदे यांनी हे पद भुषवले आहे. फरांदे यांच्यानंतर सभापतीपद भूषवणारे शिंदे हे दुसरे प्राध्यापक ठरले आहेत. कर्जत -जामखेड मतदारसंघातून त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत भाषण करताना अपमान केल्याचा आरोप विरोधीपक्षांनी केला आहे. या विरोधक आक्रमक झाले आहेत. नागपुरात हिवाळी अधिववेशात त्याचे पडसाद उमटायला सुरवात झाली आहे. विधीमंडळ परिसरात काँग्रेसकडून शहांच्या विरोधात आंदोलनास प्रारंभ झाला आहे. शहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करीत आहेत. निळ्या टोप्या परिधान करुन काँग्रेसच्या नेत्यांनी शहांच्या विरोधात घोषणाबाजी केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात विरोधक या मुद्यांवरुन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत.
नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. अद्यापही महायुती सरकारचे खातेवाटप झालेले नाही. खाते वाटप अधिवेशनात होणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना महायुतीच्या खातेवाटपाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. आज खातेवाटप होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची यादी तयार असून आज ही यादी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ही यादी राज्यपालांकडे पाठणार आहेत.
लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संविधानावर बुधवारी चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा अपमान केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. आजही संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात विरोधक या मुद्यांवरुन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. काँग्रेसकडून गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ मुंबईकडून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सांयकाळी घडली. या दुर्घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या परिवारास प्रत्येकी दोन लाखांची रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्याचे मोदींनी जाहीर केले आहे. या घटनेबाबत मोदींनी x वरुन दु:ख व्यक्त केले आहे.
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस, विधान परिषदेच्या अध्यक्षपदाची आज निवड होणार आहे. भाजपकडून राम कदम यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या रेशीमबागेतील मुख्य कार्यालयात भेट दिली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघाच्या बौद्धीकला दांडी मारली आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे हे एकमेव आमदार यावेळी उपस्थित होते.हिवाळी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या आमदारांना आपल्या कार्यालयात निमंत्रित करण्याची संघाची परंपरा आहे. आज महायुतीच्या आमदारांचे रेशीमबागेत बौद्धीक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.