गेल्या अर्ध्या तासापासून मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. सखल भाग असल्यानं अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून अंधेरी सबवे बाहेर बॅरिकेट लावून बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सबवे बंद झाल्यानं वाहन चालकांनी गोखले पुलाचा वापर करावा अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी दुसऱ्या दिवशीही गिरवले मराठीचे धडे. कालपासून शंकराचार्यांनी मराठी शिकण्यासाठी सुरुवात केली. दररोज अर्धा तास शंकराचार्य मराठी शिकण्यासाठी वेळ देत आहेत. बोरिवलीच्या कोरा केंद्र येथे शंकराचार्य हे दोन महिन्यासाठी वास्तव्यास आहेत. दोन महिने ते दररोज तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी शिकत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे इगतपुरीत दाखल झाले आहेत. यावेळी ढोल ताशाच्या गजरात राज ठाकरे यांचं कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये स्वागत करण्यात आलं. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पासून कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये तीन दिवसांचं कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे.
चड्डी-बनियन गॅंग अथवा चड्डी-टॉवेल गॅंगचे व्हिडिओ महाराष्ट्रभर फिरत आहेत. मंत्र्यांच्या बेडरूमधील व्हिडिओ बाहेर येत आहेत. सरकारतर्फे दोन दोन कपडे तरी द्या, सर्व उघडे फिरत आहेत. मंत्री उघडे नागडे फिरत आहेत, काय चाललंय महाराष्ट्रात. बेडरूममधील व्हिडिओ बाहेर कसा आला. बेडरूममधील व्हिडिओ बाहेर येतात, म्हणजे मंत्री सुरक्षित नाहीत. बेडरुममध्ये सूट घालून झोपा, असं सांगितलेलं नाही. तुमची यंत्रणा बेडरुमपर्यंत पोखरली गेली आहे. मंत्रीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनता कशी सुरक्षित राहील, असा सवाल अनिल परब यांनी विधान परिषदेत विचारला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे आज विधानसभेत भाषण झाले. त्यात त्यांनी संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे नाव न घेता चड्डी बनियान गॅंग म्हणत कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे काय करतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्यांनी सहनशीलता दाखवली आहे. पण चड्डी, बनियान गॅंगवर आता कठोर कारवाई करण्याची गरज आहे अशी मागणी ठाकरेंनी केली. त्यावर शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी आक्षेप घेत हिंमत असेल तर त्यांनी चड्डी-बनियना गॅंग कोण, त्यांची नावे घ्यावीत, असे चॅलेंज दिले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना शाई फासून धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणात शिवधर्म प्रतिष्ठानचे दीपक काटे याच्यासह सात जणांच्या विरूद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सात जणांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अटक होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना पोलिस अधीक्षकांसमोर उभे करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाचे बंधपत्र लिहून घेऊन त्यांना सोडून देण्यात येणार आहे, असे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी सांगितले.
भाजपच्या नागपूरमधील माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडीची (ड्रग्ज) विक्री करताना पोलिसांनी अटक केली आहे. चारचाकी वाहनातून एमडीची तस्करी करणाऱ्या माजी नगरसेवकाचा मुलगा संकेत अजय बुग्गेवार याला अटक केली आहे. अजय बुग्गेवार हे काही वर्षांपूर्वी भाजपचे नगरसेवक होते. त्याचे तिकीट कापल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. पराभूत झाल्यानंतर अजय बुग्गेवार परत भाजपत परतले आहेत.
Raj Thackeray : राज ठाकरेंविरोधात तीन वकिलांची पोलिस महासंचालकांकडे तक्रार
मुंबईतील वरळीत पाच जुलै रोजी झालेल्या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्वव ठाकरे यांनी भाषण केले होते. या मेळाव्यात राज ठाकरेंच्या विरोधात तीन वकिलांनी पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वरळीतील विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप या वकिलांनी त्यांच्यावर केला आहे. नित्यानंद शर्मा, आशिष रॉय, पंकजकुमार मिश्रा अशी या तीन वकिलांची नावे आहेत. राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात परप्रांतीयांवर हल्ले वाढले आहेत. या हल्ल्याचे सूत्रधार आणि दोषींवर ‘रासुका’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही या वकिलांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.