Pune News: "आम्ही विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आणि शिकवण्यासाठी शिक्षक झालो आहोत, कागदपत्रे आणि ऑनलाइन डेटा भरण्यासाठी नाही! आम्हाला फक्त शिकवू द्या!" अशा तीव्र शब्दांत महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
सध्या राज्यातील तब्बल ७.४३ लाख प्राथमिक शिक्षक प्रशासकीय व अशैक्षणिक कामांच्या प्रचंड दबावाखाली अडकले असून, या समस्येतून मार्ग काढण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती'ने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या शिक्षकांना त्यांच्या मूळ शैक्षणिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवून अनेक बिगर-शैक्षणिक कामांमध्ये गुंतवले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने:
१.शासकीय पोर्टल: विविध ऑनलाइन पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरणे, नोंदणी करणे आणि दिलेली उद्दिष्टे (टार्गेट) पूर्ण करण्याचा दबाव.
२.विविध सर्वेक्षणे: शासकीय योजना, लोकसंख्या, घरगुती व सामाजिक सर्वेक्षणांची जबाबदारी.
३.निवडणूक व इतर कामे: मतदार याद्या तयार करणे, जनगणना, विविध शासकीय मोहिमा आणि निवडणुकांची कर्तव्ये.
४.अहवाल व बैठका: दैनिक, साप्ताहिक व मासिक अहवाल तयार करणे, बैठकांना उपस्थित राहणे आणि विविध प्रपत्रे भरणे.
५.इतर जबाबदाऱ्या: मध्यान्ह भोजन, शालेय साहित्य वाटप, आधार अपडेट, आरोग्य मोहिमा आणि ग्रामसभा.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंदी शिक्षण देणे, त्यांचा सर्वांगीण विकास घडवणे आणि शालेय वातावरणात नैतिक मूल्ये रुजवणे हे शिक्षकांचे प्राथमिक कर्तव्य आहे. परंतु, सातत्याने वाढणाऱ्या अशैक्षणिक कामांमुळे गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत आहे.
अशैक्षणिक व बिगर-शैक्षणिक कामांतून शिक्षकांची तात्काळ पूर्ण मुक्तता करण्यात यावी.
ऑनलाइन नोंदी आणि डेटा संकलनासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
अनावश्यक सर्वेक्षणे, अहवाल आणि बैठकांचा त्रास थांबवावा.
शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा उभारण्यात यावी.
शिक्षक हे राष्ट्रनिर्माते असून त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ, सुविधा आणि स्वातंत्र्य मिळणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे, शिक्षकांनी अशैक्षणिक कामात अडकून न पडता आमच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे," अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.
शिक्षकांचा सन्मान राखून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.