Rajysabha Election : भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 4 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, नागपूरच्या माजी महापौर माया ईवनाते आणि माजी आमदार रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यातील आठवले आणि तावडे यांची उमेदवारी अपेक्षित होती, मात्र इवनाते आणि वडकुते यांची उमेदवारी धक्कातंत्र मानले जात आहे.
भाजपकडून राज्यसभेसाठी 25 नावांची यादी कोअर कमिटीच्या बैठकीत अंतिम करण्यात आली होती. स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली होती. यात नवनीत राणा, हंसराज अहिर, अशोक नेते, रावसाहेब दानवे, भागवत कराड, विजया राहटकर, प्रितम मुंडे, धैर्यशील पाटील, विनय सहस्त्रबुद्धे, भारती पवार, दिलीप कांबळे, अमर साबळे, कुणाल पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर अशा अनेकांची नावे होती. पण या सर्व नावांना मागे टाकत ईवनाते आणि वडकुते यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे
माया ईवनाते या नागपूरच्या माजी महापौर असून सध्या विद्यमान नगरसेविकाही आहेत. तसेच राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या त्या सदस्याही आहेत. त्यांच्यारुपाने भाजपने आदिवासी समाजातील महिलेला राज्यसभेत पाठविले आहे. तर वडकुते हे हिंगोलीतील असून विधान परिषदेचे माजी आमदार आहे. ते भाजपचे हिंगोली लोकसभा निवडणूक प्रमुख होते. भाजपने त्यांच्यारुपाने धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्षही आहेत.
आठवले, तावडेंची अपेक्षित नावे :
विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा मागील काही निवडणुकांमध्ये सातत्याने होती. मात्र, त्यावेळी त्यांना संधी मिळाली आहे. पक्षसंघटनेत मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर तावडेंनी आपला ठसा उमटविला आहे. सदस्य नोंदणीची विक्रमी कामगिरी करत त्यांनी आधीच पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर ते प्रभारी असताना बिहार, हरियाणामध्ये पक्षाला मिळालेला ऐतिहासिक विजयही तावडेंना राज्यसभेची उमेदवारी मिळण्यास कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे बिहारमधूनच आहेत.
मागील काही दिवस रामदास आठवले यांच्या उमेदवारीबाबत मात्र उलटसुलट चर्चा होत्या. त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत संभ्रम व्यक्त केला जात होता. मात्र, त्यांच्या मागे उभी असलेली आंबेडकरी चळवळीची ताकद पाहता भाजपने त्यांना सलग तिसऱ्यांदा संधी देण्यात मागेपुढे पाहिले नाही. आठवलेंच्या रुपाने भाजपने बौद्ध समाजाला जवळ करण्याचे राजकारण सुरू केले होते. त्याला आता यश मिळताना दिसत असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.