ज्याने स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकाचा रक्तपात केला त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. याच औरंगजेबाने आपला महापराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराज यांचा अनन्वित छळ करून खून केला, त्यांच्या अंगावरील भळभळणाऱ्या त्या जखमा आणि वेदनांनी संपूर्ण देशासह तमाम महाराष्ट्र आजही विव्हळत आहे. त्यामुळं औरंगजेब कुणासाठी पूजनीय असला तरी आमच्यासाठी मात्र तो स्वराज्याचा, महाराष्ट्राचा, देशाचा आणि मराठी माणसाचा कायम नंबर एकचा शत्रू राहील. इतिहासाचं पुस्तक न चाळता औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांचं मस्तक तपासण्याची गरज आहे. असं म्हणत रोहित पवारांनी अबू आझमींवर टीका केली आहे.
तानाजी सावंत राज्याचे आरोग्य मंत्री असताना काही निर्णय घेतले होते. त्यांनी दिलेल्या काही आदेशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे तानाजी सावंत देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सॊमवारी गेले होते. त्यांना फडणवीसांच्या बंगल्याबाहेर तीन मिनिटे ताटकळत उभं राहावं लागलं. ते बंगल्यात गेल्यानंतर लगेच बाहेर पडले. त्यांची फडणवीसांसोबत भेट होऊ शकली नाही. दरम्यान, तानाजी सावंत आणि देवेंद्र फडणवीस यांची उद्या भेटीची शक्यता आहे.
आमदार रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होताना पाहायला मिळतील, असा दावा मावळचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील नेते सुनील शेळके यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात रोहित पवार महायुतीमध्ये सहभागी होणार का ? याची उत्सुकता लागली आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणीच्या छेडछाड करणारे मुख्य संशयित अनिकेत भोई, अनुज पाटील आणि चेतन भोई या तिघांना न्यायालयाने पाच मार्चपर्यंत 5 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. यातील एका अल्पवयीन संशयिताला बालसुधार गृहात रवानगी केली आहे.
जितेंद्र आव्हाड हातकड्या घालून आल्याने विधानभवनात त्याची चांगलीच चर्चा रंगली. यावर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाचा उल्लेख करत चित्रा वाघ यांनी म्हटले की, 'देवाभाऊ, यांचे डोहाळे पुरवा. देवाभाऊ, यांचे डोहाळे पुरवाचं.'
राज्यात गुन्हेगारी वाढलीय, महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. तशी सरकारची आकडेवारी सांगते. या आणि अन्य गोष्टींबाबत चर्चेसाठी वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ द्यायला तयार नाहीत, अशी तक्रार खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
अंजली दमानिया सिलेक्टिव्ह राजकीय प्रकरणात लक्ष घालतात. एक प्रकरण वाजल्यावर त्यांचे वर्षभर घर चालतं. वर्षभर फॉरेन टूरला निघून जातात आणि प्रॉपर्टी जमा करतात. ओबीसी, दलितांच्या प्रकरणावर अंजली दमानियांना वेळ नसतो, असा आरोप ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला.
मंत्री धनंजय मुंडे आता सत्र न्यायालयात धाव घेणार आहे. करूणा मुंडे प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेकडून आव्हान देण्यात येणार असल्याचे सांगितलं जातंय.
विधानसभा निवडणूक प्रचारात जाहीर केल्याप्रमाणे शेतकर्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी ही मिळालीच पाहिजे. शेतमालाला हमीभाव तातडीने मिळाला पाहिजे. अशा विविध मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाने निदर्शने केली. जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी आंदोलनाचे नेतत्व केले.
विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २७ मार्चला मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या जागा रिक्त झाल्या आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मुंबईत आज आंबेडकरी संघटनांकडून आंदोलन केले जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. विधीमंडळाच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना आझाद मैदान परिसरात पोलिसांनी अडवले आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडसह त्याच्या अन्य साथीदारांना अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. त्यांनी याची कबुली दिली आहे. पण या घटनेनंतर मुंडे यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनीची मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याची मागणी केली.
खासदार सुप्रिया सुळे स्वारगेट बसस्थानकात दाखल झाल्या आहेत. स्थानकातील बसमध्ये तरुणीवर बलात्काराची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी दत्तात्रेय गाडे या आरोपीला अटकही करण्यात आले आहे. आज सुप्रिया सुळे यांच्याकडून स्थानकाला भेट देण्यात आली असून महिला सुरक्षा व इतर सुविधांना आढावा त्यांच्याकडून घेतला जात आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज विधानसभेत जवळपास ६ हजार ४८६ कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या. यामध्ये सर्वात जास्त ग्रामविकास विभागाला (३७५२ कोटी) तर त्यानंतर उद्योग ऊर्जा व कामगार विभागाला 1688 कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर अनुक्रमे, नगर विकास विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सहकार व पणन आणि वस्त्रोद्योग यासह विविध विभागांसाठी पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या आहेत.
औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं आहे. तसंच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती असं वादग्रस्त वर्तव्य आझमी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या 'अ' गटाच्या परीक्षांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलाआहे. या परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भातच आता राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 'अ' गटाच्या परीक्षा 25 फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात आली होती. मात्र 19 फेब्रुवारीलाच या परीक्षेचे पेपर लीक झाले झाल्याचा आरोप मनेसने केला आहे. शिवाय कोट्यावधी रुपयाला हे पेपर परीक्षा देणाऱ्या अभियंत्यांना विकण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. तर हा गैरप्रकार मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि कुशल धुरी यांनी उघडकीस आणला होता.
8 मार्चला महिला दिनानिमित्त महिलांसाठी या सभागृहात विशेष सत्र आयोजित केलं जाणार आहे. 8 तारखेला शनिवार असताना देखील हे सत्र आयोजित केलं आहे. तसंच सर्वात लाडकी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हफ्ताचे पैसे महिलादिनाच्या पुर्वसंध्येला सर्व महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या, पैसे देण्याची प्रक्रिया 5 ते 6 तारखेपासून सुरू केली जाईल आणि 8 तारखेआधी सर्व पैसे जमा होतील. तर मार्च महिन्याचा हफ्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात दिला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महाविकास आघाडीत सध्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभा अध्यक्षांना ठाकरेंची शिवसेना आजच पत्र देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यास मान्यता दिल्यास विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार असल्याचं सांगितलं जात असून काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोसवारपासून (ता.03) सुरूवात झाली. यावेळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी आपल्या अभिभाषणात राज्य सरकारने जनतेसाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती सांगितली. त्यामध्ये सौर ऊर्जामार्फत शेतकऱ्यांना पंप पुरवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच 2 लाखांहून अधिक घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारली असून 12 लाखांहून अधिक घरे बांधण्याचा संकल्प आहे. तसंच अटल भूजल योजना सरकार राबविण्यात येत आहे. 95 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेतून मदत केली जात आहे. तर 18 हजार अंगणवाडी सेविकांची भरती करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कळावे म्हणून प्रत्येक अंगणवाडीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
अधिवेशनात उपमुखमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. यावर येत्या सहा तारखेला चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सभापती राहुल नार्वेकर यांनी दिली
बीड येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणी त्यांच्या पत्नीने आजपासून उपोषण सुरु केले आहे. आरोपांनी कठोर शिक्षा द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Maharashtra Budget Session 2025 live: सुरेश धस-रोहित पवार यांच्यात चर्चा
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या भाषणाला सुरवात झाली आहे. दुसरीकडे विधिमंडळ आवारात विरोधीपक्ष धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. भाजप आमदार सुरेश धस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात चर्चा झाली.
पुणे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर सरकारचा धाक राहिला नसल्याचे दिसते. स्वारगेट एसटी स्थानकातील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच चाकणमध्ये चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार झाला आहे, त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. हल्लात डीसीपी शिवाजी पवार यांच्यासह काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे बेड्या घालून विधिमंडळात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर सरकारने घाला घातला आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. अमेरिकेत भारतात जे हाल होत आहेत, त्यांच्यावर अत्याचार होत आहे, त्याचे प्रतिक म्हणून बेड्या घातल्या असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
Mumbai: राज्याच्या अधिवेशनाला सुरवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधीमंडळाच्या आवारात दाखल झाले आहेत. लवकरच सभागृहात अधिवेशनाला सुरवात होईल.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार आले आहे. सरकार सत्तेत येऊन जवळपास 3 महिने झाले आहेत. मात्र विरोधी महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळालेले नाही. त्यामुळे विधीमंडळाचे पहिलेच अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण आता मविआला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शिवसेना ठाकरे गटाला ते मिळण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावाची चर्चा होत आहे.
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. पण यंदा महायुतीचे पहिलेच अधिवेशन विरोधकांसाठी सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्याची संधी आहे. विरोधकांची सख्या कमी असून महिला सुरक्षा, मंत्री माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे या मुद्द्यावरून घमासान होण्याची शक्यता आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे मोबाईल महत्त्वाचा पुरावा ठरला असून माहिती समोर येत आहे. मात्र विष्णू चाटे याचा मोबाईल तपास यंत्रणेला अद्याप सापडलेला नाही. पण वाल्मिक कराडच्या तीन महागड्या आयफोनमधून तपास यंत्रणेला मिळाले आहेत. ज्यातून फोनमधील डेटा आणि कॉल डिटेल्स, संभाषणातील आवाजाचे नमुने तपास यंत्रणेच्या हाताला लागले आहेत.
छत्रपती संभाजी महाराज याच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास अनस कुरेशीला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. अनस कुरेशी याने आपल्या व्हॉटस् अॅप स्टेटस औरंगजेबचे समर्थन केले होते. तर हिंदु धर्मिकांच्या भावना दुखावतील या हेतूने पोस्ट केली होती. या प्रकरणी काळाचौकीत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणात आरोपीला अटक न झाल्याने पोलिसांना अल्टीमेटम देण्यात आला होता. मात्र पोलिसांना अद्याप आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही. यामुळे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी या सोमवारपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या परिवारासह आमरण उपोषण करणार आहेत. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला मसाजोगच्या गावकऱ्यांचा पाठिंबा आहे. भाजपा आमदार सुरेश धस आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांची परळी येथील निवासस्थानी भेट घेतली होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पोलिस स्टेशन समोर असलेल्या चिमूर-पिंपळनेरी रोड समोरील झुडपात एक मृत अर्भक सापडले आहे. हे मृत अर्भक कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत सापडल्याने आता एकच खळबळ उडाली आहे. आता हे अर्भक कोठून आले याचा तपास घेत असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Raksha Khadse News : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची छेडछाड काढणाऱ्या टवाळखुरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून यात मुख्य आरोपी अनिकेत भोई याचा समावेश आहे.
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले. अजूनही बीडमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मस्साजोग गावचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय आंदोलनं करत आहेत. अशातच आता या प्रकरणात मकोका लावण्यात आलेल्या एका आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
Maharashtra Politics News : सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जाणार आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून शक्ती विधेयक मंजूर होणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या तिढ्यावरही मार्ग निघणार का? भरत गोगावलेंची इच्छा आता पूर्ण होणार का? ते लवकरच स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.