महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दिवाळीनिमित्त सलग सुट्ट्या मिळणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीचे नियोजन करणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना या वेळापत्रकाची मदत होणार आहे.
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, दिवाळीची सुट्टी सोमवार, 2 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. ही सुट्टी शनिवार, 14 नोव्हेंबर 2026 पर्यंत राहील. त्यानंतर सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 रोजी शाळा पुन्हा सुरू होतील.
या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दिवाळीच्या काळात सलग सुट्ट्यांचा लाभ घेता येणार आहे. मात्र, संबंधित परिपत्रक कोणत्या जिल्ह्यातील शाळांसाठी लागू आहे, याची खात्री पालकांनी आपल्या शाळेकडून करून घ्यावी.
माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षाची विभागणी करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र सोमवार, 15 जून 2026 रोजी सुरू झाले असून शनिवार, 31 ऑक्टोबर 2026 रोजी संपणार आहे.
दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसरे सत्र सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होईल. हे सत्र शनिवार, 1 मे 2027 पर्यंत चालणार असल्याचे परिपत्रकात नमूद आहे.