Maharashtra Teacher Recruitment 2026 AI
महाराष्ट्र

Teacher Recruitment : रखडलेल्या शिक्षक भरतीला वेग, दुसरा टप्पा ऑक्टोबरपासून; 5 हजार शिक्षकांची पदे भरणार

Maharashtra Teacher Recruitment Second Phase : राज्यात रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला वेग आला असून दुसऱ्या टप्प्यात 5 हजार शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात रखडलेल्या शिक्षक भरतीला आता वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील ‘मुलाखतीशिवाय’ प्रकारातील शिक्षक भरतीनंतर आता ‘मुलाखतीसह’ होणारी तब्बल १० हजार ३२८ पदांची भरती प्रक्रिया सप्टेंबर अखेर पूर्ण होईल. याच प्रक्रियेतील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये राबविण्यात येणार आहे. याद्वारे जवळपास पाच हजार शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. यामुळे हजारो भावी शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षण सेवक आणि शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी मे-जून २०२५ मध्ये ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५’ (टेट) झाली. यामध्ये पात्र ठरलेल्या आणि स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या एक लाख ७० हजार १०८ उमेदवारांमधून सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. या उमेदवारांना भरतीसाठी ‘मुलाखतीशिवाय’ आणि ‘मुलाखतीसह’ या दोन प्रकारांतील जाहिराती पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त झाल्या आहेत.

‘मुलाखतीशिवाय’ प्रकारातील गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. यात जवळपास जिल्हा परिषद, नगरपालिका/नगरपरिषद, महापालिका, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा, शासकीय विद्यानिकेतन, खासगी शैक्षणिक संस्थांमधील १९ हजार ७५४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली.

त्या पदसंख्येसाठी १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली. या टप्प्यातील समांतर आरक्षणात उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही पदे त्या-त्या संवर्गातील इतर उमेदवारांसाठी ‘कन्व्हर्टेड राउंड’द्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ही प्रक्रिया सप्टेंबरच्या पहिल्या काही दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर या टप्प्यातील मुलाखतीसह पदभरतीची प्रक्रिया सुरू होईल.

पहिल्या टप्प्यात मुलाखतीसह शिक्षक भरतीसाठी १० हजार ३२८ पदसंख्या आहे. या प्रक्रियेसाठी शासन निर्णयानुसार ४५ दिवसांचा कालावधी असणार आहे. यात संबंधित उमेदवारांना मुलाखतीला बोलाविणे, एका उमेदवाराला तीन ठिकाणी मुलाखत देण्याची संधी, शिफारस झालेल्यांना नियुक्तीचे आदेश, नियुक्ती देऊनही रुजू न झाल्यास प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना संधी देणे, ही प्रक्रिया राबविली जाईल. साधारणतः सप्टेंबरअखेरपर्यंत मुलाखतीसह शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे शिक्षण उपसंचालक राजेश शिंदे यांनी सांगितले.

शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. सप्टेंबरअखेरपासून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीच्या प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू होणे अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात खासगी अनुदानित शाळांची बिंदूनामावली पूर्ण होऊ शकली नाही, त्या शाळांमधील शिक्षक भरतीची पदे दुसऱ्या टप्प्यात भरली जाणार आहेत. या टप्प्यात कनिष्ठ महाविद्यालयांसह धाराशिव, पालघर यांसह काही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील जवळपास पाच हजार शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात साधारणतः पाच हजार शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीसह भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांवरील भरती पूर्ण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरतीची प्रक्रिया साधारणतः ऑक्टोबरमध्ये राबविण्यात येईल.’’
सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT