भाजप नेते नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी, ठाकरे यांच्याकडे एवढा पैसा येतो कोठून असा सवाल केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. ही टीका त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमांदरम्यान केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठीच आम्ही बसलो आहोत असाही दावा त्यांनी केला आहे.
धनंजय मुंडेंना संपवून त्यांच्याजागी आमदारकीचे स्वप्न वाल्मिक कराड पाहात असल्याचा दावा विजयसिंह बांगर यांनी केला होता. त्यापेक्षा आणखी मोठा दावा बांगर यांनी केला असून राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा डाव गोट्या गित्तेचा होता. त्यासाठी त्याच्यासह तांदळे नामक युवकाने मुंबईत जाऊन रेकी केली होती, असा खळबळजनक दावा बांगर याने केला आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
कोल्हापुरच्या नांदणी मठातून महादेवी हत्तीणीचे वनतारा येथे स्थलांतर करण्यात आले आहे. यामुळे येथे जनतेचा उद्रेक झाला आहे. तर तिला परत आणण्यासाठी अख्खं कोल्हापूर एकवटलं आहे. अशातच पेटा (PETA) या विख्यात प्राणीमित्र संघटनेकडून तिला वनतारा येथे स्थलांतरीत करण्यामागचा धक्कादायक दावा केला आहे. पेटाने या हत्तीणीचा वापर व्यापारी तत्त्वावर तर मोहरमसह अन्य सार्वजनिक मिरवणुकांमध्ये केला जात होता. तर तिला भीक मागण्यासाठी देखील नेले जात होते, असा आरोप केला आहे. तसेच तिच्या सोंडेवर लहान मुलांना बसवण्यात येत होते. तिला नियंत्रीत करण्यासाठी धातूच्या अंकुशाचा वापर केला जात होता, असा दावाही केला आहे.
मंत्री आपल्या भाषणामध्ये कधीकधी गमतीने देखील बोलतात, प्रत्येक गोष्टीचा आपण बाऊ करु लागलो तर हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काही स्टेटमेंट महत्त्वाचे असतात तर काही चुकीची असतात, असे म्हणत त्यांनी संजय शिरसाट, मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या टीकेवर भाष्य केले.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टाने निर्दोषमुक्त केले आहे. या संदर्भात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सगळे निर्दोष सुटत आहेत तर मग दोषी कोण? असा सवाल केला आहे. इतक्या वर्षात दोषी कोण ? हे जर त्यांना कळत नसेल तर हे यंत्रणांचे अपयश नाही का ? हे बॉम्बस्फोट आपोआप झाले का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
माझ्यावर आरोप करताना विचार करा. माझं नाव घेतल्या शिवाय त्यांना झोप लागत नाही. मला हलक्यात घेतलं पण मी हलका नाही. त्यामुळं तुमचं तक्त पालटल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. गळती थांबवण्यासाठी कुठं कुठं ठिगळ लावणार,असा टोला देखील शिंदेंनी लगावला.
'कश्मीर फाईल्स' सारखाच मालेगाव फाईल्स हा सिनेमाही झाला पाहिजे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी आज केली आहे. पुण्यात मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेले कर्नल पुरोहित यांची निर्दोष सुटका झाल्यानंतर पुण्यात आज त्यांच्या घरी जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनीही त्यांचं स्वागत केलं.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे परभणीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाबाजानी दुर्रानी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. ते येत्या 7 तारखेला मुंबईत काँग्रेस पक्षात ते प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे. दुर्राणी यांच्या समर्थकांकडून 7 तारखेला काँग्रेस पक्षप्रवेश होणार असल्याचे बॅनर्स सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
संजय शिरसाट यांनी पैशाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करत हॅप्पी फ्रेंडशिप डे..असे दोस्त असताना… म्हणत डिवचलं आहे. बरं, आता रम्मी खेळणाऱ्यांना क्रीडा खाते मिळतं, युती धर्माच्या हतबलतेमुळे, तर ह्यांना अर्थ खाते मिळणारच, असेही म्हटले. म्हणजे, संजय शिरसाट यांनी पैशासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे आता त्यांची अर्थखात्यावर वर्णी लागणार का, असेच आदित्य यांनी सूचवले आहे.
विधानसभा निवडणुकीत माझ्या तीन सभा गुहागरमध्ये झाल्या असत्या तर भास्कर जाधव यांचा पराभव निश्चित होता. पण आमचा एक माणूस तेथून हलायला तयार नव्हता. सभा लावायला सांगितली तरी तो हालत नव्हता, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा माणूस नक्की कोण होता, असा सवाल उपस्थित होत आहे.
सोलापुरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या युवा सेनेच्या प्रमुख 21 पदाधिकाऱ्यांनी आज (ता. 03 ऑगस्ट) राजीनामा दिला आहे. सापूर्वी संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी, तर शनिवारी (ता. 02ऑगस्ट) सोलापूर शहरातील 11 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. प्रत्येक आमदाराला मी विनंती करतो, तुम्ही माझ्याकडे या. पाच, दहा, पंधरा कोटींचं काम असले तरी मागा. नाही दिलं नावाचा संजय शिरसाट नाही. आपल्या बापाचं काय चाललंय. सरकारचा पैसा वापराचाय, एवढी अक्कल आपण ठेवायची, असे विधान शिरसाट यांनी केले आहे.
दोन महिने आधीच हॉटेल बंद केले होते आणि दीड महिन्यानंतर अनिल परब यांनी हॉटेलच विषय विधान परिषदेत मांडला. या हॉटेलचा आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांचा दुरान्वये संबंध नाही. त्यांचा राजीनामा देण्याचा काय संबंध आहे. एखादी व्यक्ती व्यवसाय करू शकत नाही का. अनिल परब यांनी नियमबाह्य पद्धतीने हा विषय विधीमंडळात काढला. त्यांना राजीनामा पहिजे म्हणून राजीनामा द्या, हे कसं शक्य आहे. मंत्रिपद असंच मिळतं का? तुमच्या नशिबात मंत्रिपद नाही, असे रामदास कदमांनी अनिल परब यांना ठणकावले.
बीडमधील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे लिफ्टमधून जात होते. त्यावेळी पहिल्या मजल्यावरून ती लिफ्ट थेट जमिनीवर आदळली. लिफ्टचे दरवाजे फोडून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये कोणीही जखमी झालेली नाही, अशी माहिती आहे.
बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनर्पडतालणी मोहिमेअंतर्गत तब्बल ६५ लाख नावे वगळण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने तात्पुरती मतदार यादी जाहीर केली आहे. त्यावरून विरोधी पक्षांकडून आरोप केले जात आहे. मात्र, तीन दिवस झाले तरी अद्याप एकाही राजकीय पक्षाकडून एकही तक्रार किंवा हरकत नोंदविण्यात आली नसल्याचे आयोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?, असे विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपरोधिक टीका केली आहे. त्यांनी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत सोशल मीडियात पोस्ट करून म्हटले आहे की, हेडमास्तर नुसतीच गुळगुळीत समज देण्यामध्ये व्यस्त आहे. वेळीच कान पिळले असते तर विद्यार्थी इतका बेताल झाला नसता. अशा वाह्यात आणि उनाड विद्यार्थ्याला रिस्टीकेट का केला जात नाही. हेडमास्तरला शाळा बंद पडण्याची भीती वाटते का? की विद्यार्थीच हेडमास्तरला ब्लॅकमेल करतोय?
सरपंच संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष सूरज पाटील यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. त्याचप्रमाणे पाटील यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातील सावंगा-शिवा ग्रामपंचायतच्या सरपंच भाग्यश्री भाजीखाये यांच्यासह सदस्य भूषण लांजेवार, प्रतिभा पांडे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला केल्याची माहिती बावनकुळेंनी दिली आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार आरोपी गोट्या गित्ते यांने आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेत त्यांनी धमकी दिली होती. या प्रकरणात आता आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत मी धमक्यांना घाबरत नाही, असे ठणकावले आहे.
कल्याणातील सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी रविवारी भाजपात प्रवेश केला. यामुळे कल्याण मध्ये भाजपचे ताकद वाढल्याचे बोलले जात आहे.
महादेव मुंडे प्रकरणातील मुख्य आरोपी, मकोकाचा फरार आरोपी गोट्या गीते ८-९ मिनिटांचा व्हिडिओ काढून जितेंद्र आव्हाड साहेबांना धमक्या देतो, एवढी हिम्मत या गुंडांमध्ये येते कुठून? आपला गृहविभागा काय करतोय? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी करत गृहमंत्र्यांनी उत्तर देण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील कोथरुड येथे पोलीसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला 'व्हॉट्सॲप'वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहा ऑगस्टपासून दिल्ली दौऱ्यावर असणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा तीन दिवसांचा असणार आहे. दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत देखील उद्धव ठाकरे सहभागी होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वर्धा रोडवरील घर बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी दोणारा व्यक्तीला सिव्हिल लाइन इथून पोलिसांनी अटक केली आहे. ही व्यक्ती मानसिक तणावात होता, असे प्राथमिक चौकशी समोर आलं आहे. पोलिसांनी गडकरी यांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांचा आज मुंबईत साखरपुडा होत आहे. यानिमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब मुंबईत एकत्र आलं आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार आणि पवार सर्व सदस्य उपस्थित आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील साखर घोटाळ्याविरोधात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची 'ईडी'कडे तक्रार केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांनी 100 कोटींचा घोटाळा केला असून त्यावर गुन्हे दाखल झालेत. याची 'ईडी'मार्फत चौकशी करण्यासाठी तक्रार दिली आहे. मंगळवारी मी पुन्हा एक स्मरणपत्र 'ईडी'ला देणार आहे. त्यानंतर कारवाई झाली नाही, तर उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
खासगी क्लासमध्ये बेंचवर बसण्यावरून झालेल्या वादातून एका शाळकरी मुलाची हत्या झाली. नाशिकच्या सातपूर भागात ही धक्कादायक घटना घडली. ज्ञानगंगा क्लासमधील अन् दहावीत शिकणाऱ्या यशराज गांगुर्डे या मुलाची हत्या झाली. या हत्येप्रकरणी 2 विधी संघर्षात बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, गुन्हा दाखल केला आहे.
बनावट अपंग प्रमाणपत्र बनवून संजय गांधी निराधार योजना व अपंगांना मिळणाऱ्या इतर योजनांना लाभ घेऊन सरकारची फसवणूक केल्याचा आरोपावरून राहुरी पोलिसांनी ताज निसार पठाण व रुबिना ताज पठाण या पती-पत्नीला अटक केली. या पती-पत्नीला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागाची जीवनरेखा असणारे भंडारदरा धरण पुढील वर्षी शंभर वर्षांचे होत आहे. या धरणाचा शताब्दी महोत्सव राज्य सरकार साजरा करणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भंडारदरा धरण शताब्दी महोत्सव समिती स्थापन केली आहे. यासाठीचा अध्यादेश 1 ऑगस्ट काढला आहे.
सक्तवसुली संचालनालयाने ओडिशास्थित एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक केली. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहाला दिलेल्या कथित 68 कोटींच्या हमीचाही समावेश आहे. याप्रकरणी 'ईडी'ने केलेली ही पहिली कारवाई आहे. भुवनेश्वरस्थित 'बिस्वाल ट्रेडलिंक' या कंपनीविरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून कारवाई सुरू केली. यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ सारथी बिस्वाल यांनी भुवनेश्वरमधून आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल. सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे. भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते. संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
वसई विरार शहर महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवारआणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांना सोमवारी ईडीच्या मुंबईतील वरळी ऑफिसमध्ये हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. हे समन्स गेल्या आठवड्यात पवार यांच्या शासकीय निवासस्थानासह त्यांच्या संबंधित एकूण 12 ठिकाणी ईडीने टाकलेल्या छाप्यांनंतर बजावण्यात आले आहेत.
माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे एवढा पैसा येतो तरी कुठून? त्यांची उत्पन्नाची साधनं काय आहेत? जनतेने हे जाणून घ्यायला हवं, ज्यांच्याकडे कोणताही प्रशासनाचा अनुभव नाही, अशा लोकांनी महाराष्ट्र चालवला होता, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
वाल्मिक कराडची दोन मुलं आणि गोट्या गित्तेने महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यापासून गोट्या गित्ते फरार झाला आहे. या प्रकरणी पोलीस गोट्याचा शोध घेत आहेत. मात्र, तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. अशातच आता त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली आहे. व्हिडिओत त्याने म्हटलं आहे की, माझे वाल्मिक कराडसोबत संबध असल्याचं बोललं जात आहे. मी त्यांचा कार्यकर्ता आहे. दुसरा माझा काही संबंध नाही. पण आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनावणे हे आरोप करत आहेत. तसेच अंजली दमानिया यांनी देखील आरोप केलेत. कोणच्याही मुलींना उचलून नेतो. वंजारी असूनसुद्धा मला जितेंद्र आव्हाडची लाज वाटते. फुकट आरोप माझ्यावर करु नका. जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाहीत. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या आरोपींना फाशी भेटलीच पाहिजे. विनाकारण वाल्किम कराड यांच्या मागे हे जोडलं जात आहे. तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे. जितेंद्र आव्हाड तुम्ही धनंजय मुंडेंना टार्गेट करु नका. आमचे दैवत वाल्मिक कराड हे गोरगरीब जनतेची काम करतात. परळीत येऊन कोणालाही विचारा वाल्किम कराड कोण आहे ते. त्यांना सर्वजण दैवत मानत आहेत, असंही गित्ते व्हिडिओत म्हणत आहेत.
नांदणी जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी नादणीकरांनी आता आपला मोर्चा आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर वळवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राजकारण विरहित सर्वपक्षीयांचा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत आहे. यासाठी रविवारी पहाटे पाच वाजता नांदणी येथून हा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला आहे. जवळपास 45 किलोमीटरचा प्रवास करून हा महामोर्चा सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापुरातील जिल्हाधिकार्यालयावर धडकणार आहे. या पदयात्रेत हजारो नागरिक भल्या पहाटे सहभागी झाले आहेत.
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याच प्रकरणाचा तपासासाठी पंकज कुमावत आज बीडमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे.
अकोला शहरातील निमवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी भाषणात बोलताना ते म्हणाले, आपल्या भागातील वसतिगृहासाठी निधीची मागणी करा. वसतिगृहाला पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी लागत असेल तरी तो मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातायं?, असं वक्तव्य त्यांनी केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पनवेलमधील लेडीज बारचा उल्लेख केला होता. शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात डान्स बार असून यामुळे तिथली तरूण पीढी बरबाद होत असल्याचंही त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. राज यांनी पनवेलमधील डान्स बारवर टीका केल्यानंतर स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील नाईट राईड डान्स बारची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.