राज्यात सध्या 15 ऑगस्ट रोजी मटण मास विक्रीवर बंदीवरून राजकारण तापलेलं आहे. अशातच सांगली महापालिकेनंही 15 ऑगस्ट रोजी मटण मास विक्रीवर बंदी घातल्याचा आदेश काढला आहे. यामुळे राज्यभर असा आदेश काढणाऱ्या महापालिकेच वाढ झाली आहे. हा आदेश महापालिका आरोग्य विभागाकडून काढण्यात आला आहे.
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी भाजपने मत चोरी केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर निवडणूक आयोगाने त्यांना शपथपत्रासह तक्रार करण्यास सांगितले आहे. यावरून महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. तर महासचिव अभिजित सपकाळ यांनी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्यावतीने सुमारे 44 लाख मतदार बोगस असल्याचे पुरावे मुख्य निवडणूक आयुक्तांना दिले होते. त्याचे काय केले असा सवाल कराताना आयोगाला आता शपथपत्र मागण्याचा अधिकार नसल्याचे म्हटलं आहे.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पण 15 ऑगस्टला होणाऱ्या झेंडा वंदनासाठी मान्यवरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. रायगडच्या झेंडा वंदनाची जबाबदारी पुन्हा एकदा अदिती तटकरेंवर देण्यात आल्याने पुन्हा वाद सुरू झाला आहे. यावरून शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी, झेंडा वंदनासाठी अदिती तटकरेंच नाव जरी जाहीर झालं असलं तरी भरतशेठच रायगडचे पालकमंत्री असणार असे वक्तव्य केलं आहे. त्यांनी असे वक्तव्य करत खासदार सुनील तटकरेंना डिवचलं आहे.
मुंबई महापालिकेने दादर तसेच इतर ठिकाणी असलेले कबुतरखाने बंद केले आहेत. हे प्रकण न्यायालयापर्यंत पोहोचलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडे दिवसातील काही ठराविक वेळ कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. याच मागणीबाबत उच्च न्यायालयानं आपला यापूर्वीचाच निर्णय कायम ठेवला असून तुर्तास कबुतरखान्यांवरील बंदीही कायम ठेवली आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकाचे माजी आयुक्त अनिल पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 7 ऑगस्ट तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे व बनावट कंपन्यांमध्ये गैरव्यवहारातील रक्कम वळते केल्याचा आरोप आहे. आता त्यांना बुधवारी (ता.13) ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. सांगली काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह बुधवारी(ता.13) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे त्यांनी भाजपात प्रवेश पार पडला.
दौंडमधील एका कला केंद्रात गोळीबार झाला होता. हा गोळीबार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या आमदाराच्या भावाने केल्याचे समोर आले होते. त्यानंतर शंकर मांडेकर यांच्यावर टीका करण्यात येत होती. याबद्दल आता बोलताना शंकर मांडेकर यांना अश्रू अनावर झाले. आमदार मांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मांडेकर यांनी वारकरी समाजाची माफी देखील मागितली.
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वारज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्या आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे. वीस ते पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रतिभा शिंदे यांनी दिली आहे.
राज्यात एकीकडे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार यावरून देखील नाराजीनाट्य रंगल्याच्या चर्चा आहे. अशातच राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिकचे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची संधी न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात होतं. तर मंत्री भुजबळ यांना गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याबाबत सूचित करण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी मंत्री भुजबळांनी नकारघंटा लावण्याने त्यांच्या ऐवजी आता मंत्री मंगलप्रभात लोढा हे स्वातंत्र्यदिनी गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहेत. तसे शासनाकडून नव्याने परिपत्रक जारी करण्यात आले आहे
मराठा समाजाचा मोर्चा 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे आणि सगेसोयरे अध्यादेश लागू करावा, या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचे समाजाला आवाहन केले आहे. सध्या ते मराठवाड्यात संवाद दौरा करत आहेत. आंदोलनाच्या काळात राज्यात दंगल भडकवण्याचा डाव असल्याचे ते म्हणाले. मला याची कुणकुण लागल्याचे त्यांनी सांगितले. परभणीत माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत इशारा दिला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनी नागरिकांना काय खायचं किंवा न खायचं, हे ठरवण्याचा हक्क स्वतःचा असल्याचं स्पष्ट केलं आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी या बाबत केलेला हस्तक्षेप अन्याय्य असल्याचं त्यांनी म्हटलं. “असा हुकूम नागरिक मान्य करणार नाहीत,” असं ट्विट करून आदित्य ठाकरे यांनी प्रशासनावर टीका केली. त्यांच्या या भूमिकेने सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व वैयक्तिक निवडीच्या अधिकारावर नव्याने वादंग पेटला आहे.
कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसने आज जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे थोरात यांनी सांगितले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी काँग्रेसने शासनाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गावर 23 ते 29 ऑगस्टदरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी लागू करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांची मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत केवळ प्रवासी वाहने, आपत्कालीन सेवा व आवश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने यांना परवानगी देण्यात येणार आहे. वाहतूक विभागाने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईतील कबुतरखान्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई हायकोर्टात कबुतरखान्यांसंदर्भात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. विशेषतः दादरमधील कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठी एकीकरण समितीने या विषयावर आक्रमक भूमिका घेतली असून, आरोग्य धोक्यात घालणाऱ्या अशा ठिकाणांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि रखडलेल्या कामांविरोधात कुडाळ हुमरमळा येथे याठीकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन करत महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महामार्गावर रांगोळी काढून आणि दुधाचा अभिषेक करून निषेध नोंदवला. समृद्धी महामार्ग पूर्ण झाला, मात्र मुंबई-गोवा महामार्ग अनेक वर्षांपासून रखडला असून चाकरमान्यांना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. गणेश चतुर्थीपूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांवरही आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 15 ऑगस्ट रोजी महापालिका क्षेत्रात चिकन-मटणची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. मात्र, या निर्णयामुळे आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच आता कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ नाशिक, मालेगाव, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, इचलकरंजी या महापालिकांनीही चिकन-मटण विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
दादर येथील कबुतरखाना बंद करावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितेने आज आंदोलन केलं आहे. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आता पोलिसांकडून त्यांची धरपकड सुरू आहे.
शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे निकष पावसाबाबत लोकांचे अंदाज बदलावे त्याप्रमाणे बदलत आहेत. पण त्यामुळे चांगल्या हसत्या-खेळत्या घरांमध्ये सासू-सुना, जावा-जावा, ननंद-जाऊ यांच्यात भांडणं लागली आहेत. ही भांडणं आजकाल विकोपाला जाऊ लागली आहेत. यामुळे अनेक घरांची शांतता बिघडली आहे. शासनाने अक्षरशः घराघरात भांडणं लावली असं म्हणता येईल. आता शासनानेच ही भांडणं सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सरसकट पात्र महिलांना या योजनेचा लाभ द्यावा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले आहे.
15 ऑगस्टला महापालिकांकडून मांस,मटण विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केल आहे. शिवाजी महाराज, मवाळे वरणभात खाऊन युद्ध लढत नव्हते. श्रीखंड पुरी खाऊन नाही लढता येत. तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करत आहात ना मर्द करत आहातस हे फतवे मागे घ्या असे संजय राऊत म्हणाले.
भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, भाजपा कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड साहेबांची गाडी अडवून दंगामस्ती केली, काल भाजप आमदाराने जयंत पाटील साहेबांवर पातळी सोडून टीका केली, या गोष्टी योग्य आहेत का? महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभतात का, याचा विचार भाजप नेतृत्वाने करायला हवा. आम्ही शांत बसतो, याचा कोणीही वेगळा अर्थ घेऊ नये. भाजपा नेतृत्व आपल्या कार्यकर्त्यांना आणि बेभान नेत्यांना समज देईल, ही अपेक्षा!
धनंजय मुंडे हे मंत्रिपद जाऊन देखील सरकारी बंगल्यात राहत आहेत. मुंबईत आपले घर नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. मात्र, गिरगाव चौपाटीजवळ वीरभवन येथील 22 मजली इमारतीमध्ये तब्बल त्यांचा16 कोटींचा प्लॅट असल्याचा समोर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, या दौऱ्यात भारतावर अमेरिकेने लादलेला टॅरिफवर तोडगा काढण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ते डोनाल्ड ट्रम्प यांना देखील भेटण्याची शक्यता आहे.
वाळवा तालुक्यात अजित पवार आणि जयंत पाटील पहिल्यांचा एका व्यासपीठावर येणार आहेत. इस्लामपूरमधील विधी महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी दोन्ही नेते एकत्र येतील. रोहित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना जामीन भेटावा यासाठी वकिलांकडून पुणे न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर आज दुपारी तीन वाजता सुनावाणी होणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्टला चिकन मटण विक्रीला बंदी केली आहे. त्याला काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी विरोध केला आहे. ते म्हणाले, वाह रे मुख्य मुद्द्यांकडून भरकटवण्यासाठीच आहे. रस्ते मोडकळीस, वाहतूक कोंडी, प्रदूषण वाढतंय… पण महापालिकेला चिंता कशाची तर १५ ऑगस्टला लोकांनी काय खावं ? या महापालिकेने त्या दिवशी मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, हे आता अती होत आहे. नागपूर, कल्याण-डोंबिवली, मालेगाव महापालिकांचा हा निर्णय म्हणजे विकासकामं विसरून ‘मेन्यू मॅनेजमेंट’कडे झेप आहे. असं असले तरी लोकांच्या स्वयंपाक घरात घुसण्या ऐवजी महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील कामे करावीत, हा तुघलकी निर्णय मागे घ्या.
तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात हे राज्य सरकार आहे. हा आमच्या संस्कृतीवर आणि आमच्या श्रद्धेवर घाला आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर,नुसते मंदिर नसून लाखो करोडो भक्तांच्या आस्थेचे प्रतीक आहे, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गाभार पाडण्यास विरोध केला. त्यांनी मंदिराला भेट देत भाविकांमध्ये याबाबत जनजागृती केली. तसे तुळजाभवानी मातेचे दर्शन देखील घेतले.
माजी आमदार, प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आठ वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना तीन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच हजार रुपये दंड देखील ठोठावला आहे. कडू यांनी 2018 मध्ये एका सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी मानले आहे. तसेच सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करणे धमकावणे या प्रकरणी दंड आणि तीन महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. दरम्यान, कोर्टाने बच्चू कडूंना जामीन मंजूर केला आहे.
घरात पैसे सापडल्याने अडचणीत आलेले न्यायमुर्ती यशवंत वर्मा यांची त्रिसदस्यी समिती चौकशी करणार आहे. या समितीमधील सदस्य न्यायमूर्ती असतील. या चौकशी संदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निर्देश दिले आहेत. या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार, न्या. मनिंदर मोहन आणि ज्येष्ठ वकील बी व्ही आचार्य यांचा समावेश असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.