Mahayuti Politics  Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti News : महायुतीमध्ये मिठाचा खडा; दोन आमदारांची एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका

Bjp Vs Ncp News : अजित पवार गटाचे आमदार आणि भाजप आमदार यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेनंतर महायुतीमधील दोन घटक पक्षात मात्र आता मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.

Sachin Waghmare

Akola News : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच महायुतीमधील घटक पक्षांत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची चढाओढ लागली आहे. महायुतीमधील भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये गेल्या दोन दिवसापासून चांगलीच जुंपली आहे.

महायुतीमधील तीन पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यातच अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि भाजपचे आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेनंतर महायुतीमधील दोन घटक पक्षात मात्र आता मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे. (Mahayuti News)

महायुतीमधील दोन दिवसाचा घटनाक्रम पहिला तर अंतर्गत धुसफूस असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील आंबेगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने ती जागा आम्हाला सोडावी, अशी मागणी केली. त्यामुळे, महायुतीमधील तीन पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे दिसत आहे. त्यातच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कोटी करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी उत्तर देत असतात. त्यातून, ते अनेकदा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरही हल्लाबोल करतात. भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार मिटकरी यांनी सवाल विचारताच भाजपचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी मिटकरींवर शेलक्या शब्दांत टीका केली.

नाशिकच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवेळी त्यांच्या ताफ्याला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. त्यावरुन संतापलेल्या अमोल मिटकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या या कृतीवरुन थेट देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला होता. यावर पुण्यातील भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी आक्रमक होत अमोल मिटकरीवर शेलक्या शब्दांत टीका केली होती.

मुळीक यांनी एकेरी व शेलक्या शब्दांमध्ये मिटकरी यांना टार्गेट केले होते. त्यामुळे, मिटकरी यांनीही त्याच पद्धतीने मुळीक यांच्यावर प्रहार केला आहे. त्यामुळे दोघातील वाद चांगलाच पेटला आहे.

मुळीक यांच्या टीकेला अमोल मिटकरींनी एकेरी भाषेतच उत्तर देत मुळीकांवर जोरदार प्रतिहल्ला केला आहे. देवेंद्रजींना खुश करण्यासाठी तो माझ्यावर एकेरी भाषेत सरकला, माझ्यावर एकेरी टीका करणाऱ्या मुळीक यांची लायकी काय?, असा सवाल मिटकरी यांनी केला. त्यासोबतच मुळीकांसारख्या वळवळणाऱ्या मंडळींचे थोबाड बंद करावे, आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला एकेरी भाषेत बोलू नये, असेही मिटकरी म्हणाले.

'ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? देवेंद्रजींना खुलासा मागण्याची? शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार,' अशी टीका मुळीक यांनी केली होती. यावर अमोल मिटकरी यांनी मुळीक वळवळ करु नको, थोबाड बंद कर, असे म्हणत पलटवार केला आहे.

येत्या काळात या दोघांतील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व वादाबाबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका महायुतीला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे या वादावर पडदा टाकण्यासाठी महायुतीकडून काय पावले उचलली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT