Mumbai News : मराठा आरक्षणाचा हक्क छातीठोकपणे सांगत मुंबईच्या दिशेने मराठा बांधव निघाले आहेत. ठामपणे उभे राहून आरक्षणाचा लढा लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचा मोर्चा उद्या (मंगळवारी) पुण्याच्या वेशीवर येईल. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाबाबत कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक निर्णय घेऊ शकतात. कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षणप्रश्नी सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. मुंबईत हा मोर्चा धडकी घेण्यापूर्वीच राज्य सरकारला याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून काळजी घेतली जात आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठपणा सोहळ्याचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम झाला असल्याने आता मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारला सोडवावा लागणार आहे. या कार्यक्रमामुळे राज्य सरकारला याकडे काहीसे लक्ष देता आले नव्हते.
प्राण प्रतिष्ठपणा सोहळ्याचा कार्यक्रम संपल्यानंतर राज्य सरकार आता अलर्ट मोडवर दिसत आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadanvis) व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. या तीन जणांच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनोज जरांगे यांनी केलेल्या मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांवर मुख्यमंत्री शिंदे मुंबईत मंगळवारी विविध तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Edited By Sachin Waghmare)