Manoj Jarange Patil appeals to the government, urging officials to speed up Kunbi certificate distribution for Maratha community applicants. Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange : मराठ्यांनो, कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्ज करा; फडणवीस-विखेंनीही अधिकाऱ्यांना आदेश द्यावे, जरांगेंचं आवाहन

Manoj Jarange News :मराठा आरक्षणासाठी कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप मंद असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला असून, फडणवीस आणि विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना तातडीने आदेश द्यावेत, असे आवाहन केले.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठीची मोठी लढाई जिंकल्याचा दावा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केला जातोय. मुंबईत धडक दिल्यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आणि त्याचा जीआरही काढला. यावरून मराठा समाजातील नेत्यांमध्ये मतमतांतरे असल्याचे समोर आले होते. कोणी हा जीआर नाही तर माहिती पत्रक असल्याचे म्हटले तर सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला.

हैदराबाद गॅझेट लागू करून जीआर काढल्यापासून नोंदीनूसार कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाचे प्रमाण अत्यअल्प आहे. प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याबाबतही मराठा समाजामध्ये उदासीनता असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 'एबीपी माझा' वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात अधिकारी दिरंगाई करत असल्याचा आरोप केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाला आणि अधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप तातडीने करण्यासंदर्भात आदेश द्यावेत, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली आहे. हैदराबाद गॅझेटिअरनुसार नोंदी आढळतील, त्या मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मोठे आंदोलन केले होते.

गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यातील केवळ 98 जणांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहे. आठ जिल्ह्यातून केवळ 594 अर्ज आले आहेत. पण, त्यातील केवळ 98 जणांना अर्ज प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये 14 अर्ज प्राप्त झाले असून कोणताही अर्ज मान्य झाला नाही, तर परभणीत 445 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी 47 अर्ज मान्य ठरले आहेत. जालना जिल्ह्यामध्ये 78 अर्ज प्राप्त झाले असून आठ अर्ज मान्य ठरले, हिंगोलीमध्ये पाच अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी तीन अर्ज मान्य झाले.

नांदेडमध्ये पाच अर्ज प्राप्त झाले आणि सर्व पाच अर्ज मान्य ठरले, तर बीडमध्ये 12 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी नऊ अर्ज मान्य झाले. लातूरमध्येही 12 अर्ज प्राप्त झाले असून नऊ अर्ज मान्य ठरले, तर धाराशिवमध्ये तेरा अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी चार अर्ज मान्य ठरले आहे. सरकारने दिरंगाई करू नये. वेळेत प्रमाणपत्र द्यावे. मराठा समाजाने देखील अर्ज दाखल करायला हवेत. तरच आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अधिकाऱ्यांना तातडीने आदेश द्यावेत. ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. शिंदे समितीला आदेश द्या की, त्यांनी नोंदी तत्काळ शोधाव्या. हैदराबाद गॅझेटिअरच्या जीआरप्रमाणे मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली. मराठा समाजाला मी आवाहन करत आहे की, लेकरा बाळांच्या आयुष्याच्या कल्याणासाठी तुम्ही अर्ज करा. आमचे खेड्यापाड्यातले गरीब लोक आहेत. गरिबांना लवकर लक्षात येत नाही की अर्ज कसा करायचा. गाव पातळीवर ज्या समित्या गठीत करण्याचे ठरलेले आहे ते अद्याप झालेले नाही. त्यामुळे लोकांना अर्ज कुठे करायचा हे समजत नाही.

अनेक ठिकाणी अधिकारी आदेशच नसल्याचे सांगतात. फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना सक्त आदेश द्यावेत. हैदराबाद गॅझेटचा जीआर आम्ही काढलेला आहे. तुम्ही लोकांना सांगा की अर्ज करा. ज्याने अर्ज केलेला आहे त्याला तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्यावे. तर एक तारखेपासून आम्ही सगळीकडे मराठ्यांनी अर्ज भरण्यासाठी आवाहन करणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT