Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Update : स्वत:ला ठाण्याचे मसीहा समजणारे कुठे गेले? अंबादास दानवेंचा पूर्णेकर हत्येनंतर एकनाथ शिंदेंवर निशाणा

Political Breaking Live Headlines Updates : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यासह राज्य आणि देशभरातली महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

स्वत:ला ठाण्याचे मसीहा समजणारे कुठे गेले? अंबादास दानवेंचा पूर्णेकर हत्येनंतर एकनाथ शिंदेंवर निशाणा

विधान परिषदेचे आमदार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येनंतर एकनाथ शिंदे स्वत:ला मसीहा समजणारे कुठे गेले? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी एवढ्या मोठ्या कार्यकर्त्याचा मुडदा पाडला तेव्हा इकडे का नाही आले? असंही म्हटलं आहे. तसेच लोकशाहीचा हा महाराष्ट्र असणार आहे. जनता रस्त्यावर उतरेल आणि मस्ती जिरवेल असा इशाराही दानवेंनी यावेळी दिला आहे.

पुढील 10-12 ऑक्टोबरपर्यंत सर्व 100 टक्के पंचनामे पूर्ण होणार: कृषिमंत्री भरणे

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आतापर्यंत राज्यात 44 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. तसेच पुढील 10-12 ऑक्टोबरपर्यंत सर्व 100 टक्के पंचनामे पूर्ण करण्यात येणार असल्याचं भरणे यांनी म्हटलं आहे.

प्रदीप पुर्णेकर प्रकरणात SIT ला मोठं यश, हत्येकरिता वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांना मिळाले

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात SIT ला मोठे यश आलं आहे.पुर्णेकर यांच्या हत्येकरिता वापरण्यात आलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहे. ठाणे क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील कर्नाळा जंगलातून ही हत्यारे जप्त केली आहेत. आरोपींनी पूर्णेकरांची हत्या करुन कर्नाळा जंगलात फेकली होती. एक देशी पिस्तुल आणि आरोपीचा मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केली आहे. ⁠SIT प्रमुख अमरसिंह जाधव आणि विशेष तपास अधिकारी शैलेस साळवी यांच्या टीमने केली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंहांना एक हजार कोटींच्या मानहानीची नोटिस

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांना निवृत्त एसपी भीमराव घाडगे यांनी एक हजार कोटींच्या मानहानीची नोटिस बजावण्यात आली आहे. ॲंटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणी परमवीर यांच्या भूमिकेच्या तपासाकरिता एनआय कोर्टात अर्ज करण्यात आला आहे. तीन ऑक्टोबर रोजीच्या प्रतिज्ञापत्रातील उल्लेखामुळे बदनामी होत आहे, असा दावा घाडगे यांनी केला आहे. प्रतिज्ञापत्रातील आरोप बदनामीकारक आणि खोटे आहेत, असाही दावा करण्यात आला आहे.

समिती नको; एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामाच हवा

आम्हाला कुठलीही चौकशी समिती नको आहे, आम्हाला राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा हवा आहे. चौकशी समिती नेमली आणि आयोगाचे अध्यक्ष भीमनवार हेच असतील तर त्या समितीचा काय उपयोग होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरच तोडगा काढला पाहिजे, असे उपोषणकर्ते शिवराज मोरे यांनी सांगितले.

महायुती सरकारचा वडार समाजाला मोठा दिलासा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारने वडार समाजाला मोठा दिलासा दिला आहे. पारंपरिक दगडफोडी व उत्खननातील गौण खनिज स्वामित्वधनासाठी (रॉयल्टी) वाढीव सवलत देण्यात आली आहे. वार्षिक उत्खनन मर्यादा 200 ब्रासवरून 500 ब्रास करण्यात येणार आहे, त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) नियम, 1968 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

देशात, राज्यात सध्या विद्यार्थ्यांच्या जीवावर राजकारण सुरुय : उदय सामंत

देशात, राज्यात सध्या विद्यार्थ्यांच्या जीवावर राजकारण सुरु आहे. आपल्याला लोक जमत नाहीत, लोकांनी नाकारलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनालात घुसून राजकीय पोळी भाजून घेण्याच्या उद्योग दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरू आहे, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला.

देऊळगाव राजा येथे दोन गटांत वाद; दोघांचा मृत्यू, २० आरोपी अटकेत

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथे दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी होऊन दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस, दंगल नियंत्रण पथक आणि क्यूआरटी पथकाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात महायुती आमनेसामने!

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता थेट निवडणुकीच्या मैदानातही दिसत आहे. भाजपने शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र शिवसेनेनेही आपला उमेदवार दिला आहे. यामुळे महायुतीतच उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भैय्या माने यांनी देखील पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे भाजपने उमेदवारी दिलेल्या डॉ. स्मिता जाधव यांना राष्ट्रवादीकडून अप्रत्यक्षपणे आव्हान उभे राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ८ ऑक्टोबरला रत्नागिरी दौऱ्यावर

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे (गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी) रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून ते या दौऱ्यात शाळा भेटींसह 'चला शाळेत जाऊया' अभियानाचा आढावा घेणार आहेत.

नाशिकच्या आंदोलनकर्त्या आदिवासी मुलांची पोलिसांकडून धरपकड

नाशिकमध्ये आंदोलनासाठी बसलेल्या आदिवासी मुलांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या असताना त्यांचं अद्यापही आंदोलन सुरुच आहे. मागण्या मान्य झाल्याबद्दल या आंदोलकांच्या शिष्टमंडळांन आमचं अभिनंदनही केलं, मग तरीही आंदोलन कशासाठी? असा सवाल नुकताच मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना विचारला होता.

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेची टीम नेपाळमध्ये तैनात

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेची टीम नेपाळमध्ये तैनात

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी ठाणे गुन्हे शाखेने तपासाचा वेग वाढवला आहे.

फरार आरोपी परराज्यात किंवा परदेशात पळून जाऊ नयेत, यासाठी विविध ठिकाणी गुन्हे शाखेच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

विमानतळांसह महत्त्वाच्या ठिकाणी फरार आरोपींचे फोटो आणि माहिती पाठवण्यात आली असून, नेपाळमध्येही गुन्हे शाखेची टीम तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, फरार आरोपी सोनू कनोजिया उर्फ टल्ली हा पोलिसांच्या हाती कधी लागतो, याकडे आता लक्ष लागलं आहे.

मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण सुरू

पुण्यासह मुंबईत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण सुरू असल्याचे ते म्हणाले आहे. तसेच राजकारणाला राजकारणानेच उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.

संविधानिक संस्थांबाबत विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह

संविधानिक संस्थांबाबत विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह पसरविला जात असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चावर केली आहे.

काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला, भाजपची टीका

दिल्लीतील काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपने टीका केली आहे. राहुल गांधी यांनी आकाशवानी भवनात घुसण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटल्याची टीका भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली आहे.

मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा

मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला आहे. नाशिकहून आलेल्या या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

राहुल, प्रियांका गांधी आकाशवाणी भवनात

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले होते. नंतर त्यांना सोडण्यात आले. सध्या ते आकाशवाणी भवनात असून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्यावर ठाम आहेत.

दिल्लीत इंडिया आघातीचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

दिल्लीत इंडिया आघाडीकडून संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. पोलिसांनी हा मोर्चा आकाशवाणी भवनाजवळ अडविला आहे. मोर्चात १५० हून अधिक खासदार, विरोधी पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

मुंबई महापालिकेवर थकबाकीचा डोंगर

मुंबई महानगरपालिकेवर आता थकबाकीचा डोंगर झालाय. पाणीपट्टीची थकबाकी आता तब्बल 4 हजार कोटींच्या घरात पोहोचलीय. नियमित पाणीपुरवटा होऊनही बिलांची वसुली करण्यात BMCला अपेक्षित यश आलेलं नाही. म्हाडा, रेल्वे, सरकारी विभाग आणि खाजगी ग्राहकांकडे मोठी रक्कम थकीत आहे.. मुदतीत बिल न भरल्यास अतिरिक्त दंड आकारला तरी थकबाकीचा हा डोंगर सातत्यानं वाढत चालल्यानं चिंता व्यक्त केली जातेय...

पुणे पदवीधरचा  महाविकास आघाडीचा सस्पेन्स संपला, हर्षदा जाधव- देशमुख यांचे नाव निश्चित

पुणे पदवीधर मतदार संघातील माहाविकास आघाडीचा सस्पेन्स संपला

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हर्षदा जाधव- देशमुख यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती

महाविकास आघाडीतूनही भैया माने यांचा पत्ता कट

थोड्याच वेळात उमेदवारीची घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती

दुष्काळावर मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

आज दुपारी 12 वाजता कॅबिनेट बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील दुष्काळाचा आढावा घेतला जाणार आहे. पिक पाण्याचा मुख्यमंत्री जिल्हा निहाय आढावा घेणार आहेत. पिण्याच्या पाण्याचे टँकर व चारा नियोजन वाढविण्यासाठी निर्देश देण्याची शक्यता आहे. केंद्राला पाठविणाऱ्या मदत प्रस्तावावरही आज अंतिम चर्चेची शक्यता आहे.

PSIला लाच घेताना अटक, ACBचा सापळा सफल

बोरीवली पोलीस ठाण्यातील PSI ज्ञानेश्वर पराडेला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. 1 लाख 30 हजारांची लाच स्वीकारताना ACB ने ही कारवाई केली. अटक न करण्यासाठी ज्ञानेश्वर पराडेने लाचेची मागणी केली होती. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याच्या घराची झडती सुरु करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांवर प्रचंड ताण, 8 तास ड्युटीची अंमलबजावणी करा, संजय राऊतांची मागणी

मुंबई पोलिसांवर प्रंचड ताण येत असून कागदोपत्री ८ तास काम दाखवले जात असताना प्रत्यक्षात मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्याकडून १२ तासांहून अधिक काळ काम करवून घेतले जाते. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात स्वत: लक्ष घालून मुंबई पोलिसांच्या ८ तास कामाच्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

यड्रावकर गटाला राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा देण्यास अंतर्गत विरोध

गोकुळ'च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला आणखी एक जागा हवी असल्याने या जागेवरून उमेदवार निश्चितीचा तिढा निर्माण झाला आहे. त्यात आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाला राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे; पण याला राष्ट्रवादीतूनच अंतर्गत विरोध आहे. शिवाय शिवसेनेतून देण्याला देखील विरोध आहे. दरम्यान, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार डॉ. विनय कोरे परदेशात असल्याने आज महायुतीच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाली नाही. डॉ. कोरे आज येणार असून, त्यानंतर ही बैठक होण्याची शक्यता आहे.

गांधी विद्या मंदिरचे विश्वस्त अपूर्व हिरे यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा गंभीर आरोप

चार दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री दादा भोसे यांनी हिरे कुटुंबीयांच्या शिक्षण संस्थेवर आर्थिक आरोप करणारी पोस्ट फेसबुक वर टाकली होती. त्यात आर्थिक घोटाळ्याचा उल्लेख केला होता. या पोस्टला अद्वय हिरे यांनी देखील तेवढ्यात सत्परतेने उत्तर देत शिक्षण मंत्र्यांचेच शिक्षण काढले होते. यानिमित्ताने पुन्हा एकदा हिरे आणि भुसे यांच्यातील राजकीय वादाला तोंड फुटले होते. त्याची परिणीती आणखी एका गुन्ह्यात पाहायला मिळाली. महात्मा गांधी विद्यामंदिर चे विश्वस्त डॉ अपूर्व हिरे यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

MPSC आंदोलकांना पुणे पोलिसांच्या नोटिसा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता पोलिसांच्या कारवाईची किनार लागली आहे. शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेली आंदोलने बेकायदेशीर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, आंदोलनाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केल्याच्या कारणावरून २९ क्लास व अभ्यासिका चालकांसह ५१ विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनावर पोलिसांचा रडार अधिकच तीव्र झाला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दोन अपघात, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक (कनेक्टिंग लिंक) वर आज पहाटे अवघ्या काही तासांच्या अंतराने झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

निवडणुकीपूर्वीच गोकुळमधील महायुतीचे मतभेद, मनभेद चव्हाट्यावर

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघाची निवडणूक सुरू असताना आता महायुती मधील मनभेद आणि मतभेद संपल्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली होती. मात्र महायुतीमध्ये किती मतभेद आणि मतभेद आहेत. हे एका गटाच्या प्रचारादरम्यान वाटण्यात आलेल्या पत्रकावरून समोर येत आहे. मागील पाच वर्षाच्या सत्ता काळात गोकुळ मधील कथित गैरकारभाराच्या प्रसिद्धी माध्यमात आलेल्या बातम्यांचा लेखाजोखा या पत्रकातून मांडला आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांसह सभासद आणि नेत्यांमध्ये देखील या पत्रकाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी आणखी कोणाचे अर्ज दाखल केले जाणार का? याबाबतचे चित्र आज स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT