बीड शहरातील शाहूनगर भागातील दोन गट आमने-सामने येत दगडफेक केली. वादानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांची मतदार केंद्रावर भेट दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केलं. जमावाला पांगव्यासाठी यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा मोठा राडा झाला आहे.
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असतानाच, बदलापुरातून अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या एका युवकानं खास मतदानासाठी हजेरी लावली. अमेय सोमवंशी, असं या युवकाचं नाव आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियात वास्तव्याला आहे. बदलापूर नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे अमेय इथं आला आणि त्याने मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीत मतदानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच आपण मतदानासाठी भारतात आल्याचं अमेय यानं सांगितलंय.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिंगोलीमधील आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. मतदान केंद्र अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
'वातावरण जरी आल्हाददायक दिसत असलं, तरी रडीचा डाव खेळल्यासारखा सत्ताधारी पक्ष करत आहे. मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान होत आहे. गाव खेड्यातून गाड्या भरभरून आणल्या जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे लोक अतिशय दादागिरी करत आहेत, तर थेट आमदाराच्या घरातील लोक पोलिसांना लोटपाठ करण्याच्या ही घटना घडत आहे,' असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
बुलढाणा इथं नगरपालिकांसाठी होत असलेल्या मतदानावेळी, मुस्लिम बहुल भागातील मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याची माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मिळाली. त्यानुसार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोगस मतदान करणाऱ्यांना पकडत चोप दिला. यावेळी मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्याने पोलिसांना जमावला पंगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी दुपारी दीडवाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात सरासरी 35.58 टक्के मतदान. सर्वाधिक जामखेड येथे 43.38 टक्के. सर्वांत कमी शिर्डीत 31.22 टक्के. श्रीरामपूर 34.30, संगमनेर 36.33, राहुरी 34.74, राहाता 40.30, श्रीगोंदा 31.37, शेवगाव 35.70.
जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला पकडले. प्रभाग क्रमांक दहा मधील एकलव्य शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदार युवक सापडला. बोगस मतदाराला पकडल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन करत कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या युवकाविरोधात कारवाईसाठी पोलिस ठाण्यात नेलं आहे.
महाडमध्ये निवडणुकीच्या दरम्यान दोन राजकीय गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. एका गटाच्या समर्थकांनी दुसऱ्या गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आणि वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी रिव्हॉल्व्हरचा वापर झाल्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर दावाही करण्यात आला आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सामाजिक तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मला जाणीवपूर्वक व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण जात ही जनतेच्या मनात नसून केवळ नेत्यांच्या मनात असते,' असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
शिंदे मालवणात आले येताना बॅगेतून काय आणले? मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर! या आधी नाशिक मध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या लोकशाही ची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र! अशी एक्स पोस्ट एका व्हिडीओसहित संजय राऊत यांनी केली आहे.
येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत आज मतदान प्रक्रिया पार पडत असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.
नगरपालिका, नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
इंदापूर नगरपरिषदेसाठी पहिल्या दोन तासात टक्के मतदान 9.80 टक्के मतदान झाले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर आणि भरत शहा यांनी बजावला मतदानाचा हक्क इंदापूर नगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील 27 मतदान केंद्रांवर पहिल्या दोन तासांत 9.80 टक्के मतदान झाले. मतदान केंद्रापासून निर्धारित केलेल्या अंतरावर प्रमुख पक्ष व उमेदवारांनी नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना मतदार यादी तसेच मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून साह्य केले.
नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही मोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी आयोगाने उद्या (2 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले होते.
बदलापूरमध्ये भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते आपसात भिडले आहेत. बदलापूर पश्चिम गांधी नगर टेकडी एसटी बसस्टँड जवळ भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. बस स्टँड परिसरात मतदारांना स्लिप वाटणे, त्याचबरोबर बुथ लावण्यावरून राडा झाला. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गडहिंग्लज नगरपालिकेमध्ये बोगस मतदार आढळला आहे. प्रभाग क्रमांक चार मधील शिवराज शाळेच्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. उमेदवाराच्या प्रतिनिधीकडून त्याला ताब्यात घेऊन पोलिसांकडे स्वाधीन केले आहे. गुजर वसाहतीमधील प्रकार पोलिंग एजंटने हा प्रकार उघडकीस आणला आहे.
अक्कलकोटमध्ये मतदार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला आहे. अक्कलकोट मधील श्रीमंत राणी नित्मालाराजे कन्या प्रशालेत हा वाद झाला. एका महिलेला पोलिसांनी मतदान केंद्रावरून बाहेर काढल्याने हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
नगरपालिका, नगरपंचायतसाठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत 11.47 टक्के मतदान पार पडलं आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा मतदान केंद्रायतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ प्रकरणाचा अहवाल निवडणूक अधिकाऱ्यांनी मागवला असून यामध्ये गोपनीयतेचा भंग झाला असेल तर कार्यवाही होणार असल्याची अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कागल नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रिये दरम्यान तृतीयपंथीय आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. कागल येथील प्रभात क्रमांक पाच मतदान केंद्रावर काही उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते पक्षाचा पक्षाचे चिन्ह घेऊन थेट मतदान केंद्रात येत असल्याचा आरोप केला जात आहे. याच मतदान केंद्रावरील बॅलेट युनिट अचानक बदलण्याचा तृतीयपंथीयांनी आरोप केला आहे.
कागल नगरपालिका निवडणुकी दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्राबाहेर मंतरलेली लिंबू टाकले आहेत. कागलमधील संत रोहिदास विद्यामंदिर मतदान केंद्राच्या बाहेर हा अनोखा प्रकार घडला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.
साताऱ्यातील आझाद कॉलेज येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. तांत्रिक अडचणीमुळे प्रभाग क्रमांक 16 मधील दोन नंबर बूख मधील ईव्हीएम बंद झालं आहे
'आपल्यातला एक गद्दार गेला त्याचा डायलॉग फेमस झाला होता काय झाडी काय डोंगर, आता त्याला जाऊन विचारा कारण त्याच्यावर ईडीची धाड पडली आहे. आता म्हण काय धाडी, काय पोलीस आणि जा तुरुंगात', अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला.
मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या रात्री नाकाबंदीत एक कार सापडली. या कारमध्ये दीड लाखांची रोकड सापडली असून ही कार भाजप (BJP) स्थानिक पदाधिकाऱ्याची असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमदार निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपकडून पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप केला. तर राणे यांनी थेट मालवण पोलीस ठाण्यात दाखल होत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली.
पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 3 नगरपंचायत, अध्यक्षपदाकरिता 76 उमेदवार आणि सदस्य पदाकरिता 955 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे. पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 3 नगरपंचायती मिळून एकूण 524 मतदान केंद्रे असणार आहेत.
सकाळी साडेसात वाजल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 317 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जयसिंगपूर, कागल नगरपालिका आणि चंदगड नगरपंचायतीमध्ये हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील 13 नगरपालिका नगरपंचायतीसाठी 56 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तर 263 नगरसेवक पदासाठी 809 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.