उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी 48 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज माघारी. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर वैध राहिलेल्या 799 उमेदवारांच्या अर्जापैकी 48 जणांनी माघार घेतल्यामुळे आता फक्त 751 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 48 जणांनी अर्ज माघारी घेतलेल्यांच्या मध्ये एबी फॉर्म देऊन वैध ठरलेल्या उमेदवारांच्या कुटुंबीयातील डमी उमेदवारांनी घेतले आहेत त्यांनी देखील आपली उमेदवारी मागे घेतली आहे. उद्या अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं आता आणखी किती जण अर्ज मागे घेतात याकडं लक्ष लागलं आहे. त्यात बंडखोरांची मनधरणी करण्यात नेत्यांना यश मिळणार का? हे पाहावं लागेल.
Nanded News: भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत असून नांदेड आणि लातूरमधूनही भाजप समर्थक व निष्ठावंत कार्यकर्ते मनातील खदखद बोलून दाखवत आहेत. माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याने अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अशोक चव्हाण यांनी 50 लाख रुपये घेऊन पैसेवालांना तिकीट दिल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांनी केला आहे.
ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी शिवसेना पदाधिकारी यांची बैठक होत आहे. या बैठकीस ठाण्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चव्हाण हे हजर आहेत. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक उमेदवार हजर असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने विजयाची सुरूवात केली आहे. प्रभाग समिती क्रमांक 17 ब मधील उमेदवार व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पुरुषोत्तम पाटील यांचा बिनविरोध विजय झाला आहे.
18 वर्ष एकनिष्ठ राहून, दरवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य देऊन देखील तुम्ही आज आमच्या पदरी निराशाच टाकली.
प्रमोद अण्णा निम्हण सारख्या तुमच्या निष्ठावंत कार्यकत्यावर तुम्ही केलेल्या अन्यायामुळे आम्ही दुखावलो आहोत. 2017 पासून पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी मधील मतदार भोगत असलेल्या हालअपेष्ठांमध्ये तुम्ही आणखी भरच घातली आहे. एकूणच तुम्ही पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडीला विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवत आहात असेच दिसत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा खालोखाल शिवसेना शिंदे गट यांनी अखेर आपले खाते उघडत पहिल्याच टप्प्यात ताकद दाखवून दिली आहे. प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, या प्रभागात महायुतीचा राजकीय वरचष्मा स्पष्टपणे दिसून आला आहे. याच प्रभागातून भाजपच्या ज्योती पाटील यांचाही विजय निश्चित झाल्याने, महायुतीने या प्रभागावर संपूर्ण पकड मिळवली आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेत युती झाली आहे. मात्र ही युती कागदावरच राहणार की प्रत्यक्ष मैदानात दिसणार याची चर्चा सुरू झाली आहे. कारण नऊ ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात मैदानात आहेत.
डोंबिवली मधून भाजपाचा चौथा उमेदवार बिनविरोध
पॅनल क्रमांक 27 मधील भाजपच्या मंदा पाटील यांची बिनविरोध निवड
27 अ मधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता
मंदा पाटील यांच्या विरोधात मनसेच्या सुवर्णा पाटील या उभ्या होत्या त्यांनी आपला उमेदवारी अर्ज पाठी घेतल्याने मंदा पाटील यांचा हा विजय सुकर झाला
मुंबई वाचवण्यासाठी ही मराठी माणसाकडे शेवटची संधी आहे, असं आवाहन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारांना आक्रमक होण्याचे आदेश दिलेत.निवडणुकीत पैशांचं आमिष दाखवलं तरी त्याला बळी पडू नका, असं सांगतानाच त्यांनी प्रत्येक बूथवर 10 खंबीर कार्यकर्ते उभे करण्यास सांगितलं. बोगस मतदार आढळल्यास त्याला तिथेच फटकावून काढा असे आदेश देत त्यांनी कुठल्याही प्रलोभनाला भीक न घालता मुंबईच्या अस्मितेसाठी लढण्याचं आवाहन केलंय.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर शेठ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. बीएमसी निवडणूकच्या पार्श्वभूमीवर त्या भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती आहे.
नाशिक भाजपमधील अंतर्गत अंसंतोष समोर आला आहे. तिकीट न दिल्याने भाजप शहर सरचिटणीस अमित घुगे यांनी नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला.
तिकीट वाटपावरुन नाशिकमध्ये अंतर्गत वाद उफाळला आहे. पक्षाने तिकीट न दिल्याने भाजप शहर सरचिटणीस अमित घुगे नाराज आहेत. ते पत्रकार परिषद घेऊन याबाबत गौप्यस्फोट करणार आहेत. तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. एबी फॉर्मवरून भाजपच्या दोन गटात गोंधळ झाला होता.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे. जरांगे पाटील नाशिकमध्ये काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लागले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच गुंड गजा मारणे याच्या पत्नीला देखील राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यावर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सचिन खरात यांच्यासोबत आमची युती झाली असून त्यांना काही जागा आम्ही दिल्या असल्याच सांगत अजित पवारांनी सचिन खरात यांच्या पक्षाच्या माध्यमातून या गुन्हेगारी कुटुंबांना उमेदवारी दिल्या असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वागळे इस्टेट परिसरातील प्रभाग क्रमांक 16, 17 आणि 18 मधील ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसह अपक्ष उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज बाद केल्यामुळे या पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर पक्षपाती आणि अन्यायकारक भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.
नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सरत्या वर्षातील कटू प्रसंगांना विसरूया आणि सुमधूर आठवणींकडून प्रेरणा घेत, पुढे जाऊया. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर, नेतृत्व करणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच फडकत राहो, यासाठी आपण एकजूट करूया. महाराष्ट्राच्या मातीत आव्हाने स्वीकारण्याची धमक आहे. आव्हाने आलीच, तर त्यावर मात करण्याचा निर्धार करुया. नवे वर्ष नवचैतन्य घेऊन येणारे, आशा, आकांक्षांना बळ देणारे ठरेल, अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नववर्ष सर्वांसाठी आरोग्यदायी, सर्वच क्षेत्रात भरभराट, समृद्धी घेऊन येणारे ठरावे, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट मिळालं. नवीन वर्षावर लाभार्थी बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास उशिर झाला आहे. त्यानंतर आता नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात आला असून अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरूवात जाली आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे या प्रभाग क्रमांक १२ ब मधून बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र कुंवर यांनी केली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीनंतर आता जळगावातही भाजपचा उमेदवार मतदानाआधी विजयी झाल्याच पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.