दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर येथे हालचालींना वेग आला असून केंद्रीय गृहमंंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महत्तपूर्ण बैठक घेण्यात येत आहे. या स्फोटामुळे राजधानी हादरली असून तीन ते चार वाहने जळून खाक झाली आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत काँग्रेसने वेगळी चूल मांडल्याची चर्चा सुरू झाली होती. याबाबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी, मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढावी अशी अनेक नेते, पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांची भावना आहे, अशा भावना वेळोवेळी व्यक्त केलेल्या आहेत. पण अद्याप मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली नाही, निवडणूक जाहीर झाली की त्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, म्हटले आहे.
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळ एका गाडीत झालेल्या भीषण स्फोटामुळे राजधानी हादरली. या स्फोटात इतर तीन ते चार वाहने जळून खाक झाली असून एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली असून दिल्लीत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेनंतर आता राज्याची राजधानी मुंबईत देखील हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या परिसरात एक मोठा स्फोट झाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या एका कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती मिळत असून या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागली. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, त्यामागचं कारण अद्याप समोर आलेले नसून येथे भीतीचं वातावरण आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. नाशिकमध्ये झालेल्या आजच्या बैठकीत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून जे लोक गेले होते, त्यांना पक्षाने पाठवले नव्हते, त्यांच्या उपस्थितीशी पक्षाचा काहीही संबंध नाही, त्या लोकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्येष्ठ नेत्यांची विभागीय प्रभारी म्हणून नियुक्ती आहे. नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वड्डेटीवार यांच्याकडे, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे सोपवली आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, यशोमती ठाकूर यांच्याकडे अमरावती विभागाची, मराठवाडा प्रभारी म्हणून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची तर कोकण विभाग प्रभारी म्हणून माजी मंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली आहे.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या बाहेर ठिया आंदोलन. पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचा आरोप, टेबलाखालून पैसे घेऊन बाहेर चौकात लोकांकडून पैसे वसुली केली जात असल्याचा आरोप शिक्षक आमदार यांनी केला. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू.
चारकोप विधानसभा मतदारसंघातील यादीत गुजराती बंगाली ओडिया भाषेत मतदारांची नावे देण्यात आली आहे. परभाषेत असलेल्या मतदार याद्या मनसे पदाधिकाऱ्यांनी निवडणुक अधिकाऱ्यांच्या तोंडावर फेकल्या. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आणण्याचे काम मनसे पक्षाकडून सुरू आहे चारकोप मतदार संघात सर्वाधिक घोळ मतदार याद्यांमध्ये आढळून आला आहे या सोबतच अनेक मतदारांची नावे मराठी ऐवजी गुजराती बंगाली ओडिया आणि तामिळ भाषेत देखील आढळून आल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी माघार घेतली आहे. त्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. आज त्यांनी अर्ज मागे घेतला आहे.
मुंबईत युवक काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे चर्चगेट आणि मरीन ड्राईव्ह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. 'चर्चगेटच्या स्टेशनच्या समोरचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद झाला होता आणि सगळी वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं होतं'. मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत कारवाई सुरू केली. पोलिसांनी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर पोलिसांनी परिसरातील वाहतूक पुन्हा सुरळीत केली.
साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आंदोलन करण्यात आले. 'डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी सध्या काँग्रेस रस्त्यावर उतरेल,' अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, गिरगाव चौपाटी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही कार्यकर्ते पुढे सरसावले, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधी रुपाली बेडगाव यांनी घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीवरून महत्त्वपूर्ण बैठक झाली. ही निवडणूक सामंजस्यानं लढवली जावी, असं शरद पवार म्हणत असल्याचं समोर आलं आहे. या भेटीआधी दोन्ही नेत्यांमध्ये दोन वेळा फोनवरून चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. एमसीएची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र आल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र अखेरीस निवडणूक झाली. या घडामोडींमुळे क्रीडा विश्वातही राजकारणाची गणितं कशी महत्त्वाची ठरतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
बच्चू कडू यांच्या तोंडी फोडाफोडीची भाषा शोभत नाही, अशी खंत व्यक्त करत, कडू यांनी संयम ठेवावा, असा सल्लाही राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे. बच्चू कडू यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्या एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली.
निवडणुकीसाठी नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडे नगरसेवक आणि नगराध्यक्ष करिता 35 हजार इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या 12 तारखेला आमच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे आणि त्यात यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
नाशिकमध्ये स्थानिकच्या निवडणुका मनसे अन् काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे समोर आले आहे. मात्र दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाकडून याबाबत माहिती नसल्याची आणि प्रस्ताव नसल्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसकडे मनसेचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर, स्वतंत्र लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी दिली. काँग्रेस हायकमांडने याबाबत निर्णय दिल्यानेच आम्ही तशी तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रस्ताव आल्यावर त्यांच्याशी आघाडीचा निर्णय घेऊ, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले
भाजप मंत्री आशिष शेलार यांच्या मतदारसंघात दुबार मतदार असून, ती परप्रांतीय आहे. ही मतदार घुसवण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. ही परप्रांतीय मतदार आशिष शेलार यांनी घुसवली का, असाही प्रश्न संदीप देशपांडे यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वाडीवस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जातीवाचक वाडीवस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलेला सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारत मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. डॉ. आदिल अहमद राथेर याला अटक करत, त्याच्याकडील माहिती आधारे, पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद इथून सुमारे 350 किलोग्रॅम स्फोटके, दोन एके-47 रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला.
नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असून, अहिल्यानगर जिल्ह्यात अजून कुठेही महायुती आणि महाविकास आघाडीची घोषणा झालेली नाही. जिल्ह्यात 12 ठिकाणी निवडणुका होत असून, एकाही ठिकाणी अधिकृत घोषणा झालेली नाही. यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते संभ्रमात आहे.
'प्रहार'चे बच्चू कडू यांना भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील लोणी इथून एका युवा शेतकरी प्रतीक कदम यांनी फोन करून प्रतिक्रिया दिली. 'तुमचे वाहन फोडताना, तीन लाख रुपये देणार', असे प्रत्युत्तर दिले. बच्चू कडू यांनी काल माध्यमांना प्रतिक्रिया देताना, 'मंत्री विखे पाटलांची वाहन फोडणाऱ्यांना एक लाख रुपये देणार', असे म्हटले होते.
जय पवार बारामती नगरपरिषदेची निवडणूक लढविणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. जयबाबत तसं मी काही ऐकलं नाही. तसे काही होणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
ब्रम्हपूरी तालुक्यातील हळदा, मुडझा, वांद्रा, कोसंबी, बल्लारपुर, चिचगाव, आक्सापुर, बरडकीन्ही तसेच गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, तालुका काँग्रेस सरचिटणीस गुरुदेव वाघरे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे यांसह अन्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बुलढाण्यातील युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे यांने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीवर राॅकेट टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नीने साडीला लागलेली आग पाणी टाकून विझवली. या प्रकरणी चिखली शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
महेश गायकवाड यांची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदेंनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी, शहरप्रमुख निलेश शिंदे उपस्थित होते.
कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रातील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये विकास म्हात्रे, कविता म्हात्रे आणि नंदू धुळे - मालवणकर या तीन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या नगरपंचायत, नगपरिषदेच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे. या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.