नगर परिषद निवडणुका घोषित झाल्यानंतर महायुती तर्फे नाशिक जिल्ह्यात एकत्रित निवडणुका लढल्या जातील असे बोलले जात होते, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव, मनमाड, येवला येथे शिंदेच्या शिवसेनेबरोबर युती न करण्याची घोषणा केली. मात्र नांदगावच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे येथील नगरपरिषदेत शिवसेना-भाजप युती झाली आहे. नांदगावमध्ये युती झाली असली तरी मनमाडमध्ये महायुतीच राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कणकवली नगरपंचायतमध्ये भाजप विरोधात कोण लढणार हे चित्र अखेर स्पष्ट झाले असून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी दंड थोपाटले असून ते शहर विकास आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरणार आहेत. ते सोमवार (दि.17) आपला उमेदवारी अर्ज भरणार असून शहर विकास आघाडीकडून सर्व जागा लढविण्यात येतील अशीही घोषणा पारकर यांनी केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून उपमुख्यमंत्री अजित पवारांची विश्वासू योगेश क्षीरसागर यांनी त्यांच्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाच्या अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सोपवला आहे. निवडणुकीच्या तोंडावरती राजीनामा दिल्याने बीडमध्ये राष्ट्रवादीमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून मोठा धक्का मानला जात आहे. तर ते भाजपमध्ये करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीत येथे जागावाटपावरून वाद सुरू झाला आहे. काँग्रेसने येथे स्वबळाचा नारा दिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून दुर्दैवाने काँग्रेसने स्वबळाचा सूर आळवलाय. मात्र महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवावी हा आमच्या पक्षाचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) दारुण पराभवानंतर अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात मोठे वादळ निर्माण झाले आहे. लालू यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्वीट करून राजकारण आणि कुटुंबाशी संबंध तोडत असल्याची धक्कादायक घोषणा केली आहे. या निर्णयामागे तेजस्वी यादव यांचे सल्लागार संजय यादव आणि रमीज यांचा हात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुरेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलासराव जगताप यांनी पत्रक काढून याबाबत निर्णय घेतला आहे. जतच्या नगराध्यक्षपदासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले
सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका व एका नगरपरिषदेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार आहे. येत्या सोमवारी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी (ता. १५ नोव्हेंबर) पंढरपुरात दिली.
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (ता. १७ नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे. मात्र, निवडणूक आयोगाने उद्या रविवारीही (ता. १६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू राहणार आहे. रविवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळेत हे अर्ज स्वीकारणार आहेत. त्याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बिहारची निवडणुकीमध्ये ऐन वेळेवर महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा केल्या गेले. म्हणजेच ती एक प्रकारची लाच देऊन वोट विकत घेतल्याच प्रकार होता. तसेच निवडणूक आयोगानेच ही निवडणूक भारतीय जनता पार्टीला निवडून दिली आहे. हे दोन कारणे महाविकास आघाडीच्या पराभवामागील आहेत, असे काँग्रेसचे राज्य मुख्य समन्वयक रवी पाटील यांनी सांगितले.
अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार अग्रवाल यांनी त्यांच्या स्वतःच्या वाहनातून जखमीस धुळे शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
बिहारमध्ये वोट चोरी झालीच आहे. त्यामुळे एनडीए एवढं यश मिळालं आहे. अन्यथा हे शक्य नव्हते. वोट चोरीचा फटका नक्कीच बसला आहे. बिहारमध्ये मोदीच्या सभा फेल गेलेल्या असताना अन् काँग्रेसचं वातावरण खूप चांगल होतं. आम्हाला अपेक्षित होत की आमची सत्ता येणार होती. मात्र वोट चोरी झाली, हे सत्य आहे, असा दावा काँग्रेसचे राज्य मुख्य समन्वयक रवी पाटील यांनी केला.
यवतमाळ जिल्ह्यात दहा नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची कन्या वकील प्रियदर्शनी अशोक उईके हिला भाजपकडून उमेदवारी जाहीर केली. यवतमाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षासाठी भाजप पक्षाकडून प्रियदर्शनी उईके हिने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केला आहे.
नगर परिषद निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मनमाड पोलिस सर्तक झाले असून, पोलिसांनी धडक कारवाई करत निवडणुकी पूर्वी विवेकानंद भागातील कृतिक संजय धीवर (वय 24) या युवकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला असता पोलिसांना एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतूस तसेच अन्य हत्यारे जप्त केली.
अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती देखील आल्यामुळे ताकद वाढली आहे. या माध्यमातून आपण मनपा निवडणूक शतप्रतिशत जिंकू, असा ठाम विश्वास ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केला. आंबेडकरी समाज, भीमसैनिक हा शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा राहणार आहे. समाजाला शिवसेनाच न्याय देऊ शकते. हा विश्वास आहे म्हणूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे रिपाई (गवई गट) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी आपल्या देशासाठी पर्यटक आहेत. जनतेशी नाळ नसणारे देशाची बदमानी करणारे जे पार्ट टाइम राजकारणी आहेत. त्यांना भारतीय म्हणायचे का हा प्रश्न आहे? अशा लोकांना बिहारच्या जनतेने नाकारले आहे. लोकशाहीची थट्टा करण्याची राहुल गांधींची सवय आहे. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारून एनडीएला संधी दिली, त्यांच्या लायकीप्रमाणे जागा मिळालेल्या सहा जास्त आहेत, तर शून्य मिळाला असता तर योग्य आकडा, त्यांच्या समोर लागला असता, असा टोला मंत्री नीतेश राणे यांनी राहुल गांधींना लगावला.
नाशिकच्या मालेगाव शहरात बनावट नोटांचा घेऊन येणाऱ्या दोघांना ताब्यात घेत, 5 लाख 56 हजार रुपयांचा बनावट नोटा जप्त केल्या आहेत. काही दिवसापूर्वीही तालुका पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मालेगावात आलेल्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. सध्या पोलिस या सर्व प्रकरणाचा तपास करीत असून त्याची आणखी कुठे लिंक आहे, का याचा शोध घेत आहे.
काँग्रेस मुस्लिम लिगी माओवादी काँग्रेस झाली आणि काँग्रेसचं मोठं विभाजन होईल, अशी पंतप्रधान मोदींनी घणाघाती टीकेचा खरपूस समाचार अमरावतीची काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे यांनी घेतला. "स्वातंत्र पूर्व काळापासून देशात काँग्रेस आहे. देशात लोकशाही टिकून राहावी, यासाठी सातत्याने काँग्रेसने प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसने सहभाग घेतला, अश्या परिस्थितीत जर काँग्रेसला माओवादी विचार म्हणत असतील, तर हे कुठल्या विचारच बीज आहे, आम्हाला तरी समजलं नाही," असा टोला खासदार वानखडे यांनी लगावला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वडगावमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, नगराध्यक्षपदासाठी अॅड. मृणाल म्हाळसकर यांच्यासारख्या नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे.
बिहार निकालावर शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. जो जीता वही सिकंदर. हरल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारायला हवा. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण करायला हवं.तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही योजना का आणल्या नाहीत? आम्ही ज्या योजना आणल्या त्या लोकांना आवडल्या. त्यावर लोकांनी मतदान केलं तर लोकांना दोष देण्याचं कारण काय? असं फडणवीस म्हणाले.
काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भूमिका स्पष्ट करत नाव न घेता मनसेवर टीका केली आहे. काही पक्षांची भाषा त्यांची वर्तणूक पटत नाही.. त्यांची वर्तणूक आमच्या संस्कृतीला साजेशी नाही.. आम्ही शिवसेनेच्या विरोधात नाही मात्र ते ज्यांच्यासोबत जातायंत त्यांच्याशी आमची विचारधारा पटणारी नाही... गरिबांना मारणाऱ्यांना, हुकूमशाही करणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही असं म्हणत काग्रेसनं स्वबळावर लढण्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केलीय...
श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनात उशिरा अपघाती स्फोट झाला. या स्फोटात 7 ठार, 27 जखमी झालेत. स्फोट अलीकडेच हरियानातील फरिदाबादहून जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्यातून झाला. मृतांमध्ये मुख्यतः पोलीस आणि फॉरेन्सिक अधिकारी आहेत. स्फोट स्थळावरून 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, जखमींमध्ये 5 गंभीर आहेत. घटनास्थळी मोठं नुकसान झालं असून, पोलीस आणि रुग्णवाहिका वाहने घटनास्थळी धावली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
बिहार विधानसबा निवडणुकीच्या निकालावर जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी या निकालावरून निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले शिवाय सत्ता असलेल्यांनी अधिकृतपणे पैसे वाटणं चिंताजनक असून भाजपने वाटलेल्या १० हजाराच्या योजनेचा हा परिणाम असावा असंही पवार यांनी म्हटलं आहे.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ही घोषणा केली आहे.
भुसावळ शहरावरील भाजपचे वर्चस्व नगरपालिका निवडणुकीत कायम राखण्याचे आव्हान आहे. माजी मंत्री एकनाथ खडसेंनी यासाठी मोठा राजकीय डाव टाकला आहे. खडसेंनी गेली अनेक वर्ष जोपासलेले राजकीय वैर बाजूला ठेवत आपल्या कट्टर विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष चौधरी यांच्याशी हात मिळवणी केली आहे.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबई काँग्रेसकडून एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 'लक्ष्य 2026' हे मालाड येथे होत आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर संपन्न होणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू तर 29 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या स्फोटाची तीव्रता दिल्लीतील स्फोटापेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. नौगाम पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री दिल्लीत स्फोट झाल्यानंतर तपास यंत्रणांनी या स्फोटाशी निगडित दहशतवादी मॉड्यूल उध्वस्त करण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. याच मॉड्यूलशी संबंधित जप्त करण्यात आलेली स्फोटके या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आली होती. या स्फोटकांची तपासणी करत असताना हा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. फॉरेन्सिक टीम, तहसीलदार आणि पोलीस कर्मचारी स्फोटके हाताळत असताना त्याचा स्फोट झाल्यामुळे या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला.
अभिनेता महेश कोठारे यांच्यापाठोपाठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही आपण कट्टर भाजप समर्थक असल्याचे म्हंटलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी शनिवारी (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) देखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. नामनिर्देशनपत्रे शनिवारी (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) या दोन्ही सुट्टीच्या दिवशीसही सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील, नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी येथे शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्यात युती झाली आहे. दरम्यान, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या युतीतर्फे त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वडगाव मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार सुनील शेळके यांनी अबोली ढोरे यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यांच्या समोर भाजप उमेदवाराचे आव्हान असणार आहे.
भाजपला आव्हान देण्यासाठी एकनाथ खडसे यांनी त्यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष चौधरी यांच्याशी जुळवून घेतले आहे. भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री खडसे यांनी एक पाऊल मागे टाकले आहे. त्यांनी आपल्या कट्टर विरोधक संतोष चौधरी यांच्याशी हातमिळवणी केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. पण मुळात निवडणुका प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने पार पडलेली नाही. निवडणुकीआधी SIR झाले, मतदार यादीत अनेक घोळ होते. बिहारमध्ये युतीचे सरकार इतके लोकप्रिय होते तर महिलांच्या खातात १० हजार देण्याची योजना का आणली? रेवडी देतात, निवडणुक यादीत घोळ केले तर ९० टक्के निकाल त्यांच्या बाजूने येणारच. हे निकाल लोकशाहीला धोका पोहचवणे आहेत. निवडणुकीत जय आणि पराजय होत असतो,आम्ही ते स्वीकारतो. पण देशात निवडणुका जर पारदर्शक पद्धतीने होणार नसतील तर भविष्यात लोकशाही टिकणार का, हा प्रश्न आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.