Live Update 1 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Political Updates : पुण्यात अजितदादांना धक्का, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारेटकर यांचा राजीनामा

Bihar Assembly Election Result 2025 : नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, महायुती, महाविकास आघाड किती ठिकाणी झाले याचे चित्र आज स्पष्ट होणार याशिवाय राज्य आणि देशभरातली घडामोडी एका क्लिकवर

सरकारनामा ब्युरो

Ajit Pawar : पुण्यात अजितदादांना धक्का, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारेटकर यांचा राजीनामा

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारेटकर यांनी स्थानिक नेतृत्वाच्या राजकारणाला कंटाळून आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. प्रदीप गारेटकर आता इंदापूर नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अर्ज भरणार असून, त्यांनी शरद पवार गट आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत स्थानिक आघाडी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने गारेटकर यांचा विरोध डावलून भरत शहा यांना उमेदवारी दिल्याने हा संघर्ष वाढला आहे. या बंडखोरीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच होम पिचवर मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Latur Farmer : फवारणीच्या औषधातून विषबाधा; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

लातूरच्या चाकूर तालुक्यातील अजनसोंडा इथं फवारणीसाठी आणलेल्या औषधातून विषबाधा झाल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतकरी अंगद भालेराव (वय-58) आणि लिंबाजी गवळे (वय-54) असे या दोन मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत. दोन्ही शेतकऱ्यांनी फवारणी झाल्यानंतर सोबत जेवण केल्याने विषबाधा झाल्याची बातमी माहिती समोर येत आहे.

Congress Politics : काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना AB फॉर्म पोहोचले; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

'राज्यात काँग्रेस उमेदवारांना AB फॉर्म नाही, अशी कुठेही स्थिती नाही. राज्यात सगळीकडे AB फॉर्म पोहोचले आहे. कुठेही गोंधळ नाही. ज्याठिकाणी एकमतं होऊ शकले नाही, तिथं उद्या 11 वाजेपर्यंत AB फॉर्म वाटप होईल,' असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Delhi Lal Quila Bomb Blast : अकोल्यातल्या युवकाची पोलिसांकडून सात चौकशी, पण...

Delhi Blast Live updates

दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील एका मुस्लिम युवकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. हा युवक अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या पिंजर पोलिस ठाण्यात अंतर्गत येत असलेल्या एका गावातला रहिवाशी आहे. युवक बेपत्ता असल्याची कुटुंबियांची तक्रार पिंज पोलिसांत होती. दिल्लीत बॉम्बस्फोट झाला त्या दिवशी हा युवक दिल्लीतच असल्याची माहिती समोर येत आहे. या युवकाची पोलिसांनी सात तास चौकशी केली. 7 तास पोलिसांकडून या तरुणाची चौकशी झाली. मात्र आतापर्यंतच्या चौकशीत सदर तरुणाबद्दल कोणतीच पुरावे हाती न लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Ratnagiri Shivsena Politics : राजन साळवी यांच्या मुलाला शिवसेनेने रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली

राजन साळवी यांच्या मुलाला शिवसेनेने रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारल्याचे दिसते. राजन साळवी यांचा मुलगा अथर्व राजन साळवी प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक होता. विशेष म्हणजे, राजन साळवी यांनी याच प्रभागातून राजकीय कारकिर्दिला सुरूवात केली होती. ही जागा भाजपला सोडली जाणार किंवा भाजपमधून आयात उमेदवार करून त्याला शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार, असे दोन पर्यायावर चर्चा सुरू आहे. रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत मुलाला उमेदवारी नाकारल्यानंतर आता उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात शीतयुद्ध रंगणार? अशी चिन्हं आहेत.

Congress Politics : भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत भाजपला धक्का; शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये दाखल

भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनाच काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. सुनील नामोजवार भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. यावेळीही त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र मात्र शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या अनिल धानोरकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने नमोजवार हे नाराज होऊन काँग्रेसमध्ये दाखल झाले. भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला असून त्यांनी नामोजवार यांना उमेदवारी देऊन भाजपला मोठा धक्का दिलाय.

MVA Politics : रत्नागिरी नगरपरिषदेसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

रत्नागिरी नगरपरिषदेसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप ठरले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला नगराध्यक्षासह 22 जागांवर लढणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाकडून शिवानी सावंत माने आज नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुक रिंगणात शिवसेना उद्धव ठाकरे सेनाविरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना, असा सामना होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सहा, तर काँग्रेसला चार जागा लढवणार आहे.

Jalgaon Politics : जळगाव महापालिकेत आज पाच जागांसाठी आरक्षण सोडत

जळगाव मनपा निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत त्रुटी राहिल्याने राज्य निवडणूक आयोगाने सुधारित सोडतीचे आदेश दिले होते. यात 13 प्रभागांचा समावेश करून मागासवर्गीय महिलांसाठी 5 जागा काढण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या असून, त्यानुसार सोमवारी आरक्षण सोडत होणार आहे. मंगळवारी 19 प्रभागांची आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. यात मागासवर्गीय महिलांसाठी 'अ' जागेवरील प्रभागांचा समावेश केला होता. 'ब' जागांवरील प्रभागांचा समावेश न झाल्याने सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता. आता आज मागासवर्गीय महिलांची आरक्षण सोडत काढली जाईल.

Nanded Crime Update : कुख्यात गुंड अन् नांदेड पोलिसांमध्ये चकमक

जबरी चोरी, खंडणी, विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे, अपहरण, अशा गंभीर गुन्ह्यातील कुख्यात गुंड आरोपी रबज्योतसिंघ तिवाणा उर्फ गब्या गेल्या काही दिवसापासून फरार होता. अखेर कुख्यात गुंड रबज्योतसिंघ तिवाणा हा घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. कारवाईदरम्यान आरोपीने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी आरोपीवर गोळीबार केला. या गोळीबारात कुख्यात गुंड रबज्योतसिंघ तिवाणा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वजिराबाद पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

Shivsena Politics : ठाकरे अन् शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र

ठाकरे अन् शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र आली आहे. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडत आहे. त्यांच्या पत्नी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी उभ्या राहिल्या आहेत.

 असा पुरुष सिंह होणे नाही, बाळासाहेब ठाकरेंना राऊतांचे अभिवादन

ज्यांच्यामुळे मी घडलो असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना! असा पुरुष सिंह होणे नाही! मराठी माणसाने एकजुटीने राहावे आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे, अशा शब्दांना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी संजय राऊतांनी आदरांजली वाहिली

नाशिक बाजार समितीमध्य 12 कोटींचा घोटाळा - देविदास पिंगळे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी सभापती देविदास पिंगळे यांनी नाशिक बाजारात समितीममध्ये नऊ महिन्यात बाजार समिती 12 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. गिरणारे येथे एक रुपया एकर दराने जमीन मिळणार होती. मात्र पदाधिकाऱ्यांचे सर्व लक्ष भ्रष्टाचारच असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असेच पिंगळे म्हणाले.

नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तरी देखील नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे, तर, भाजपला दोन उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

बुलढाण्यात वंचित- काँग्रेस युती 

बुलढाण्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. दोन्ही पक्ष 50-50 ५०-५० टक्के जागा लढवणार आहे.

मंढरी, जोशी यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कल्याण पूर्वमधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल मंढारी, सहसंपर्कप्रमुख विजय जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. काही ठिकाण युती आणि आघाडी होणार की नाही याचे चित्र देखील स्पष्ट होणार आहे. आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT